वैराग्याच्या अभ्यासानं अंतर्मन शांत, आनंदी, संपन्नतेच्या अनुभूतीतच गढेल, याची खात्री नाही. कदाचित त्या वैराग्यानं खळबळ आणि अशांती वाढेलही. त्यासाठी अंतर्मनाच्या या घराची उदक शांती हवीच, असं बुवा म्हणाले.. त्यावर गंभीरपणे हृदयेंद्र म्हणाला..
हृदयेंद्र – तुम्ही म्हणता ते वरकरणी पाहाता धक्कादायक वाटतं, पण खोल विचार केला तर पटतं.. प्रथम वाटलं की वैराग्यानं मनात खळबळ कशी काय निर्माण होईल? मग वाटलं की खरंच आहे, आपला वैराग्याचा अभ्यास म्हणजे जणू लहान मुलाला दटावून, बळे बळे एखाद्या गोष्टीपासून रोखणंच! त्याला चॉकलेट खायचंय, आपण दटावून ओरडतो. तो गप्प बसतो, पण आतून धुमसत असतो.. खरंच गोंदवलेकर महाराज म्हणायचे की आज विद्वान खूप झालेत पण ज्ञानाचा आनंद फार थोडय़ांना आहे.. तसंच साधक खूप आहेत, पण साधनेचा खरा आनंद कितीजणांना आहे.. इतरांचं सोडा, मला तरी आहे का? बुवा तुमच्या बोलण्यानं हाच विचार मनात आला..
बुवा – ज्याच्या मनाला हा प्रश्न पडतो त्याचा मार्ग चुकणार नाही.. त्यानं फक्त धडपडूनही, खरचटूनही तो मार्ग मात्र सोडता कामा नये.. पण खरं सांगू का? नाम घेताना मन अशांत होतं, योगसाधनेनं मनातली खळबळ उमगते, ज्ञानसाधनेनंही मनातली आंदोलनं समजतात याचाच अर्थ साधना अगदी योग्य दिशेनं सुरू आहे!
हृदयेंद्र – (हसून) हो गोंदवलेकर महाराजही म्हणत की नाम घेताना विकार उफाळून येतात याचाच अर्थ आजवर ते हक्कानं या देहात नांदत होते, आता या भाडेकरूंना घर सोडायची नोटीस मिळत आहे म्हणून ते खळबळ करताहेत!
बुवा – अगदी बरोबर! तेव्हा मनावर सक्ती सुरू आहे म्हणून खळबळ वाढत आहे, हेच काही साधनेनं खळबळ वाढण्याचं एकमात्र कारण नसतं. बरेचदा साधनेनं मन शुद्ध होण्याची जी प्रदीर्घ प्रक्रिया सुरू होते तिचाच ही खळबळ म्हणजे एक भाग असतो.. पण वैराग्याच्या अभ्यासानं जेव्हा अंतरंगात खळबळ उत्पन्न होते तेव्हाही तिची सूक्ष्मपणे छाननी केली पाहिजे. ही खळबळ कशातून आली? जी ओढ तुटली पाहिजे किंवा तुटणार आहे ती तोडू न देण्याच्या धडपडीतून आली का? याचंही निरीक्षण केलं पाहिजे. असं निरीक्षण हे देखील या अभ्यासाचाच महत्त्वाचा भाग आहे. मग त्या धडपडीतला फोलपणा जाणवू लागेल. ज्या जगावर मी विसंबून आहे, ज्या जगाच्या आधारासाठी मी आसुसलो आहे, ज्या जगाचं प्रेम मिळविण्यासाठी मी कष्टी आहे त्यातला फोलपणा, अशाश्वतपणा, क्षणिकपणा उमगल्याशिवाय राहाणार नाही. मग जगावर प्रेम करूनही अंतरंगात अपेक्षायुक्त आसक्ती उरणार नाही. स्वार्थ आणि संकुचितपणा उरणार नाही. परमात्म्याची खरी ओढ, भले ती क्षीण का असेना, पण लागेल! त्यासाठी ही उदक शांती आहे! ती डोईवर आहे.. कारण हे डोकंच मोठा घात करतं! हृदयेंद्रजी, गोंदवलेकर महाराज म्हणत ना? विचार हा तलवारीच्या धारेसारखा आहे. तो सरळ गेला नाही, तर घात करतो.. अगदी तसं हे डोकं सरळ असेल तर ठीक, नाहीतर ते किती घात करील, सांगता येत नाही! त्यामुळे उदक शांती डोई चोळूं! आणि ती चोळता चोळता अहंकाराची शेंडी पिळायची आहे! आता शेंडी कुणी ठेवतं का?
हृदयेंद्र – आता पोनी टेल आल्ये! या कर्मूनंही काही काळ केस वाढवून पोनी टेल ठेवून पाहिली.. अर्थात त्याला सगळंच शोभतं म्हणा..
कर्मेद्र – तरीच म्हटलं मला इतका वेळ एकही टोला कसा मारला नाही? माझे सगळे मित्र खरेखुरे आध्यात्मिक झाले की काय? (सगळे हसतात) बुवा, यांच्या कौतुकातसुद्धा उपरोधाचा बारकासा खडा असतो बरं का, तो पटकन कळत नाही.. पण असो.. तर आता शेंडी तेवढीशी दिसत नाही.. पण अहंकार तरी कुठे दिसतो? पण असतोच ना?
ज्ञानेंद्र – (कौतुकानं) वा! कर्मू तूसुद्धा साहित्यिक होऊ शकतोस..
बुवा – तर मुद्दा हा की वैराग्याचा अभ्यास होत आहे, या साधनधाम अंतर्मनाची उदक शांती होत आहे आणि मग लक्षात येतंय साऱ्याचं मूळ अहंकारच आहे.. त्याचीच शेंडी पिळी पाहिजे..
चैतन्य प्रेम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अभंगधारा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Power of the head
First published on: 22-07-2015 at 05:12 IST