‘हे वाचणे कठीणच’ असा शिक्का तत्त्वज्ञानाच्या पुस्तकांवर मनोमन मारला जातो..  समज असा होतो की तत्त्वज्ञान अवघड आहे. उलट उत्तर मिळाले की समाजजीवनाच्या एका अंगाचा विकास होणार असतो. उत्तर दिले नाही तर ते अंग खुरटे बनते. समाजात उत्तरे नको असणाऱ्यांचाही समावेश असल्याने त्यांचाही विकास खुरटतो..
या सदरात आपण तत्त्वज्ञान या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विषयाची पुरेशी ओळख करून घेतली आहे. योग्य, सत्य व युक्त म्हणजे यथार्थ विचार कसा करावा, याचे प्रशिक्षण तत्त्वज्ञान या विषयात मिळते. तसा विचार केला नाही तर काय घडू शकते, असाही विचार आणि त्याचेही प्रशिक्षण तत्त्वज्ञान तुम्हाला देते. तत्त्वज्ञान कधीही आत्मस्तुती करीत नाही, इतरांनी केलेल्या स्तुतीला ते भाळत नाही आणि इतरांची िनदा करीत नाही; पण अतिशय काटेकोरपणे आणि नम्रतेने त्यांच्या मर्यादा त्यांच्या लक्षात आणून देते.
तत्त्वज्ञान नेहमी मर्मभेदक आणि तांत्रिकदृष्टय़ा गुंतागुंतीचे असते, अशी अनेकांची तक्रार असते. तत्त्वज्ञानाचे एखादे पुस्तक वाचताना ‘मला समजत नाही’ अशी तक्रार झाली तर तिचे स्वरूप नीटपणे समजावून घेतले पाहिजे. ‘मला समजत नाही’ ही तक्रार एखादे पुस्तक, व्यक्ती, घटना, परिस्थिती अथवा एखादी संकल्पना यांच्याविरुद्ध नसते. तर ‘मला समजत नाही’ असे म्हणणे हे; तुमचे स्वत:विषयीचे म्हणणे असते. ते तुम्हाला तुमच्या ज्ञानात्मक मर्यादांचे आलेले आत्मभान असते.
याचा अर्थ असा की, व्यक्ती म्हणून तुमचा आणखी विकास करवून घेण्याची ती तुम्हीच निर्माण केलेली संधी असते. ‘मला समजत नाही’ असे म्हणणे, हे तुमच्या मनाच्या विविध जाणिवांच्या आणि मनाच्या रचनेची जाणीव होण्याच्या प्रयत्नांचे विधायक दर्शन असते. एखाद्याच्या बोलण्याने तुम्ही दुखावले जात असला तर तुम्ही नशीबवान आहात. आता तुम्हाला तुमचे मन, बुद्धी कसे काम करते हे जाणण्याची सुसंधी असते. म्हणून टीका नाकारू नका. तुमचे मन त्या दिशेला वळवून घ्या.
तुमच्या मर्यादांचे आत्मभान तुम्हाला अनंत ज्ञानाच्या अथांग क्षेत्राकडे घेऊन जाते. ‘अज्ञानाचे ज्ञान हाच ज्ञानाचा शुभारंभ आणि म्हणून सद्गुणी होण्याचा प्रारंभ’ हाच तर सॉक्रेटिसचा दावा होता. त्याला त्याच्या ज्ञानात्मक मर्यादांची अत्यंत सुस्पष्ट निर्णायक जाणीव होती. सॉक्रेटिसचा हा दावा म्हणजे त्याचा पूर्वसुरी थेल्सच्या (इ.स.पू. ६२४-५४६ ) मते, ‘जगण्यातील सर्वात अवघड कथा म्हणजे स्वत:ला ओळखणे’ या वचनाचा प्रतिध्वनी होता.
आता, ‘तत्त्वज्ञानात अवघड काय असते?’ असा प्रश्न आपण यथार्थपणे उपस्थित करू शकतो. तत्त्वज्ञान समजावून घेण्यात मूलत: अवघड असते का? की तत्त्ववेत्तेच ते अवघड बनवितात? याची दोन उत्तरे संभवतात.
