झारखंडचे पहिले बिगरआदिवासी मुख्यमंत्री बनण्याचा मान भाजपचे रघुवर दास यांना मिळाला आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा व पंतप्रधान    नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्याशी असलेले चांगले संबंध दास यांना मुख्यमंत्रिपदापर्यंत जाण्यास उपयुक्त ठरले, तसेच ते छत्तीसगडमधील वैश्य (तेली) समाजाचे आहेत, ही पाश्र्वभूमीदेखील. बिहारमध्ये या समाजाची लोकसंख्या १० टक्के असून त्याचा राजकीय फायदा होईल असे भाजपचे गणित आहे.
 रघुवर यांचा जन्म ३ मे १९५५ रोजी झाला. त्यांचे शिक्षण बालुबासा हरिजन हायस्कूल येथे झाले व त्यांनी जमशेदपूर को-ऑपरेटिव्ह कॉलेज येथून बी.एस्सी. पदवी व तेथूनच कायद्याची पदवी घेतली. पदवीधर झाल्यानंतर ते टाटा पोलाद कारखान्यात कामगार होते. त्यांचे वडील चव्हाण राम हेही तेथेच कामगार होते. खरे तर जयप्रकाश नारायण हे त्यांचे गुरू म्हणावे लागतील. कारण जमशेदपूर येथे त्यांच्या संपूर्ण क्रांती आंदोलनात ते सहभागी झाले व त्यानंतर अनेक ज्येष्ठ नेत्यांशी त्यांची गया येथील तुरुंगात गाठभेट झाली. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादली, तेव्हाही त्यांनी तुरुंगवास पत्करला. १९७७ मध्ये ते जनता पक्षात आले व नंतर १९८० मध्ये भाजपचे संस्थापक सदस्य बनले. १९८० मध्ये भाजपच्या कार्यकारिणीचे पहिले अधिवेशन झाले तेव्हा त्यांना सीतारामेडरा मंडलाचे प्रमुख नेमण्यात आले. नंतर ते जमशेदपूर शहर भाजपचे सचिव झाले व नंतर उपाध्यक्ष बनले. १९९५ मध्ये जमशेदपूर पूर्व मतदारसंघातून ते बिहार विधानसभेवर निवडून आले व तोच मतदारसंघ त्यांनी कायम राखला. यंदा ते ७० हजार मतांनी निवडून आले आहेत. २००४-०५ मध्ये ते झारखंड भाजपचे प्रदेशाध्यक्ष बनले. नंतर त्याच वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ३० जागा जिंकल्या, हे यश मोठे होते. नंतर ते पुन्हा २००९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी प्रदेशाध्यक्ष होते. १६ ऑगस्ट २०१४ रोजी ते भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष झाले. झारखंडमध्ये शिबू सोरेन मुख्यमंत्री असताना दास उपमुख्यमंत्री होते. अर्जुन मुंडा मुख्यमंत्री असताना ते नगरविकासमंत्री होते.
ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य आहेत, त्यामुळे संघाची तत्त्वे त्यांच्यात मुरलेली आहेत. मात्र वाद त्यांनाही चुकले नाहीत. उपमुख्यमंत्री असताना २०१० मध्ये रांचीतील सांडपाणी वहन यंत्रणेसाठी त्यांनी सिंगापूरच्या मेनहार्ड कंपनीवर केलेली मेहेरबानी त्यांना नडली. विधानसभेच्या उच्चस्तरीय समितीने त्यांना दोषी ठरवले. निवडणूक आचारसंहिता असताना ते पूर्वी मुख्यमंत्री अर्जुन मुंडा यांच्यासमवेत खास चार्टर्ड विमानाने रांचीहून छैबासाला गेले होते. ते प्रकरण ‘कोब्रा पोस्ट’ने उजेडात आणले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raghubar das profile
First published on: 30-12-2014 at 12:16 IST