इडा व पिंगला या नाडय़ांची गती नियमित करणे, हा प्राणायामाचा मुख्य हेतू आहे. पण तसं म्हटलं तर तो काहीच नव्हे, असं नमूद करीत स्वामी विवेकानंद सांगतात, ‘‘काही विशिष्ट प्रमाणात हवा आत घेणे, एवढाच त्याचा अर्थ आहे. रक्त शुद्ध करण्याव्यतिरिक्त त्याचा अधिक काहीच उपयोग नाही. प्राणायामाबरोबर आपण जी हवा आत घेतो आणि जी रक्तशुद्धीसाठी वापरली जाते, त्या हवेमध्ये ‘गूढ’ असे काहीच नाही. ही केवळ एक शारीरिक प्रक्रिया आहे’’ स्वामीजी ‘राजयोगा’तही सांगतात की, ‘‘लोक साधारणपणे समजतात की, ‘प्राणायाम’  म्हणजे श्वासोच्छ्वासासंबंधी काहीतरी – श्वासोच्छ्वासाची काही विशिष्ट क्रिया. पण वस्तुस्थिती तशी नाही. श्वासोच्छ्वासाशी प्राणायामाचा संबंध असला तरी तो खरोखर अगदीच थोडा आहे. खराखरा प्राणायाम साधण्यासाठी ज्या अनेक क्रिया कराव्या लागतात त्यापैकी श्वासोच्छ्वासाचे नियमन ही केवळ एक क्रिया आहे इतकेच. प्राणायाम म्हणजे प्राणाचा संयम’’ आता प्राणायामाद्वारे काही विशिष्ट प्रमाणात हवा शरीरात घेतली जाते, इथवर श्वासोच्छ्वासाचा संबंध आला. पण त्यातून आणखी कोणकोणत्या क्रिया आतमध्ये घडत असतात? स्वामीजी सांगतात, ‘‘प्राणायामाने जेव्हा इडा व पिंगला यांची गती नियमित होऊन अत्यंत सूक्ष्म होते तेव्हा आपण ‘प्राण’ नामक मूलभूत शक्तीपर्यंत पोहोचतो. विश्वात सर्व ठिकाणी दिसून येणाऱ्या सर्व प्रकारच्या क्रिया ह्य़ा प्राणाचीच निरनिराळी रूपे आहेत. हा प्राणच विद्युतशक्ती आहे, हा प्राणच चुंबकशक्ती आहे. विचारांच्या रूपाने आपल्या मेंदूतील प्राणच बाहेर पडतो. विश्वातील सर्व वस्तू प्राणमय आहेत. सर्व वस्तू प्राणशक्तीच्या स्पंदनाचीच कार्ये आहेत. या प्राणाच्या स्पंदनाचे सर्वोच्च कार्य म्हणजे ‘विचार’. इडा व पिंगला या नाडय़ा प्राणाच्या द्वारे कार्य करीत असतात. विविध शक्तींचे रूप घेऊन हाच प्राण शरीराच्या विविध भागांची हालचाल करीत असतो.. काम करीत असताना आपण थकतो, याचं कारण असं की आपली बरीचशी प्राणशक्ती खर्च झालेली असते. प्राणायामामुळे श्वासोच्छ्वासाचे नियमन होते व प्राणाची गती नियमित होते. जोपर्यंत प्राणाची गती नियमित असते तोपर्यंत सर्व काही ठीक चालते’’ (‘आत्मसाक्षात्कार’ ग्रंथातील साधनेसंबंधी काही सूचना). थोडक्यात, प्राणाची गती नियमित करीत प्राणशक्तीवर ताबा मिळविणे, प्राण जिंकणे, हा प्राणायामाचा खरा हेतू आहे. पूर्वीच्या काळी राजे दुसरं राज्य जिंकायला निघत तेव्हा प्रथम आपल्या राज्याजवळचा प्रांत जिंकून घेत. त्याप्रमाणेच आपण प्राण का जिंकला पाहिजे, हे सांगताना स्वामीजी म्हणतात, ‘‘ज्या गोष्टी अगदी जवळ आहेत त्यांना जिंकण्यापासून सुरुवात करणे अगदी उचित. जगातील सर्व गोष्टींमध्ये आपल्याला सर्वात जवळची गोष्ट म्हणजे देह आणि मन. जो प्राण सर्व विश्वात खेळत आहे त्याचा जो अंश आपलं हे शरीर आणि मन चालवत आहे तो प्राणांश आपल्याला सगळ्यात जवळचा आहे. हा लहानसा प्राणतरंग जिंकला तर प्राणसमुद्र जिंकण्याची आशा बाळगता येईल.’’