पहिले म्हणजे तत्त्ववेत्ते तत्त्वज्ञान अवघड बनवीत नाहीत. पण जे प्रश्न ते उपस्थित करतात, त्यांची मांडणी करतात ती त्रासदायक वाटू शकते. कोणत्याही विद्यमान प्रस्थापितांना, सामाजिक, आíथक, राजकीय किंवा सांस्कृतिकदृष्टय़ा बलशाली समाजगटांना अडचणीत आणतात. उदाहरणार्थ, सर्वोत्तम राजकीय व्यवस्था कोणती? विद्यमान जीवन हेच उत्तम जीवन आहे, याचा नतिक आधार कोणता? अशा तात्त्विक प्रश्नांना उत्तर देणे अवघड असते. म्हणजे प्रश्न सोपे असतात पण उत्तरे कठीण असतात. ती देण्याने अनेक हितसंबंध उघडकीस येणारे असतात आणि ते प्रस्थापितांना नको असते. कारण त्यांच्यावरही आदर्श नीतीचा दबाव असतो. ती नीती त्यांना सार्वकि हिताचे निर्णय घेण्यास भाग पाडत असते. पण त्यांनी तसे केले की त्यांना मिळणारे सुख, सामाजिक लूटमारीचा त्यांचा वाटा कमी होतो. म्हणजे तत्त्वज्ञानाचे प्रश्न सोपे असतात आणि उत्तरे अवघड असतात. पण समज असा होतो की तत्त्वज्ञान अवघड आहे. उलट उत्तर मिळाले की, समाजजीवनाच्या एका अंगाचा विकास होणार असतो. उत्तर दिले नाही तर ते अंग खुरटे बनते. समाजात उत्तरे नको असणाऱ्यांचाही समावेश असल्याने त्यांचाही विकास खुरटतो. तेही मागास बनतात.
आता, दुसरे उत्तर केम्ब्रिजचे तत्त्ववेत्ते सायमन ब्लॅकबर्न (जन्म १९५५) यांच्याकडून मिळेल. सामान्य लोकांसाठी तत्त्वज्ञान जाणीवपूर्वक का उपलब्ध झाले पाहिजे? हा प्रश्न अगदी यथार्थपणे ब्लॅकबर्न उपस्थित करतात. त्यांच्या मते, प्लेटोपासून विसाव्या शतकातील विटगेन्स्टाइनपर्यंत अनेकांनी ‘केवळ लोकांसाठी’ तत्त्वज्ञान निर्माण केले, असा दावा केला जातो खरा; पण या सर्वाचे लेखन खरेच लोकसुलभ होते का? त्यांच्या तत्त्वज्ञानाचे हेतू खरेच लोकाभिमुख होते का? असे प्रश्न उपस्थित केले पाहिजेत. प्लेटोचे तत्त्वज्ञान वर्गव्यवस्था निर्माण करून केवळ श्रीमंत उच्चवर्गीयांना सत्ता बहाल करते. सामान्य लोक सत्तेपासून जाणीवपूर्वक दूर ठेवले जातात. मग ते अवघड बनते, नकोसे होते. दुसरे, मध्ययुगात कांट, हेगेलपासून तत्त्वज्ञानाला अवघड रूप मिळाले. हे काही हेतुपूर्वक घडले नाही. पण पल्लेदार विधानांची मुक्त पखरण करीत, अनेक व्याकरणीय करामती करीत अनंत नियमांची गुंतागुंत करीत या उच्चकोटीच्या तत्त्ववेत्त्यांनी लेखन केले आणि तत्त्वज्ञान सामान्यांपासून दूर गेले, असे निरीक्षण ब्लॅकबर्न नोंदवितात. त्या काळात इंग्लिश ही जनभाषा असताना या विद्वानांनी प्रतिष्ठित व अभिजात समजल्या जाणाऱ्या जर्मन भाषेत लेखन करून तत्त्वज्ञान केवळ अभिजनांची मिरासदारी करून ठेवली. विशेषत: विसाव्या शतकात तत्त्वज्ञानाला कठीण विद्यापीठीय दर्जा देण्याचा नादिष्टपणा पराकोटीला गेला. सगळ्यांनी लेखनच तसे केले.
