गर्दीलाच मुळात स्वत:चा चेहरा नाही, व्यक्तिमत्त्व नाही. त्यातही बाजारातील गर्दी म्हणजे कोणाला तरी विकत घेणारी, कोणाला तरी विकायला काढणारी किंवा कोणाला तरी खरेदी करणारी. ‘कबीरा खडा बाजार में’ असे खणखणीत सांगणारी नाही आणि आमच्यासोबत कोणाला यायचे ते या, पण हाच माझा मार्ग, असे बजावणारीही नाही.
माणूस हा प्राणीच, पण त्याची जगण्याची तऱ्हा निराळी, त्याच्या जगण्याचा बाज वेगळा. हे जगणे सुविहित आणि साधे सरळ असेही नाही. जगण्यातील गुंतागुंत प्रत्येकाची वेगळी. जगताना काही मूल्ये अंगीकारावी लागतात आणि त्यासाठी काही किंमतही चुकवावी लागते. कधीकाळी आपणच उच्चारलेल्या शब्दासाठी स्वत:ला नेटाने उभे राहावे लागते. एरवी माणूस भलेही समाजशील प्राणी वगरे असेल, पण हा त्याचा लढा एकटय़ाच्याच पातळीवर असतो. आयुष्यात असे असंख्य प्रसंग असतात, जे आपल्याला स्वत:लाच नव्याने जन्माला घालायला भाग पाडतात. म्हणजे आपला जन्म होतो एकदाच, पण आपण किती तरी वेळा नव्याने जन्माला येतो आणि किती तरी वेळा मरत असतो. अशा वेळी मरणेसुद्धा जगणेच असते. अशिक्षित माणसेसुद्धा कधी-कधी आपण दिलेला शब्द खोटा ठरू नये आणि दिलेल्या शब्दाला जागावे यासाठी त्यांचे-त्यांचे तत्त्वज्ञान वापरतात. आज एक आणि उद्या दुसरेच बोलायचे असा प्रकार घडायची वेळ येईल, तेव्हा माणसे म्हणतात, ‘अशाने जबानीला बट्टा लागेल.’ जबानीला बट्टा लागणे, ही बाब किती गांभीर्याने घेतली जाते. आपण जे बोलू त्याच्याशी ठाम असणे आणि त्यासाठी स्वत:ला सिद्ध करण्याचे मोल चुकविणे हा भाग महत्त्वाचा आणि हे एकटय़ाने करावे लागते. या गोष्टी कळपाने करता येत नाहीत.
आपण उच्चारलेल्या शब्दासाठी जो निग्रह लागतो तोच मुळात नसण्याचे हे दिवस आहेत. त्यातही असा उच्चार करण्याची आवश्यकताच मुळात किती जणांना वाटते? व्यक्त होण्याची निकड आणि दबाव किती जणांवर आहे? स्वत्व टिकवायचे असेल तर सत्त्वाचे काय? खोलवर विचार केल्यानंतर हाताशी येणाऱ्या अशा अनेक गोष्टी. आता गर्दीत उठून दिसेल असा शब्द उच्चारण्याऐवजी कळपाच्या दिशेने धावणे हीच गोष्ट सोपी झाली आहे. गर्दीला नेहमीच जबाबदारीचे वावडे असते. गर्दी ही सुरक्षित पळवाट. पाऊलवाटेवर चालताना एकटादुकटा माणूस दिसतो, पण गर्दीच्या अरण्यात पळवाटा शोधल्या, की मग कोणत्याच जबाबदाऱ्या वाटय़ाला येत नाहीत. एकटय़ाला काही प्रश्न पडतात आणि या प्रश्नांची उत्तरे शोधताना खऱ्या-खोटय़ाचा निवाडाही एकटेपणाच्या पातळीवर चाललेला असतो. काय खरे, काय खोटे हे कळतेसुद्धा; पण त्यासाठी सत्य स्वीकारण्याची, पचविण्याची तयारी ठेवणारे संख्येने कमी असतात. ‘सत्य, असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता’ ही धारणा अशा जगण्याच्या बुडाशी असते. आता होते असे की, ज्या गर्दीच्या दिशेने धावायचे, ती गर्दीच जर पुन्हा बाजारात आणून उभी करणारी असेल तर प्रश्नच मिटला.
