राजकीय नीतिशास्त्र ही केवळ एक अभ्यासशाखा नव्हे. राजकीय क्षेत्राच्या सुधारणेसाठी कॅनडासारख्या देशाने धोरणातच राजकीय नीतिशास्त्राचा अंतर्भाव केला. त्या देशात ‘नतिक सल्लागार कार्यालया’ला वैधानिक दर्जा आहे. अर्थात, अभ्यासक मंडळी राजकीय नीतिशास्त्रात महत्त्वाची भर घालण्याचे काम करीत आहेतच..
विसाव्या शतकात उपयोजित नीतिशास्त्रातील एक कळीचा विषय म्हणून स्वतंत्रपणे राजकीय नीतिशास्त्र ही नवी संकल्पना चर्चाविश्वात पुढे आली. ती अद्यापि बाल्यावस्थेत असली तरी तिने पाश्चात्त्य चर्चाविश्वात अतिशय सशक्त बाळसे धरले आहे.
या संकल्पनेची रुजवात गिब्सन िवटर या अभ्यासकाने ‘ए प्रपोजल फॉर ए पोलिटिकल एथिक्स’ या निबंधाने केली. त्याने ‘राजकीय नीतिशास्त्राचे विज्ञान’ असा शब्दप्रयोग केला. त्याची मांडणी पॉल रिकर या तत्त्ववेत्त्याच्या सिद्धान्तावर आधारित आहे. त्यानंतर हार्वर्ड विद्यापीठातील जॉन एफ केनेडी स्कूल ऑफ गव्हर्न्मेंटचे प्रमुख व राज्यशास्त्रज्ञ डेनिसन फ्रांक थॉमसन (१९४०–) यांनी सुव्यस्थित मांडणी केली. जॉन रॉल्स या जगप्रसिद्ध तत्त्ववेत्त्यापेक्षा अधिक जोमदार राजकीय विचार मांडणारे म्हणून ते जगभर ओळखले जातात. त्यांच्या ‘पोलिटिकल एथिक्स’ या प्रदीर्घ निबंधात त्यांनी ही मांडणी केली आहे.
राजकीय कृतींबद्दल नतिक निर्णय घेण्याचे; या कृतींबद्दल नतिक सिद्धान्त मांडण्याचे बौद्धिक कौशल्य मिळविणे आणि त्या कौशल्याचा, विविध तात्त्विक दृष्टिकोनातून अभ्यास करणे म्हणजे राजकीय नीतिशास्त्र रचणे होय. या नीतिशास्त्रास राजकीय नतिकता किंवा लोकनीतिशास्त्र असेही नाव आहे. तथापि ‘राजकीय नीतिशास्त्र’ हे नाव नुकतेच मिळू पाहत आहे. या विद्याशाखेचा उदय हा उपयोजित नीतिशास्त्राच्या विकासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. ही ज्ञानशाखा अगदी ताजी, नवजात असल्याने त्यावर खूप लेखन झाले आहे, असे नाही. पण जे काही लिहिले गेले आहे ते चिंतन-लेखन आजच्या घडीला अत्यंत उचित, संयुक्त, उपयुक्त आणि तसे पाहता उदंड मानता येईल, इतके आहे. हे लेखन विविध दृष्टिकोनांतून समस्यांची चर्चा करते. समस्यांच्या स्वरूपानुसार वेगवेगळे लेखन झाले आहे. ते परस्परांना छेद देते आणि त्याचवेळेस परस्परपूरकही ठरते. परिणामी या संपूर्ण वेगळ्या, वैशिष्टय़पूर्ण विविध समस्या आणि वेगवेगळे आनुषंगिक छेदक व पूरक साहित्य लक्षात घेता या नीतिशास्त्राचे दोन ठळक विभाग करण्यात येतात.
पहिले आहे प्रक्रियेचे नीतिशास्त्र आणि दुसरे आहे धोरणाचे नीतिशास्त्र. पहिले शासनाची विविध काय्रे, कर्तव्ये यासंबंधी आहे. ते लोकसेवक, नोकरवर्ग आणि त्यांची कार्यपद्धती, त्या कार्यपद्धतींची उपयुक्तता यावर लक्ष केंद्रित करते. दुसरे सार्वजनिक धोरणे आणि नीती यांचा अभ्यास करते. ते धोरणे आणि कायदे यावर लक्ष केंद्रित करते. या दोन्ही विभागांचे मूळ (१) नतिक आणि राजकीय तत्त्वज्ञान, (२)लोकशाही सिद्धान्त आणि (३) राज्यशास्त्र यावर बेतलेले आहे. पण राजकीय नीतिशास्त्र या तिन्हीपेक्षा वेगळी स्वतंत्र भूमिका मांडते.
