मोदी मंदिरे बांधण्याऐवजी शौचालये बांधा असे सांगतात, तेव्हा ती केवळ माताभगिनींना शौचालयांअभावी जे भोगावे लागते त्याविषयीची तळमळ नसते, की तरुण श्रोत्यांसमोर केलेले अवसरविनोदनही नसते. ते धोरणांतील बदलांचे द्योतक असते.
स्त्री ही अनंत काळची माता असते, हे शाश्वत वैश्विक सत्य आहे. स्त्रीच्या मनी मातृत्वाचा उमाळा दाटून आला, की सारे भवताल तिला मुलासारखे भासू लागते, आणि त्यावर आपल्या मायेची पाखर घालण्यासाठी ती आतुरून जाते. ती आपले भौतिक अस्तित्व आणि स्वत्व विसरते. असा ‘मातृसोहळा’ अनुभवण्याचे भाग्य आपल्या देशाला इतिहासात अनेकदा लाभले आहे. आधुनिकीकरणाच्या वादळातही मातृत्व ही एकमेव संकल्पना मात्र, बदलाची असंख्य वादळे सहजपणे परतवून ठामपणे तितक्याच पावित्र्याने उभी आहे.
खरे तर मातृभावामागे असलेल्या मायाळूपणापुढे सारे सारे क्षुल्लक असते. परंतु राजकारण हे एक अजब रसायन आहे. राजकारणात दुसऱ्याच्या भावनांना, अश्रूंना फारसे स्थान नसते, असे आजवरच्या अनुभववावरून आपण मानत आलो आहोत. पण त्या कल्पनांना आता बहुधा पूर्णविराम द्यावा लागणार आहे. संवेदनशील राजकारणाचे असंख्य हळवे पलू आपल्या देशात, आपल्याच आजूबाजूला अक्षरश पखरून पडले आहेत. निवडणुकीच्या राजकारणाला आईच्या अश्रूंच्या संवेदनशीलतेचे पदर जोडून निवडणुकांची नवी राजनीती सुरू झाली आहे. कारण,  राजकारणात अत्युच्च पदावर असलेल्या महिलेच्या मातृत्वाचा झरा वाहात आता मतदारांपर्यंत पोहोचला आहे. सभोवतालची सारी मतदार मने त्या मायेच्या ओलाव्याने चिंबचिंब होऊन जावीत आणि आणि मायेचे ओघळ ओथंबून ओसंडू लागावेत, असे काहीसे अनपेक्षित असे अश्रूंचे राजकारण आकाराला येऊ घातले आहे.
अशा वेळी  त्याकडे तटस्थतेने पाहण्याची सवय करावी लागेल, किंवा त्यापुढे पुरते झुकावे लागेल. मतदाराच्या मानसिकतेची परीक्षा पाहणारा निवडणुकीच्या राजकारणाचा पहिलाच अंक पडदा उघडताच अशा अनपेक्षिताने सुरू झाला आहे. कारण मातृप्रेम हा प्रत्येकाच्याच मनाचा हळवा कोपरा असतो. नेमके हेच हळवेपण साधून मध्य प्रदेशातल्या आदिवासींच्या भावनांवर आगळ्या मातृभावाचा एक लोंढा अचानक आदळल्याने सारे राजकारण ढवळून निघणार आहे. काँग्रेस महासमितीच्या अध्यक्षा, भ्रष्टाचाराच्या आरोपांनी आणि सरकारच्या नाकत्रेपणामुळे खदखदणाऱ्या नाराजीच्या भावनांनी जनतेच्या मनात तिरस्करणीय ठरलेल्या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची आजवरची प्रतिमा त्यांच्याच डोळ्यातून पाझरलेल्या मातृभावाच्या आसवांनी पुसण्याचा आपल्यापरीने प्रयत्न त्यांच्या मातृभक्त पुत्राने मध्य प्रदेशातील एका मतदारसंघात निवडणूक प्रचारसभेत केला.
सत्ताकारणाच्या सर्वेसर्वा असल्या तरी सोनिया गाधी यादेखील आई आहेत, आणि त्यांच्या हृदयात केवळ राहुल आणि प्रियांकासाठीच नव्हे, तर ज्या देशाच्या सरकारचे त्या नेतृत्व करतात, त्या देशातील प्रत्येक सजीवासाठी मातृत्वाचा अखंड झरा झुळझुळता आहे, असा संदेश या राजकारणी पुत्राने दिला. तो अलौकिक संदेश देण्यासाठी या मातृभक्त पुत्राला नेमके निवडणुकीच्या प्रचार सभेचा मंच हीच जागा सापडल्याने, या संदेशाचा राजकीय अलौकिकपणा पुरेसा स्पष्ट झाला आहे. आईच्या अश्रूंना राजकारणाचे रंग चढविण्याचा हा खेळ परिपक्व राजकारणावर कुरघोडी करणार का, हा आता कळीचा मुद्दा ठरणार आहे.
