बॅडमिंटन म्हणजे दमसासाची परीक्षा पाहणारा खेळ. राष्ट्रकुल स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरीत सुवर्णपदक पटकावणाऱ्या पारुपल्ली कश्यपला दम्याचा आजार आहे. बॅडमिंटन खेळण्यासाठी अगदीच प्रतिकूल असा हा आजार. तालुका-जिल्हा-राज्य असे टप्पे पार करत राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचल्यानंतर कश्यपला दमा असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बॅडमिंटनला मारक अशा या आजारामुळे कश्यपची कारकीर्द संपुष्टात येणार अशा चर्चाही रंगू लागल्या. तो बंगळुरूहून हैदराबादला स्थायिक झाला. प्रकाश पदुकोण यांच्याऐवजी पुल्लेला गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली तो खेळू लागला. दम्याच्या विकारासाठी त्याला नियमित औषधे घ्यावी लागत. हे औषध प्रतिबंधित उत्तेजकांचा भाग नाही तर नियमित औषधच आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याला प्रत्येक स्पर्धेआधी जागतिक उत्तेजकविरोधी संघटनेकडून प्रमाणपत्र घ्यावे लागे. यासाठी किचकट कागदोपत्री प्रक्रिया अमलात आणावी लागते. औषधांमुळे दम्याची तीव्रता आता कमी झाली आहे, परंतु विकार आहेच. तशात गेल्या वर्षी त्याच्या घोटय़ाला दुखापत झाली. त्यातून सावरेपर्यंत डोळ्याला इजा झाली. एवढे पुरेसे नाही म्हणून त्याचा खांदा निखळला. कारकीर्द धोक्यात आणणाऱ्या या दुखापतींतून सावरत त्याने पुनरागमन केले. दुर्दैव म्हणजे थोडय़ाच दिवसांत त्याच खांद्याला दुखापत झाली. या ससेमिऱ्याला वैतागून एखाद्या खेळाडूने खेळ सोडला असता, परंतु कश्यपने अथक प्रयत्नांसह पुनरागमन करून, राष्ट्रकुलमध्ये तब्बल ३२ वर्षांनंतर पुरुष एकेरीतील सुवर्णपदकाचा दुष्काळ संपवला! पुरुष खेळाडूंपैकी सायनाला समांतर खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. मात्र चीन आणि मलेशियाच्या खेळाडूंच्या वर्चस्वामुळे सुपर सिरीज स्पर्धाची जेतेपदे कश्यपला हुलकावणी देतात. सातत्याचा अभाव आणि मोक्याच्या क्षणी कच खाण्याची वृत्ती हे त्याचे कच्चे दुवे प्रतिस्पध्र्यानी हेरले होते. ऑलिम्पिकमध्ये उपान्त्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारत त्याने कर्तृत्व सिद्ध केले. काही दिवसांतच त्याने सय्यद मोदी ग्रां. प्री. स्पर्धेचे जेतेपद पटकावले. जागतिक क्रमवारीत अव्वल दहामध्ये त्याने स्थान मिळवले. राष्ट्रकुल स्पर्धेत अव्वल खेळाडू आहेत, तरीदेखील सुवर्णपदक पटकावेन असे वक्तव्य त्याने केले होते. जबरदस्त तंदुरुस्ती, कोर्टवरचा सर्वागीण वावर, फटक्यांतले वैविध्य या बळावर सुवर्णपदक जिंकून त्याने आपला शब्द पाळला. प्रकाश पदुकोण, पुल्लेला गोपीचंद, सईद मोदी यांच्यानंतर भारतीय पुरुष बॅडमिंटनमध्ये असलेली पोकळी भरून काढण्याचा विश्वास कश्यपने सुवर्णपदकासह दिला आहे. सुवर्णपदकाची लढत जिंकल्यानंतर जर्सी काढून कश्यपने आनंद साजरा केला; त्या वेळी त्याच्या डाव्या खांद्याला असणारे प्रचंड स्ट्रॅपिंग लक्ष वेधून घेत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Personality of the day parupalli kashyap
First published on: 05-08-2014 at 01:01 IST