व्यक्तिवेध: बी. हृदयकुमारी

‘नंदिपूर्वम’ हे केवळ आत्मचरित्र बी. हृदयकुमारी यांनी लिहिले असते, तरीही त्या पुस्तकाची गणना महत्त्वाच्या भारतीय स्त्री-आत्मचरित्रांत होऊन, हृदयकुमारी या महत्त्वाच्या लेखिका ठरल्याच असत्या.

‘नंदिपूर्वम’ हे केवळ आत्मचरित्र बी. हृदयकुमारी यांनी लिहिले असते, तरीही त्या पुस्तकाची गणना महत्त्वाच्या भारतीय स्त्री-आत्मचरित्रांत होऊन, हृदयकुमारी या महत्त्वाच्या लेखिका ठरल्याच असत्या. पण कविता, समीक्षा असाही पैस आपल्यासाठी खुला आहे, हे अगदी तरुणपणीच ओळखणाऱ्या हृदयकुमारी पुढे शिक्षणक्षेत्रात गेल्या, तरीही लिहित्या राहिल्या होत्या. त्यामुळेच, गेल्या आठवडय़ातील त्यांच्या निधनानंतर ‘काल्पनि कथा’ हे समीक्षेचे पुस्तकही त्यांची खूण म्हणून मागे उरले आहे.  
ही दोन्ही पुस्तके मल्याळम् भाषेतील. त्यांपैकी ‘नंदिपूर्वम’चा अनुवाद कदाचित येईलही. पण लेखकाच्या मातृभाषेतच राहिले, म्हणून पुस्तकाचे महत्त्व कमी होत नाही. विभावरी शिरूरकर (मालती बेडेकर, पूर्वीच्या बाळुताई खरे) यांच्या ‘खरे मास्तर’चा तरी अनुवाद अद्याप झालेला नाही. बाळुताईंप्रमाणेच, हृदयकुमारी याही तिघी बहिणींत वाढल्या आणि सर्व बहिणी उच्चशिक्षित झाल्या. ‘बी.’ म्हणजे बोधेश्वरन् हे हृदयकुमारींचे वडील. ते स्वातंत्र्यसैनिक आणि कवी होते. आई-वडिलांच्या, त्यांच्या काळाच्या आणि १९३०-४० मधील स्त्रीजीवनाच्याही आठवणी ‘नंदिपूर्वम’मध्ये येतात. पुढे या आत्मचरित्राची नायिका (जन्म १९३०) शिकू लागते, मुलींची महाविद्यालये नव्यानेच निघालेली असतात, तिथे ती शेक्सपिअर अभ्यासते आणि शिक्षिका म्हणून नोकरीही करू लागते.. विवाह, कन्याप्राप्ती यांचा परिणाम १९५०च्या दशकातही अभ्यासावर न होऊ देता पुढे जात राहाते आणि भाषा व साहित्य शिक्षणात नवे प्रयोग करता-करता ‘शिक्षणतज्ज्ञ’ अशी ख्याती मिळवते!
ही गोष्ट त्यावेळच्या अनेकींची होती, तशी हृदयकुमारींचीही. पण हृदयकुमारी त्याहीपुढे गेल्या. शिक्षणतज्ज्ञ ही कीर्ती केवळ मिरवण्यासाठी नसते, ती टिकेल असे काम करायचे असते, अशा निष्ठेने त्या कार्यरत राहिल्या होत्या. यातूनच, सेमिस्टर पद्धतीत नवे बदल सुचवण्याचे आणि या कल्पना सरकारच्या गळी उतरवून हे बदल अमलात आणवण्याचे काम त्यांच्या हातून झाले. याबद्दल आजही केरळ त्यांना ओळखते.
या व्यापात साहित्यनिर्मितीकडे काहीसे दुर्लक्ष झाले, विशेषत काव्यलेखन सतत आणि विपुल नसल्याने ‘कवयित्री’ ही त्यांची ओळख मागेच पडली, हे खरे. परंतु कवितेचा, कवितेसोबत संस्कृतीचाही अभ्यास मात्र वाढला होता. ‘काल्पनि कथा’ या समीक्षाग्रंथातून इंग्रजी आणि मल्याळम रोमँटिक काव्यप्रवाहाचा अभ्यास करताना, सांस्कृतिक- सामाजिक निरीक्षणेही त्यांनी मांडली आहेत. हे पुस्तक आजही महत्त्वाचे मानले जाते.  ‘नंदिपूर्वम’ला १९९१ मध्ये केरळ साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता.  राष्ट्रीय प्रतिष्ठेचे पुरस्कार मात्र त्यांच्यापासून लांबच राहिले. ‘शिक्षणतज्ज्ञ’ ही लौकिक ओळख असणाऱ्या या लेखिकेचे निधन दोन दिवसांपूर्वी झाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Personality of the day b hridayakumari