वयाची पन्नाशी पार केल्यावर ‘तरुण असताना मीही..’ अशी सुरुवात करण्यात अनेक जण धन्यता मानतात आणि यांपैकी विशेषत: पुरुष तर, ‘नाही तर तुम्ही..’ अशी शेरेबाजी करून स्वत:चेही हसे करून घेतात. पण पन्नास वर्षे वयाचा ट्रॉय आणि ५८व्या वर्षी, दोन नातवंडेसुद्धा असलेला लिओनिद या दोघांनी, बलूनमधून जपान ते मेक्सिको असे ८४६७ किलोमीटर अंतर कापणारा प्रवास करून वय आणि वृत्ती यांचा संबंध नसतो, हेच पुन्हा सिद्ध केले! तरुण असतानापासून दोघेही आपापल्या देशांत, बलूनमधून पुष्कळ ‘उंडारले’ होतेच.. पण ती केवळ तरुणपणीची रग नव्हती. बलून-उड्डाणांमागचे शास्त्र दोघांनीही समजून घेतले, प्रावीण्य आणि अभ्यास यांच्या जोरावर ते आपापल्या देशांतील बलून-वीरांच्या संघटनांचे अध्यक्षही बनले आणि बलूनोड्डाणाविषयी होणाऱ्या जागतिक परिषदांमधून अनेकदा भेटल्यावर, एकत्र उड्डाण करायचेच, असे या दोघांनी ठरवले.
यापैकी ट्रॉय अमेरिकेचा, तर लिओनिद रशियन. या दोघांच्या कळत्या वयात, दोघांचेही देश एकमेकांचे वैरीच मानले जात. पण बलूनमधून स्वच्छ आभाळात स्वैर भटकण्याचे स्वातंत्र्य अनुभवल्यानंतर शीतयुद्ध वगैरे खुजेच वाटते हे या दोघांना विशीतच समजले असावे. त्यातच, ट्रॉय पंचविशीत आणि लिओनिद तिशीत असतानापासून शीतयुद्धच विरत जाऊन जगाची आर्थिक फेररचना सुरू झाली. अशा काळात लिओनिदने रशियातील बँकिंग क्षेत्रात स्वत:चा जम बसवला. त्या मानाने ट्रॉय फार शिकला नाही. पण त्याच्या साहसांनीच त्याला आंतरराष्ट्रीय बलून-विश्वात प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘माँटगोल्फिअर डिप्लोमा’ मिळवून दिला. इकडे रशियात बलुनोड्डाणांत विक्रम म्हणून नोंद झालेली आठ साहसे लिओनिदने करून दाखवली असताना, छोटय़ामोठय़ा विक्रमांची मोजदाद केली तर ट्रॉयच्या नावापुढील संख्या ६० वर गेली!
हे दोघे, ‘दहा बाय दहाच्या खोली’पेक्षाही कमी आकाराच्या उघडय़ा खोक्यात पाच दिवस राहत होते. आराम वगैरे जवळपास विसरूनच, संपूर्ण वेळ बलूनखालच्या त्या खोक्याची मार्गक्रमणा नीट होते आहे ना याकडे लक्ष ठेवत होते. जमिनीपासून तब्बल ३० हजार फुटांपर्यंतच्या उंचीवर जायचे, म्हणून दोघांनी घातलेले जाड उबदार पोशाख, सुके अन्नपदार्थ आणि देहधर्मासाठी अगदीच कामचलाऊ व्यवस्था हे या खोक्यातील सामानाचे वजन. खोक्याच्या वर, भगभगीत आगीसह हेलियम वायूवर चालणारा बलून. अशा स्थितीत ते कसे राहिले, त्यांच्या शरीरांनी कसकसा प्रतिसाद दिला, हे क्षणोक्षणी नोंदवणारी व्यवस्थाही कार्यरत होतीच. हे उड्डाण यशस्वी झाले तेव्हा ‘हेलियम (गॅस) बलून’मधून सर्वाधिक प्रवास करण्याच्या नोंदीपेक्षाही, त्या दोघांची मैत्री जिंकली!