तुम्हाला फक्त खेळावर लक्ष द्यावे लागत असेल तर तुमच्या कामगिरीत सुधारणा होऊ शकते, पण पाकिस्तान क्रिकेटची गोष्टच न्यारी. इथले राजकारण आणि मनमानी कारभार कधीही न संपणारा. त्याचबरोबर दहशतवादी सावट असल्याने देशात गेल्या बऱ्याच वर्षांमध्ये एकही सामना होऊ शकलेला नाही. या साऱ्या परिस्थितीमध्ये चांगली कामगिरी करत राहणारा आणि खेळाचा ध्यास न सोडणारा क्रिकेटवेडा म्हणजे युनुस खान. सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये सलग तीन शतके झळकावत युनुस पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे.
युनुसने २६ फेब्रुवारी १९९९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर बरेच चढ-उतार त्याच्या कारकीर्दीत आले. कधीही त्याला ग्लॅमर मिळाले नाही. कारण प्रकाशझोतात येण्यासाठी त्याने कधीही माकडचाळे केले नाहीत किंवा वादग्रस्त विधानेही केली नाहीत. पाकिस्तानच्या मधल्या फळीतील फलंदाजाची भूमिका तो चोखपणे बजावत राहिला. २००३ च्या विश्वचषकानंतर त्याची कामगिरी लौकिकाला साजेशी न झाल्याने त्याला संघातून डच्चू दिला गेला. त्या वेळी न डगमगता त्याने क्रिकेटमध्ये धावांचा डोंगर उभारत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत पुनरागमन करत पाकिस्तानकडून सर्वाधिक धावाही जमवल्या. २००५ साली त्याने आयसीसीच्या कसोटी संघामध्ये स्थानही पटकावले. इंझमाम-उल-हकला कर्णधारपदावरून पायउतार केल्यावर पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडे युनुस हाच पर्याय होता आणि त्याच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ पडली. कर्णधारपद स्वीकारल्यावर पहिल्याच सामन्यात ३१३ धावांची अप्रतिम खेळी साकारली. पण संघातील राजकारणामुळे जास्त सामने जिंकता आले नाहीत.
२००९ साली सामनानिश्चितीच्या प्रकरणात पाकिस्तानी संघाचे हात पोळले गेले तेव्हा युनुस कर्णधार होता. या प्रकरणानंतर त्याने स्वत:हून कर्णधारपदाचा राजीनामा दिला. २०१० साली ‘दी टेलिग्राफ’ने युनुसचे सट्टेबाज मझहर माजिदबरोबर संबंध असल्याचे वृत्त छापले आणि एकच खळबळ उडाली. युनुसने त्यांच्याविरोधात याचिका दाखल केली. मार्च २०१०मध्ये युनुस आणि मोहम्मद युसूफ यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत निलंबन करण्यात आले, पण तीन महिन्यांनंतर त्यांच्यावरील निलंबन उठवले. त्यानंतर त्याच्या कामगिरीत सातत्याचा अभावच पाहायला मिळाला. गेल्या १८ महिन्यांमध्ये त्याच्या वाटय़ाला फक्त एकमेव सामना आला होता. त्यामुळे त्याला नैराश्याने ग्रासले होते. क्रिकेट सोडण्याचा विचार त्याच्या मनात येऊ लागला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात दोन आणि दुसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात शतक झळकावत युनुसने नव्या विक्रमाला गवसणी घातली. कारकिर्दीला मिळालेले हे नवीन वळण त्याला कुठे घेऊन जाईल, याची उत्सुकता साऱ्यांनाच असेल.
संग्रहित लेख, दिनांक 5th Nov 2014 रोजी प्रकाशित
युनुस खान
तुम्हाला फक्त खेळावर लक्ष द्यावे लागत असेल तर तुमच्या कामगिरीत सुधारणा होऊ शकते, पण पाकिस्तान क्रिकेटची गोष्टच न्यारी. इथले राजकारण आणि मनमानी कारभार कधीही न संपणारा. त्याचबरोबर दहशतवादी सावट असल्याने देशात गेल्या बऱ्याच वर्षांमध्ये एकही सामना होऊ शकलेला नाही.
First published on: 05-11-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Personality of the day pakistani cricketer younis khan