रोहतकच्या दोन बहिणींनी, आरती आणि पूजाने दाखवलेल्या शौर्याचे कौतुक होते आहे. वास्तविक, हरयाणा परिवहन मंडळाच्या बसमध्ये हे शौर्य त्या दोघींना दाखवावे लागले, याची लाजही  इतरांना वाटावयास हवी. बसमधील तरुणांनी त्यांच्याकडे पाहून अश्लील हावभाव आणि शेरेबाजी केली. त्यांच्या कृतीला दोघींनी आक्षेप घेऊनही या टग्यांना अधिकच चेव चढला. जाब विचारण्यासाठी गेलेल्या आरतीचा गळा पकडून तिला ओढण्याचा प्रयत्न त्या तीन तरुणांनी केला. आपल्या बहिणीच्या मदतीला गेलेल्या पूजाने अखेर पट्टा काढला आणि त्या तरुणांना  फटके लगावण्यास सुरुवात केली. तरुणांनी दोघींनाही मारहाण करीत बसमधून बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला. हा सगळा    प्रकार चालत्या बसमध्ये सुरू असताना चालक आणि वाहक, अन्य प्रवासी केवळ बघ्याच्या भूमिकेत होते. एवढेच नव्हे तर या दोघींना मदत करण्याऐवजी ‘तुम्ही त्या मुलांना सोडून द्या. नाही तर ते बलात्कार करतील किंवा तुम्हाला मारून अशा ठिकाणी टाकतील की प्रेतसुद्धा सापडणार नाही,’ असा सल्लाही देण्यास ते विसरले नाहीत. त्या मुलींना बसमधून बाहेर फेकून देण्यात ते तरुण     यशस्वी झाल्यानंतर काही अंतरावर जाऊन बस थांबली. त्या वेळी बसच्या वाहकाने पोलिसांत तक्रार करण्याचा ‘सल्ला’ या मुलींना दिला. पोलीस ठाण्यात दोघींनी तक्रार नोंदवली. ही घटना इथेच संपत नाही. त्या घटनेचे चित्रण बसमधील एका महिलेने केले आणि तो व्हिडीओ सर्वत्र प्रसारित झाल्यानंतर पोलिसांसह स्थानिक प्रशासनाला जाग आली. पोलिसांनी दीपक, मोहित आणि कुलदीप या तिघांना अटक केली. तरीही या मुलांच्या गावातील पंचायतीचे सदस्य त्या मुलींच्या वडिलांकडे येऊन हे प्रकरण मिटवण्यासाठी दबाव आणत होते. तिन्ही मुलांना लष्करात भरती व्हायचे असल्याने मुलींनी त्यांना माफ करावे आणि पोलीस तक्रार मागे घ्यावी, असा प्रस्ताव त्यांनी त्यांच्या वडिलांसमोर ठेवला. छेडछाड करणाऱ्या मुलांनी मात्र त्या तरुणींची माफी मागण्यास नकार दिलेला आहे.. न मागता या दिवटय़ांना माफी हवी आहे. हरयाणातच नव्हे तर प्रत्येक राज्यात ठिकठिकाणी मुलींना, महिलांना छेडछाड, अश्लील शेरेबाजीला सामोरे जावे लागते. पुरुषी मनोवृत्ती आणि ‘बळी तो कान पिळी’ या वृत्तीतून काही जणींचा बळीसुद्धा अशा छेडछाडीतून गेला आहे. या घटनांमधले समान सूत्र म्हणजे पोलिसांचा थंड प्रतिसाद आणि समाजाची बघ्याची मानसिकता. हे छेडछाड करणाऱ्यांची हिंमत वाढवणारे, तर प्रतिकार करणाऱ्या मुलींचे मानसिक खच्चीकरणच करणारे आहे; पण त्यातून कोणताही धडा प्रशासन अथवा समाज घेताना दिसत नाही. त्या दोन्ही बहिणींच्या शौर्याची चर्चा करताना त्यांना हे पाऊल उचलावेच का लागले याचीही चर्चा होताना दिसत नाही. त्यांनी दाखवलेले हे शौर्य म्हणजे केवळ तिघा तरुणांना शिकवलेला धडा नव्हे.. समाजाच्या, प्रशासनाच्या नाकर्तेपणातून आलेल्या हतबलतेला दोघींनी दिलेली ती चपराक आहे. ती समाजाला लागली की नाही माहीत नाही, पण सध्या तरी समाज त्या दोघींच्याच कौतुकापुरते पाहतो आहे. लष्कराने आता त्या तिघा तरुणांना सेवेत सामावून घेणार नसल्याचे जाहीर केले आहे. हा प्रकार सुरू असताना बस थांबवण्याचे सौजन्यही न दाखवणाऱ्या चालक-वाहकांना हरयाणा परिवहनने निलंबित केले आहे. हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांनी त्या दोघींना    त्यांच्या शौर्याबद्दल बक्षीस जाहीर केले आहे. ‘सुष्टांचा विजय, दुष्टांचा नाश’ असा शेवट असलेली गोष्ट आहे का ही? छेडछाड करणाऱ्यांना एवढय़ाने जरब बसेल? किती तरी आरती-पूजा         अशा घटनांना सामोरे जात असतात, त्याला प्रसिद्धीमाध्यमांची         जोड नसल्याने त्याची परिणती नक्की कशात होते हे सांगणे कठीणच आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohtak braveheart sisters fight back eve teasers
First published on: 02-12-2014 at 12:53 IST