या कादंबरीचा नायक एकदम फिल्मी आहे. तो मुंबईला अणुहल्ल्यापासून वाचवतो, पाणबुडीतून बाहेर पडून अणुबॉम्ब निकामी करतो आणि भारत-पाकिस्तान यांना आणि पर्यायाने जगालाच तिसऱ्या महायुद्धापासून वाचवतो. तरीही शेवट मात्र उत्कंठावर्धक आहे.
रजनीकांतचे अनेक विनोद आजकाल व्हॉट्सअपवर फिरत असतात. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, रजनीसरांमुळे.. मलेशियाचे गायब झालेले विमान म्हणे रजनीसरांनी स्वीमिंग पुलमध्ये दडवून ठेवले आहे.. इत्यादी इत्यादी अतक्र्य तर्कटं त्यात मांडलेली असतात. अर्थात त्यामागचा उद्देश निखळ मनोरंजनाचा असतो. ब्रिजेशसिंग लिखित ‘क्वान्टम सीज’ या कादंबरीचा नायकही अस्साच रजनीकांतसारखा. तो एकटय़ाने मुंबईला अणुहल्ल्यापासून वाचवतो, पाणबुडीतून बाहेर पडून अणुबॉम्ब निकामी करतो आणि भारत-पाकिस्तान यांना पर्यायाने जगालाच तिसऱ्या महायुद्धापासून वाचवतो, ही या पुस्तकाची वनलाइन स्टोरी. मग त्यात थरार, नाटय़, पोलिसी-लष्करी खाक्या, अनागोंदी, नायकाची पत्नी व प्रेयसी इत्यादी मसाला ओघाने आलाच. कादंबरीचा शेवट मात्र उत्कंठावर्धक आहे. एकंदर प्रकरणाची अखेर काय होणार याची जाणीव असूनही शेवटच्या पानापर्यंत पुस्तक वाचावेसे वाटते, याबद्दल नवकादंबरीकार ब्रिजेशसिंग यांना सलाम.
काश्मीरचे भिजत घोंगडे एकदाचे मिटवून टाकून काश्मीरला आझाद करण्याची योजना लष्कर ही पाकिस्तानी दहशतवादी संघटना आखते. मुंबईनजीकच्या समुद्रात अणुबॉम्ब पेरून त्याच्या बळावर तीन दिवसांत काश्मीर स्वतंत्र करण्याचा लष्कराचा इरादा असतो. पाकिस्तानी सरकारलाही या संदर्भात अंधारात ठेवले जाते. भारतीय पंतप्रधानांच्या कार्यालयात एका निनावी दूरध्वनीद्वारे अणुबॉम्ब पेरल्याची माहिती दिली जाते.. आणि मग येथूनच थरारनाटय़ाला सुरुवात होते. मुंबई पोलीस दलातील दहशतवादविरोधी पथकाचा प्रमुख रुद्रप्रतापसिंग याला बनावट चकमकी रचून निष्पापांना यमसदनी पाठवल्याचा ठपका ठेवून सीबीआयने अटक केलेली असते. रुद्रप्रतापसारख्या निधडय़ा छातीच्या आणि देशप्रेमी अधिकाऱ्याला अटक झाल्याने दहशतवादविरोधी पथकाचे मनोधैर्य खचलेले असते. अशा परिस्थितीत मुंबईला अणुहल्ल्यापासून वाचवण्यास रुद्रप्रतापच समर्थ असल्याचे मुंबईचे पोलीस आयुक्त केंद्रीय गृहसचिवांना पटवून देतात आणि काही अटींवर रुद्रप्रतापची सुटका करवून घेत त्याच्याकडे अणुबॉम्ब निकामी करण्याच्या मोहिमेचे नेतृत्व सोपवतात. मग रुद्रप्रताप त्याच्या अचाट बुद्धीच्या जोरावर दहशतवाद्यांचे नापाक इरादे नेस्तनाबूत करतो आणि कहाणी सुफळ संपूर्ण होते.
या संपूर्ण कादंबरीत रुद्रप्रताप हाच एकमेव तारणहार असल्याचे वाचकांच्या मनावर पद्धतशीररीत्या बिंबवण्यात येते. मात्र, त्याची ओळख कादंबरीकार व्यवस्थितरीत्या करून देत नाही. त्याच्याभोवती एवढे वलय का आहे, त्याने भूतकाळात अशी काय अचाट कामगिरी केली आहे की ज्यामुळे त्याच्याकडेच या मोहिमेचे नेतृत्व सोपवण्यात येते याबद्दल कादंबरीकार काहीच सांगत नाही. शिवाय रुद्रप्रतापचे व्यक्तिगत आयुष्यही अगदी पुसटपणे आपल्यासमोर येते. त्याची पत्नी गरोदर आहे एवढेच सांगितले जाते. त्याच्या पत्नीची धडपणे ओळख करून न देता रुद्रप्रताप आणि त्याची रॉ या गुप्तचर संघटनेतील प्रेमिका सना यांच्यातील प्रेमसंवादावर दोन पाने खर्च केली आहेत. असे काही अंतर्विरोध या कादंबरीत आहेत.
