अमेरिकेच्या राष्ट्रीय विज्ञान मंडळावर गेल्याच आठवडय़ाच्या अखेरीस झालेली नियुक्ती, हा गेली ३० हून अधिक वर्षे तेथे राहणाऱ्या डॉ. सेतुरामन पंचनाथन यांच्या शिरपेचातील एक मानाचा तुरा. सात अब्ज २० लाख डॉलरचे आर्थिक बळ लाभलेली ही सरकारप्रणीत यंत्रणा आरोग्यापासून संरक्षणापर्यंतच्या ज्या सर्व विज्ञान क्षेत्रांतील प्रगतीसाठी काम करते, त्यापैकी अनेक क्षेत्रांत संगणकाचे पुढले अवतार कसे वापरले जातील, यावर सेतुरामन यांचे संशोधन एरव्हीही सुरू होतेच. गेल्या दोन दिवसांत भारतीय प्रसारमाध्यमांनी सेतुरामन हे मूळचे मद्रास विद्यापीठातून भौतिकशास्त्रात पदवी (१९८१), बेंगळुरूच्या अ. भा. विज्ञान संस्थेतून बी.ई. (१९८४) आणि पुढे आयआयटी-मद्रास येथून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये एम.टेक. (१९८६) झाले होते, याचे कौतुक आधिक केले. वास्तविक आजघडीला त्यांची ओळख संगणक वैज्ञानिक म्हणून आहे. कॅनडातील ओटावा विद्यापीठातून त्या विषयात त्यांनी पीएच.डी. संपादन केली (१९८९). काही वर्षे कॅनडातच राहून ते अमेरिकेत आले आणि १९९७ पासून ‘अॅरिझोना राज्य विद्यापीठा’त स्थिरावले.
याच विद्यापीठात २००१ मध्ये प्राध्यापक पदावर बढती मिळाल्यावर त्यांनी ‘सेंटर फॉर कॉग्निटिव्ह युबिक्विट्स कम्प्युटिंग’ (क्युबिक) या अभ्यास संस्थेची स्थापना केली. कृत्रिम प्रज्ञा आणि संगणकीय ज्ञानगणन हा त्यांच्या अभ्यासाचा खास प्रांत आहे, हे येथे सिद्ध झाले. पण तेथेच न थांबता, २००५ मध्ये त्यांनी या विद्यापीठाच्या ‘बायोमेडिकल इन्फर्मेटिक्स’ विभागाची स्थापना केली आणि २००७ पर्यंत त्या विभागाचे प्रमुखपदही सांभाळले. नेत्रहिनांसाठी, हात वा बोटे नसलेल्यांसाठी संगणक वा ‘टॅब्लेट’ कसा उपयोगी पडेल, यावर त्यांचे संशोधन केंद्रित झाले होते. त्यातून नेत्रहिनांसाठी व्याख्यानाच्या ‘नोट्स’ काढणारा संगणक-कार्यक्रम (क्युबिक- आयकेअर नोटटेकर) बनला आणि ‘मायक्रोसॉफ्ट’ने आयोजिलेल्या स्पर्धेत अव्वल ठरला. यापुढल्या पिढय़ांतील संगणक माहिती वा ‘डेटा’ प्रक्रियान्वित करण्याच्या क्षमतेमुळे नव्हे, तर ज्ञानगणनाच्या क्षमतेमुळे ओळखले जातील, असे मत त्यांनी संधी मिळेल तेथे मांडले आहेच आणि त्याला शास्त्रकाटय़ाची कसोटी लावणाऱ्या ४०० शोधनिबंधांशी त्यांचे नाव जोडले गेले आहे. डॉक्टरेट वा पोस्ट-डॉक्टरेट केलेल्या विद्यार्थ्यांपासून स्नातक व पदव्युत्तर पदवीपर्यंतचे १०० विद्यार्थी त्यांनी गेल्या दशकभरात घडवले आहेत.
अॅरिझोना विद्यापीठाने २००९ मध्ये त्यांची नेमणूक विद्यापीठाचे संशोधन प्रमुख या पदावर केली, तर २०११ पासून विद्यापीठाच्या ‘ज्ञान-उद्योग विकास शाखे’चे वरिष्ठ उपाध्यक्षपद त्यांना दिले. संशोधनाचे नियोजन, उपयोजन करण्याच्या या अनुभवाचा वापर आता त्यांनी स्वेच्छा-नागरिकत्व स्वीकारलेल्या देशासाठी होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 18th Jun 2014 रोजी प्रकाशित
डॉ. सेतुरामन पंचनाथन
अमेरिकेच्या राष्ट्रीय विज्ञान मंडळावर गेल्याच आठवडय़ाच्या अखेरीस झालेली नियुक्ती, हा गेली ३० हून अधिक वर्षे तेथे राहणाऱ्या डॉ. सेतुरामन पंचनाथन यांच्या शिरपेचातील एक मानाचा तुरा.
First published on: 18-06-2014 at 12:42 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Personality observation dr sethuraman panchanathan