‘जीजा’ या आपुलकीच्या दोन शब्दांत एकनाथ आवाड यांची ओळख सामाजिक कार्य करणाऱ्या प्रत्येकाला होती. स्वभाव जात्याच बंडखोरीचा. समाजातील वाईट रूढी-परंपरांवर घाला घालणारा हा संघर्षशील कार्यकर्ता मानवी हक्काच्या लढय़ास सतत पाठबळ देत राहिला. नुसते पाठबळच नाही, तर दलित समाजाच्या हक्काची जागा कोणती, हे सांगत त्यांनी गायरानावरील अतिक्रमणाची उभी केलेली चळवळ जगण्याच्या अधिकाराची ठरली. एकनाथ आवाडांचा जन्म पोतराज म्हणून ‘देवीची गाणी’ म्हणणारे दगडू आवाड यांच्या घरात झाला. घरातूनच परिवर्तनाची लढाई सुरू करायची असते, हे ओळखून त्यांनी पोतराज वडिलांचे केस कापले. ज्या काळात ही घटना घडली तेव्हा केस कापले तर देवीचा कोप होईल आणि माणूस मरेल, अशी अंधश्रद्धा मोठय़ा प्रमाणात होती. ती पूर्णत: संपली आहे असे नाही. मात्र, अशा रूढींच्या विरोधात पाय रोवून उभे राहावे लागते, हे मराठवाडय़ात आवर्जून सांगणारे कार्यकत्रे म्हणजे एकनाथ आवाड. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मानवी हक्काच्या लढय़ात गायरान जमीन मिळावी, यासाठी सुरू केलेला संघर्ष त्यांनी केवळ दलित समाजापुरता मर्यादित ठेवला नाही, तर पारधी समाजालाही या लढय़ात सहभागी करून घेतले. दलित अत्याचाराच्या गावोगावी घडणाऱ्या घटनांमध्ये पोलिसांनी बहुसंख्य सवर्णाची बाजू घेतली, तर त्याविरोधात बळ देणारा कार्यकर्ता एकनाथ आवाडांनी घडविला. पारधी समाजाच्या वस्तीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती व्हावी, यासाठी ते प्रयत्नशील होते. आंबेडकरी विचारांशी निष्ठा बाळगताना समकालीन नेते कोण हे सांगणारे आवाड यांचे नेतृत्व होते, म्हणूनच बीडच्या ग्रामीण भागात नेल्सन मंडेला यांच्या नावाने वसाहत त्यांनी निर्माण केली. ज्यांना कोणीच वाली नाही, अशा उपेक्षित समाजाला न्याय मिळावा यासाठी ते कार्य करायचे. गावातील घरगुती भांडण असो की दलित-सवर्ण वाद, आवाड प्रत्येक समस्येवर काम करायचे. कधी संघर्षांने, तर कधी सामोपचाराने त्यांनी तोडगा काढला. परिवर्तनाच्या लढाईत राजकीय नात्यांची गरज ओळखून त्यांना चळवळीत सामावून घेण्याची वृत्ती आवाडांकडे होती. त्यांचे राजकारणही याच दिशेने जाणारे होते. उपेक्षित वंचिताच्या क्षेत्रातही ‘एनजीओ कल्चर’ विकसित होत असताना, त्याला फाटा देत लढाऊ कार्यकत्रे त्यांनी घडविले. सामाजिक चळवळीला नवा विचार देताना एकनाथ आवाड यांनी राजकारणही केले. परिवर्तनाच्या लढय़ाला आकार देण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी आपुलकीचे संबंध निर्माण केले होते. भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्याशीही मत्र होते.

मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Personality of the day eknath avadha
First published on: 27-05-2015 at 01:01 IST