विसाव्या शतकात भौतिकशास्त्राच्या बाबतीत असेच घडले होते. ‘भौतिकशास्त्र इतके सोपे असावे की ते हॉटेलमध्ये काम करणाऱ्या महिला वेटरलासुद्धा समजावून सांगता आले पाहिजे,’ असे अन्रेस्ट रुदरफर्ड हा शास्त्रज्ञ म्हणत असे. आइनस्टाइनचाही असाच काहीसा दावा होता. त्याच्या मते तर बालकालाही समजेल अशा रीतीने भौतिकशास्त्राचे नियम लिहिता आले पाहिजेत. पण प्रत्यक्षात भौतिकशास्त्र अतिशय अवघड केले गेले, असे ब्लॅकबर्न स्पष्ट करतात. तेच तत्त्वज्ञानाच्या बाबतीत झाले. सामान्यजनांच्या कल्याणाचे तत्त्वज्ञान नेहमी त्यांच्यापासून दूर जाईल असेच रचले गेले. विज्ञान जसे अनेक ठिकाणी तांत्रिक, गुंतागुंतीचे असते तसे तत्त्वज्ञानही असते, हे खरे. ते फारसे पातळ करता येत नाही, हेदेखील खरे. शुद्ध गणित किंवा विज्ञान, विशेषत: वैद्यक विज्ञान, अभियांत्रिकी, जैवतंत्रज्ञानासारखे विषय कठीण असतात हे आपण समजू शकतो. अशा विषयांचा आपल्या रोजच्या जगण्याशी संबंध येतोच असे नाही. पण तत्त्वज्ञान मात्र तुमचे रोजचे जगणे, जीवन ठरवीत असते. तुमचे आयुष्य कसे असावे, तुम्ही काय मिळवावे हेच निश्चित करीत असते, पण मग ते अवघड आहे, हे कसे पचवायचे? तत्त्वज्ञान रोजच्या जगण्याशी लगटून आहे. म्हणून त्यावर प्रत्येकाचा हक्क आहे. ते सुलभ रीतीने मांडता आले पाहिजे.
ब्लॅकबर्न म्हणतात तशी, तत्त्वज्ञान सोपे करण्याची लाट पाश्चात्त्य-युरोपीय विचारविश्वात १९९०च्या दशकात आली. स्विस-ब्रिटिश तत्त्वज्ञ-लेखक अ‍ॅलन डी बॉटन (जन्म १९६९), ब्रिटिश तत्त्वज्ञ अँथनी क्लिफर्ड ग्रेिलग (जन्म १९४९) आणि नॉर्वेजियन लेखक योस्टाइन गोर्डर (ख२३ी्रल्ल ॅं१ीि१, जन्म १९५२-) यांनी असा प्रयत्न केला. त्यांच्या लेखनामुळे तत्त्वज्ञानाची भीती गेली, हा मोठा फायदा लोकांना झाला.
ब्लॅकबर्नच्या मते, तत्त्वज्ञान लोकांना उपलब्ध झाले पाहिजे, याचा अर्थ त्याचे सुलभीकरण करणे, असा करण्यापेक्षा लोकांना तत्त्वज्ञानाच्या शैलीचा परिचय करून देणे आणि लोकांना तत्त्वज्ञानाच्या रीतीने विचार करण्यास उत्तेजन देणे, असा करणे योग्य राहील. त्याचा फायदा असा होईल की जगाचे स्पष्टीकरण कसे करावे, ही समस्या न बनता जगाचे जे काही स्पष्टीकरण देण्यात आले आहे, देण्यात येते, ते समजावून घेण्याची क्षमता विकसित करणे, हे आपले लक्ष्य राहील.
*लेखक संगमनेर महाविद्यालय, संगमनेर येथे तत्त्वज्ञान विभागप्रमुख आणि सहयोगी प्राध्यापक आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व तत्वभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Phylosophy hard to read
First published on: 07-08-2014 at 01:46 IST