मूलकण भौतिकीत संशोधन करून भौतिकशास्त्र संशोधनात मोलाचा वाटा उचलणारे, तसेच भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका निभावणारे भौतिकशास्त्रज्ञ प्रा. भालचंद्र माधव उदगावकर यांचे रविवारी झालेले निधन, ही वैज्ञानिकांनाही भावनिक करणारी घटना होती. अत्यंत अभ्यासू आणि विज्ञानाच्या प्रसारासाठी सदा तत्पर अशी त्यांची विशेष ओळख होती.
मुंबईतच शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी काही काळ सिद्धार्थ महाविद्यालयात प्राध्यापकी केली. डॉ. होमी भाभा यांच्या मार्गदर्शनाखाली १९४९ मध्ये ते मुंबईच्या टाटा मूलभूत विज्ञान संशोधन संस्थेत संशोधक विद्यार्थी म्हणून दाखल झाले. तेथे त्यांनी मूलकण भौतिकीत त्यांनी संशोधन केले. भाभा यांच्या मूलकण सिद्धान्तावर त्यांचे प्रबंध प्रसिद्ध झाले. अणुऊर्जेचा अभ्यास करण्यासाठी ते १८ महिने फ्रान्सला गेले. तेथून परतल्यावर त्यांनी भाभा अणुसंशोधन केंद्रातील अप्सरा या अणुभट्टीच्या उभारणीपूर्वी, सैद्धान्तिक तयारीच्या समूहात काम केले. शालेय व विद्यापीठ स्तरावर विज्ञान शिक्षणात आमूलाग्र बदल होणे गरजेचे असल्याची गरज ओळखून त्यांनी सर्वप्रथम मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनाही टाटा मूलभूत विज्ञान शिक्षण संस्थेच्या प्रयोगशाळेत येण्याची संधी उपलब्ध करून दिली. हाच ‘विद्यार्थी भेट संशोधन कार्यक्रम’. यातूनच पुढे टाटा मूलभूत विज्ञान संशोधन संस्थेच्या अंतर्गत होमी भाभा विज्ञान शिक्षण संस्थेची स्थापना करण्याची संकल्पना त्यांनी मांडली. या संस्थेच्या अध्यक्षपदी ते १९७५ ते १९९१ पर्यंत होते. ही संस्था आजही विज्ञान शिक्षणात मूलगामी काम करीत आहे.
अणुऊर्जा विभागाच्या अणू विज्ञान मंडळाचे अध्यक्ष (१९७९ ते १९८६), अणुऊर्जा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष (१९८८ ते ९०) अशी पदे सांभाळणारे प्रा. उदगावकर विद्यापीठ अनुदान आयोग तसेच भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषदेवर सदस्य होते. नियोजन आयोगाच्या उपाध्यक्षांचे विशेष सल्लागार म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिले. भारतीय भौतिकशास्त्र असोसिएशनचे ते पहिले अध्यक्ष होते. याचबरोबर मराठी विज्ञान परिषदेचेही ते १९८२ ते १९९१ या काळात अध्यक्ष होते. विज्ञान क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा गौरव १९८५ मध्ये ‘पद्मभूषण’ किताबाने झाला. अणुशांततेसाठी काम करणाऱ्या वैज्ञानिकांची ‘पेग्वाश’ नावाची आंतरराष्ट्रीय संस्था १९९५ मध्ये शांततेच्या ‘नोबेल’ची मानकरी ठरली होती, त्या वेळी प्रा. उदगावकर हे या संस्थेचे सदस्य होते. प्रा. उदगावकर यांनी शिक्षण, विज्ञान-तंत्रज्ञान आणि विकास, जागतिक अणुविज्ञान आदी विषयांवर भरपूर लिखाण केले आहे. त्यांच्या लिखाणातील निवडक भाग होमी भाभा विज्ञान संस्थेतर्फे प्रसिद्ध करण्यात आला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Dec 2014 रोजी प्रकाशित
प्रा. भालचंद्र उदगावकर
मूलकण भौतिकीत संशोधन करून भौतिकशास्त्र संशोधनात मोलाचा वाटा उचलणारे, तसेच भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका निभावणारे

First published on: 23-12-2014 at 12:06 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prof bhalchandra udgaonkar profile