राष्ट्रकार्यासाठी सज्ज झालेल्या आपल्या मुलाने काँग्रेस महासमितीमधील पदभार स्वीकारून सत्ताकारणात पहिले पाऊल टाकले, तेव्हाच सोनिया गांधींच्या मातृहृदयाची कालवाकालव झाली होती, असे म्हणतात. राहुलने काँग्रेसच्या उपाध्यक्षपदाचा भार खांद्यावर घेतला, त्याच्या आदल्या रात्री राहुलच्या खोलीत सोनिया गांधींचे मातृहृदय अशाच प्रेमाने पाझरले. राहुलला उराशी कवटाळून सोनिया गांधींनी त्या वेळी दिलेल्या अश्रूभरल्या संदेशाला लगेचच राजकारणाची किनार चिकटविली गेली. तोच संदेश आजही देशाच्या कानात घुमविला जात आहे. सत्ता हे विष आहे, ही आईची शिकवण मनावर कोरून घेऊनच हा मुलगा राजकारणात उतरला. राहुल गांधींच्या राजकारणातील परिपक्वतेवरील प्रश्नचिन्ह अजूनही पुसले गेलेलेच नाही. किंबहुना, त्यांच्या राजकारणाला बालिशपणाची किनार आहे, असे अनेक नेत्यांनाही वाटत राहिले आहे. असे राजकारण निवडणुकीच्या मदानातील मातब्बर नेत्यांसमोर किती टिकाव धरेल याची धाकधूक उघडपणे व्यक्त करण्याचे धाडस मात्र काँग्रेसमध्ये कोणातही नाही. कारण गांधी घराण्याचा काँग्रेसला फायदा आहे. जोपर्यंत काँग्रेसला फायदा आहे, तोवर काँग्रेस गांधी घराण्याशी बांधील राहणार आहे. काँग्रेसचे मणिशंकर अय्यर तसे बोलून गेले आहेत. उद्या त्यांना घूमजाव करावे लागणारच नाही, असे नाही. पण राहुलच्या राजकारणातून काँग्रेसच्या फायद्या तोटय़ाची गणिते मांडण्यास कुठेतरी सुरुवात झाली आहे, एवढे अय्यरवाणीतून सूचित झाले आहे.
कोणत्याही प्रसंगी आपली आई कसे वागेल, ती कसा विचार करेल आणि तिला काय वाटेल असा विचार करून त्यानुसार आचरण करणारी आदर्श मुले आजकाल दिसत नाहीत, अशी खंत जुन्या पिढीत वारंवार व्यक्त होत असते. महाराष्ट्रात तर, आपल्या बुजुर्ग पिढय़ांना अडगळीत टाकण्याची राजकीय अहमहमिकाच लागलेली दिसते. कुणी पुतण्या काकाच्या विरोधात दंड थोपटतो, तर कुणी काकांना केवळ आशीर्वादापुरते पुढे या असा थेट सल्ला देऊन त्याची जागा दाखविण्यासाठी संधी शोधतो. अशा वेळी राहुलच्या मातृभक्तीमुळे राजकारणातच एका आगळ्या संस्कृतीची पहाट फुलविण्याचा हा नवा प्रयोग आहे.  देशातील एकही व्यक्ती उपाशी किंवा भुकेल्या पोटी झोपता कामा नये हे स्वप्न उराशी बाळगून केवळ तेवढय़ाच ध्यासापोटी राजकारण करणाऱ्या सोनिया गांधी संसदेत अन्नसुरक्षा विधेयकाच्या स्वप्नपूर्तीचा क्षण मात्र आजारपणामुळे अनुभवताच आला नाही, म्हणून त्यांना अश्रू अनावर झाले असे राहुल गांधी यांनी सांगितले. तेव्हा कदाचित त्या अनोख्या मातृप्रेमाच्या जाणिवेने समोरच्या श्रोत्यांची मने हेलावली असतील.
अन्नसुरक्षा कायदा हे केवळ एक विधेयक नव्हते. तर जनतेचे विधिलिखित बदलून टाकणारा एक अभूतपूर्व आनंदक्षण होता. सोनिया गांधींना मात्र, त्या आनंदापासून वंचित राहावे लागले, आणि त्यांचे मातृहृदय व्याकुळले, असे राहुल गांधी म्हणतात. देशातील महिलांच्या वेदनांनी कळवळणाऱ्या आपल्या आईची वेदना मतदारांसमोर मांडून राहुल गांधी यांनी मानसिक भावना आणि राजकारण यांचा संगम साधण्याचा प्रयत्न केला आहे. या देशात, अजूनही असंख्य लोक भुकेकंगालपणामुळे गुलामी स्वीकारून जगताहेत. गुलामीचं जिणं जगणाऱ्या जगभरातील लोकसंख्येतील सर्वाधिक लोकसंख्या भारतात आहे, असा एक अहवाल राहुल गांधी यांच्या प्रतिज्ञाकाळातच देशासमोर यावा हा एक योगायोग आहे. अश्रूंचे राजकारण अशा वास्तवावर मात करण्यासाठी पुरेसे ठरेल का याचा विचार काँग्रेसला करावा लागणार आहे. राहुलमातेला देशातील जनतेच्या अन्नसुरक्षेचे स्वप्न पडले, पण वेठबिगारी आणि गुलामगिरीच्या जोखडाखाली जगणाऱ्यांच्या जगात भारत आजही आघाडीवरच आहे हे वास्तव राहुल गांधीसमोर उभे आहे. अशा पिचून गेलेल्या जनतेला आईने कधीतरी ढाळलेल्या अश्रूंची सोबत देऊ करून मातृभक्त राहुलने काँग्रेसी राजकारणावर ‘मातृछाया’ उभी केली आहे. या छायेत किती काळ रमायचे, हे मतदार ठरवतीलच.