आपण गर्दीचा भाग आहोत यापेक्षाही बाजारातला घटक आहोत, ही त्याहून आणखी चिंतेची बाब. बाजार चालतो सगळा जुळवाजुळवीवर. अनेकदा परस्पर हितसंबंधांची साखळीही हा बाजार नियंत्रित करते आणि कोणी कसे वर्तन करायचे, कोणी काय उच्चारायचे यावरही मालकी चालते ती बाजाराची. एखादी व्यक्तीच जेव्हा बाजाराची घटक होते, तेव्हा ती सत्त्वाची भाषा बोलण्यापेक्षा बाजारातला कल पाहूनच आपला वर्तन व्यवहार ठरविते. आपण स्वत: बाजारात उभे आहोत, सर्वाचे डोळे आपल्यावर रोखलेले आहेत. आपल्या मुखावाटे काय बाहेर पडते याकडे सर्वाचे कान टवकारलेले आहेत. आपल्या तोंडून जे बाहेर पडते ते नेमके किती जणांना दुखावणारे आणि कोणाची तळी उचलणारे आहे याची खातरजमा करूनच आजकाल शब्द उच्चारला जातो, कारण आपण बाजारात उभे, बाजारातले फायदे-तोटे, भरती-ओहोटी, तेजी-मंदी हे सगळे पाहूनच आपण व्यक्त व्हायचे की नाही ते ठरविणार आणि किती व्यक्त व्हायचे याबाबतही सावधानता पाळणार. तडजोड हा सगळ्या व्यवहाराचा गाभा. या सगळ्या तडजोडी ‘राखावी बहुतांची अंतरे’ अशा. खरे तर जेव्हा सत्याला साक्षी ठेवून आणि छातीवर हात ठेवून एखादा उद्गार बाहेर पडतो तेव्हा तो ‘बहुतांची अंतरे’ राखण्याची पर्वा करत नाही. आपल्या आतली जी घालमेल असते ती व्यक्त होताना प्रामाणिक किती हाच भाग महत्त्वाचा. अशा वेळी ‘राखावी बहुतांची अंतरे’ यापेक्षा ‘राखावे बहुतांशी अंतर’ हेच सूत्र जास्त पक्केठरण्याची शक्यता असते;. पण हे अंतर म्हणजे पुन्हा लोकांशी चार हात दूर असे नाही, तर परस्पर हितसंबंधाच्या कोळिष्टकांपासून आणि तडजोडींच्या सापळ्यापासून दूर हेच त्यात अपेक्षित आहे; पण बाजार असे होऊ देत नाही. बाजाराचेही काही ठोकताळे असतात. कधी कधी बाहेरच्या वेष्टनाचा आतल्या उत्पादनाशी संबंध नसतो, तर कधी सांगितले जाणारे उत्पादनाचे वैशिष्टय़ प्रत्यक्षात तसे नसतेही. मुळात बाजारातले मायावी पर्यावरण हेच कुठे तरी आतल्या उद्गाराला झाकणारे असते. बाजाराला हवी तलम दृष्टी आणि मोहमयी भाषा. आतल्या आत चिकित्सा करणारे, आतल्या आत भरडून फोलपटापासून सत्त्व निके काढणारे, कधी कधी तळ ढवळणारे आणि थेट गाभ्यालाच खरवडून काढणारे असे काहीच बाजाराला नको असते. उंच-सखलपणाही बाजाराला नको असतो. सगळे काही सरळ रेषेत आणि सपाटीकरणाला धरूनच. जबाबदारी टाळण्यासाठी किंवा प्रयत्नपूर्वक जिद्दीने उभे राहण्याऐवजी गर्दीत धूम ठोकायची आणि त्यातही पुन्हा गर्दीला आलेले बाजाराचे स्वरूप म्हणजे आणखीच बिकट वाट वहिवाट! प्रत्यक्षात गर्दी घुसणाऱ्याला सोयीचीच.
कारण गर्दीलाच मुळात स्वत:चा चेहरा नाही, व्यक्तिमत्त्व नाही. त्यातही बाजारातील गर्दी म्हणजे कोणाला तरी विकत घेणारी, कोणाला तरी विकायला काढणारी किंवा कोणाला तरी खरेदी करणारी. ‘कबीरा खडा बाजार में’ असे खणखणीत सांगणारी नाही आणि आमच्यासोबत कोणाला यायचे ते या, पण हाच माझा मार्ग, असे बजावणारीही नाही.
आपण जो शब्द उच्चारू त्यासाठी प्राणांतिक जोखीम पत्करायची तयारी, बाजाराला काय वाटेल यापेक्षा सत्य काय आहे याचा निवाडा करण्याचे साहस आणि सामूहिक जामीन घेण्याऐवजी एकटय़ाने सोसण्याची जबाबदारी या सगळ्या तिपेडी गोफातूनच काही चांगली वीण आकाराला येईल, अन्यथा ‘गर्दीत हरवली वाट’ असाच सगळा प्रवास असेल, जरी तडजोडीच्या सापळ्यात प्रत्येकालाच ही वाट सापडली असे वाटले तरीही..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

मराठीतील सर्व धूळपेर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rural market and crowd
First published on: 10-11-2014 at 06:27 IST