गेली सुमारे साठ वर्षे अविरत लेखन करणारे  नाटककार, दिग्दर्शक, निर्माते, बालनाटय़ चळवळीचे अध्वर्यु, साहित्यिक, स्तंभलेखक, अनेक सामाजिक चळवळींतून सक्रीय सहभाग घेणारे जागले, चित्रकार, चित्रपट व मालिकालेखक, एकपात्री कथाकथनकार अशा विविधांगी भूमिका लीलया निभावणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेल्या रत्नाकर मतकरी यांना यंदाचा चतुरंग जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
१९५५ साली वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी रेडिओसाठी ‘वेडी माणसे’ ही श्रृतिका लिहून त्यांनी लेखनास प्रारंभ केला. तेव्हापासून ते झपाटल्यासारखे व्रतस्थपणे लिहीत आहेत. विजय तेंडुलकर आणि मतकरी हे तसे समकालीन. साधारणत: एकाच वेळी त्यांनी नाटय़लेखनास सुरुवात केली. मतकरींनी नाटय़लेखनात अनेक ‘प्रयोग’ केले. बालनाटय़ापासून प्रायोगिक, व्यावसायिक अशी सर्व प्रकारची नाटके त्यांनी लिहिली. ‘माझं काय चुकलं?’ ‘लोककथा ७८’, ‘आरण्यक’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘घर तिघांचे हवे’, ‘बकासुर’ आदी नाटकांतून त्यांच्या चतुरस्र शैलीचा वानवळा मिळतो. त्यांनी ‘बालनाटय़’ आणि ‘सूत्रधार’ या संस्था स्थापन करून त्याद्वारे निर्मिती व दिग्दर्शनही केले. आजवर ३५ हून अधिक नाटके त्यांच्या नावावर आहेत. इंदिरा गांधी यांच्या अखेरच्या दिवसांवर त्यांनी लिहिलेले नाटक करण्याचे धाडस मात्र अद्याप कुणा निर्मात्याने दाखविलेले नाही. एक हुकमी व यशस्वी नाटककार ही त्यांची ओळख. चाय-खोका बालनाटय़ चळवळीद्वारे त्यांनी बालनाटय़े सर्वदूर पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले.
गूढकथालेखक ही त्यांची आणखी एक ओळख. आपल्या गूढकथांवर ‘गहिरे पाणी’ या मालिकेचीही त्यांनी निर्मिती केली. ‘इन्व्हेस्टमेंट’ या आपल्या कथेवरील चित्रपटाचे लेखन, निर्मिती व दिग्दर्शनही त्यांनी केले. सामाजिक जाणिवेच्या चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार त्याला मिळाला. रेडिओ, दूरदर्शन, चित्रपट, रंगभूमी, एकपात्री कार्यक्रम, चित्रकारिता, सामाजिक चळवळी असा चौफेर संचार त्यांनी आयुष्यभर केला. या प्रत्येक क्षेत्रात काहीतरी वेगळे करण्याचा नेहमीच त्यांचा प्रयत्न राहिला. १९९५ साली निर्भय बनो आंदोलनात त्यांनी सक्रीय सहभाग घेतला. काही वर्षांमागे ‘अ‍ॅडम’ ही लैंगिकतेवरील कादंबरी लिहून त्यांनी खळबळ उडवून दिली होती.
साहित्य व नाटय़क्षेत्रात खणखणीत कामगिरी करूनही अ. भा. मराठी साहित्य संमेलन तसेच नाटय़संमेलनाचे अध्यक्षपद मात्र त्यांना अद्यापि सन्मानपूर्वक बहाल केले गेलेले नाही. संगीत नाटक अकादमी पुरस्कारही त्यांना खूपच उशिरा मिळाला. असे असले तरीही मतकरी तरुणाईच्या उत्साहाने सतत नवे काहीतरी करत राहिले.. आणि यापुढेही करत राहतील, यात तीळमात्र शंका नाही.    

sanjay raut
“मी त्याचक्षणी राजकारणासह पत्रकारिता सोडेन”, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य; ठाकरेंचे खासदार नेमकं काय म्हणाले?
Kangana Ranaut
चित्रपटसृष्टीने आपल्याला अनेकदा अपमानित केले, कंगना राणावतचा न्यायालयात दावा
Sangeet Natak Academy Award announced to veteran actor Ashok Saraf for his performance in the field of theatre
नाट्य क्षेत्रातील कामगिरीसाठी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर
government cutting down of forests
उद्योगांवर कृपादृष्टी, जंगलांवर वक्रदृष्टी!