राज्यकारभार चालविताना आणि सत्तेचे राजकारण करताना राजकीय नेते व प्रतिनिधी काही संकल्पना आणि तत्त्वे विचारात घेत असतात. त्यावर विसंबून ते आपला निर्णय घेतात आणि मग धोरणे निश्चित करतात. या संकल्पना कोणत्या आणि तत्त्वे कोणती आहेत, त्यांचे स्वरूप काय, त्यांचा प्रभाव कसा, कुठे परिणामकारक ठरतो किंवा ठरू शकतो, यांचा विचार करणे, ही राजकीय नीतिशास्त्राची भूमिका आहे. हे काम करताना म्हणजे या विषयाची मांडणी करताना संबंधित तत्त्वचिंतक पारंपरिक आदर्शवादी नतिक सिद्धान्ताचे उपयोजन करीत नाहीत तर वास्तवात राजकारणी, राजकीय नेते आणि त्यांच्यावर प्रभाव टाकणारे लोक (किचन कॅबिनेट, अपना आदमी, विविध प्रकारच्या लॉबी, सल्लागार, सरकारी सचिव, खासगी सचिव आणि काही वेळेस चमचे मंडळी) कोणत्या तत्त्वांचा आधार घेतात, त्यांचा अभ्यास करतात.
‘प्रक्रियेचे नीतिशास्त्र’ कशाचा अभ्यास करते? तर इतर वेळेस चूक व अनतिक ठरू शकणारे निर्णय घेण्याची परवानगी राजकारण्यांना कोणत्या मर्यादेपर्यंत दिली पाहिजे? दहशतवाद्यांच्या मागण्या मान्य करणे, युद्ध घोषणा करणे इत्यादी. या प्रक्रियेत निष्पाप नागरिकांचा बळी जातो, हे माहीत असूनही राजकारणी या कृती करतात, तेव्हा त्यांची नतिकता कशी मोजावी? व्यापक देशहितासाठी नागरिकांशी खोटे बोलणे, त्यांच्यावरच नजर ठेवणे, चुकीची माहिती पसरविणे, बळाचा गरजेपेक्षा जास्त वापर करणे, गुप्तता पाळणे, प्रसंगी आणीबाणी आणणे, कधी कधी देशाच्या विरोधात प्रचार करणे (इंदिरा काळातील ‘परकीय हात’ प्रचार आठवा). या सामान्य जीवनात अनतिक मानल्या जाणाऱ्या कृती राजकीय जीवनात नतिक कशा ठरतात? या प्रकारचे प्रश्न प्रक्रियेचे नीतिशास्त्र उपस्थित करते.
धोरणाचे राजकीय नीतिशास्त्र कोणते निर्णय नतिकदृष्टय़ा योग्य आहेत, हे विचारण्यापेक्षा कोणते निष्कर्ष स्वीकारणे धोरणात्मकदृष्टय़ा आवश्यक आहे आणि नागरिकांची इच्छा नसली तरी त्यांच्या विरोधात जाऊन, प्रसंगी बलपूर्वक त्यांची अंमलबजावणी कायद्याने करणे गरजेचे आहे असे विचारते. सामाजिक न्यायासाठी असे निर्णय घ्यावे लागतात. साधन-साध्य शुचिता असा संघर्ष येथे नसतो तर साध्यांची मूल्यात्मकता कशी निश्चित करता येते हा प्रश्न असतो.