अणुहल्ला रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या जाव्यात वगैरेची चर्चा केंद्रीय पातळीवर होतानाच दिसत नाही. केंद्र सरकार सर्व सूत्रे मुंबई पोलीस दलाकडे सोपवते, मग हे पोलीस दल नौदलाच्या साहय़ाने खोल समुद्रात अज्ञात ठिकाणी लपवलेला अणुबॉम्ब निकामी करण्याची संयुक्त मोहीम आखते. अणुबॉम्ब निकामी करण्याऐवजी पाणबुडीचा कमांडर हा अणुबॉम्ब पाकिस्ताननजीकच्या समुद्रात फोडण्याचा अविचार करतो आणि मग त्याला रोखण्यासाठी नायक पाणबुडीतून स्वत:ची सुटका करून घेत अणुबॉम्बपर्यंत पोहोचतो. तिथे तो बॉम्ब निकामी करण्यासाठी प्रयत्न करीत असतानाच हा कमांडर त्याला रोखण्यासाठी आणखी दोघांना पाठवतो. समुद्रतळाशी घडलेल्या या थरारनाटय़ात अर्थात नायकाचाच विजय होतो असा तद्दन फिल्मी  किंवा रजनीकांत स्टाइल या पुस्तकाचा शेवट आहे.
नाही म्हणायला कादंबरीकाराने भरपूर मसाला वापरला आहे. मुंबईवर अणुहल्ला झाल्यास त्याची ग्रॅव्हिटी किती असेल, त्यात कितपत जीवितहानी होईल, किरणोत्सार कितपत होईल वगैरेची सम्यक चर्चा यात आहे. मुंबईवर अणुहल्ला होणार ही बातमी  ब्रेकिंग न्यूजलोलुप प्रसारमाध्यमे फोडतात. त्यामुळे शहरातील अनागोंदीला सुरुवात होते. प्रसारमाध्यमांच्या या आततायीपणावरही बोट ठेवले आहे. अणुहल्ल्याच्या बातमीने हादरलेला प्रत्येक जण मिळेल त्या वाहनाने शहराबाहेर पडण्यासाठी धडपडतो. त्यामुळे निर्माण होणारा गोंधळ अर्थातच वास्तवाला धरूनच आहे. पण भारत-पाक पंतप्रधानांमध्ये होणारे संभाषण अगदीच त्रोटक आहे. अणुहल्ला झाल्यास पाकिस्तानला जगाच्या नकाशावरून पुसून टाकण्याची भारताची धमकी, अमेरिकेची मध्यस्थी, पाकिस्तानातील वातावरण, लष्करच्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी भारतीय सैन्याने अबोटाबाद स्टाइल केलेला हल्ला हे या पुस्तकाचे यूएसपी आहेत.
दशकभरापूर्वी अजय देवगणचा ‘कयामत- सिटी अंडर थ्रेट’ या नावाचा चित्रपट आला होता. त्यात मुंबईत मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या परळ येथील तुरुंगातील कैद्यांना तीन पाकिस्तानी दहशतवादी ओलीस धरतात. त्यांच्या सुटकेसाठी ते सरकारकडे १५०० कोटी रुपयांची खंडणी मागतात. मागण्यांची पूर्तता न झाल्यास मुंबईवर जैविक अस्त्रांचा हल्ला करण्याची धमकी ते देतात. या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी पोलीस अधिकारी असलेला सुनील शेट्टी अखेरीस कैदी अजय देवगणची मदत घेऊन मुंबईला जैविक हल्ल्यापासून वाचवतो, असे या चित्रपटाचे कथानक होते. ‘क्वान्टम सीज’ वाचताना नेमकी याच चित्रपटाची आठवण होते. हा निव्वळ योगायोग मानायचा कि दोन्हीतील हे साधम्र्य आश्चर्यकारक मानायचे हा प्रश्न निदान काही वाचकांना तरी पडण्याची शक्यता नाकारता येत नाहीच.
क्वान्टम सीज : ब्रिजेशसिंग,
पेन्ग्विन बुक्सब्ल्यू सॉल्ट, नवी दिल्ली,
पाने : २५६, किंमत : २५० रुपये.