राजकीय नीतिशास्त्र पाश्चात्त्य जगतात इतके महत्त्वाचे मानले आहे की अनेक देशांनी त्याचा खास अभ्यास अगदी सरकारी धोरण म्हणून सुरू केला आहे. उदाहरणार्थ, कॅनडात गेल्या ५० वर्षांत राजकीय स्पर्धा गळेकापू झाली. परिणामी शासकीय पातळीवरच नतिक सुधारणांची मोहीम हाती घेण्यात आली. त्यासाठी अनेक कायदे सर्वपक्षीयांनी अमलात आणले. नवे राजकीय नीतिशास्त्र अभ्यासक्रम सरकारी पातळीवर सक्तीचे करण्यात आले. राजकारणाची नतिक पातळी उंचावण्यासाठी पंतप्रधान पियरसन यांनी पुढाकार घेतला. नंतर १९९३ मध्ये पंतप्रधान ख्रिशन यांनी नतिक वर्तणुकीचा जमाखर्च ठेवण्यासाठी अधिकृतरीत्या ‘नतिक सल्लागार कार्यालय’ (the Office of the Ethics Counsellor) स्थापन केले. तिच्या कक्षेत मंत्रिमंडळ, खासदार आणि सगळी नोकरशाही यांचा समावेश केला. २००४ मध्ये रीतसर नवे नीतिशास्त्र विधेयक अमलात आणले गेले. हा धडा घेऊन ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि अमेरिका या देशांनी अशी कार्यालये व अभ्यास विभाग खास निधी उभारून स्थापन केले आणि या प्रयत्नांना यश येत आहे, अशी नोंद मायकेल अ‍ॅटकिन्सन आणि गेराल्ड बिएरिलग यांनी ‘पॉलिटिक्स, द पब्लिक अँड पोलिटिकल एथिक्स : अ वर्ल्ड्स अपार्ट’ या त्यांच्या शोधनिबंधात केली आहे.
राजकीय नीतीच्या संकल्पनेच्या विकासाला एक वेगळे वळण पीटर ब्रैनर या अमेरिकन अभ्यासकाने ‘नतिक भाग्य’ ही संकल्पना मांडून दिले. ‘डेमोक्रेटिक अ‍ॅटॉनॉमी : पोलिटिकल एथिक्स अँड मॉरल लक’ या निबंधात त्याने ही संकल्पना मांडली. त्याच्या मते, जास्तीत जास्त लोकांनी मतदानात भाग घेणे योग्य असते, हे खरे आहे. पण चांगला उमेदवार निवडून येणे हे नेहमी अनिश्चित असते. पण चांगले उमेदवार निवडून आणणे ही दैववादी बाब बनू द्यावयाची नसेल तर मतदाते म्हणून आपण स्वायत्त, विचारशील माणूस आहोत याचे भान ठेवणे आणि जबाबदार प्रतिनिधी निवडणे हे काम आपण केले पाहिजे; तरच नागरिकांचे भाग्य नियतीवादी, दैववादी न बनता त्यांना निश्चित ‘नतिक भाग्य’ बनेल, हे भाग्य आपण खेचून आणले आहे, असे त्यांना वाटेल. नतिक भाग्य व्यक्तीला आपला स्वायत्त ‘आत्म’ ओळखण्यास शिकविते, योग्य प्रतिनिधी निवडण्याची जबाबदारी शिकविते आणि आपले भाग्य, जीवन आपल्याच हाती असते, याची जाणीव करून देते. जबाबदारीने केलेले, कोणत्याही मोहाला बळी न पडणारे मतदान हे व्यक्ती व समाज यांचे ‘नतिक भाग्योदया’चे द्वार आहे, हे शिकविते.
जाता जाता : राजकीय नीतिशास्त्रास असलेला इस्लामी आयाम स्पष्ट करणारे एक महत्त्वाचे पुस्तक म्हणजे ‘इस्लामिक पोलिटिकल एथिक्स : सिव्हिल सोसायटी, प्लुरलिझम अँड कॉन्फ्लिक्ट’ (संपादक सोहेल हाश्मी, प्रिन्सेटन युनिव्हर्सटिी प्रेस, २००२). जागतिक शांततेत इस्लाम लोकशाहीच्या मार्गाने आपले योगदान देऊ शकतो, असे संपादक हाश्मी लक्षात आणून देतात.
*लेखक संगमनेर महाविद्यालय, संगमनेर येथे तत्त्वज्ञान विभागप्रमुख आणि सहयोगी प्राध्यापक आहेत.

 

article about upsc exam preparation guidance
UPSC ची तयारी :विज्ञान आणि तंत्रज्ञान
loksatta readers reactions loksatta readers opinions loksatta readers response
लोकमानस : श्रमिक ऊर्जा भांडवलाइतकीच महत्त्वाची
Loksatta kutuhal Creator of artificial intelligence Judea Perl
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे रचनाकार – ज्युडेया पर्ल
Upsc Preparation  Economics Kaleidoscope of Pre Exam career
Upsc ची तयारी : अर्थशास्त्र: पूर्व परीक्षेचा कॅलिडीस्कोप