सतीश कामत यांच्या ‘आज.. कालच्या नजरेतून’ या सदरातील ‘ ‘साहेब’ ते ‘बाबा’’ (२९ मार्च) या  लेखात त्यांनी म्हटले आहे की, अलीकडे राजकारणात ‘साहेब’ हा शब्द तालुका किंवा जिल्हा पातळीवरील नेते, आमदार, खासदारांपासून कोणालाही उद्देशून वापरला जातो. त्याचबरोबर तो सर्वपक्षीयही झाला आहे. १९७० च्या दशकातील महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेस पक्षाचा दबदबा होता. या पक्षात वसंतरावदादा पाटील, वसंतराव नाईक, नाशिकराव तिरपुडे, बॅ. शेषराव वानखेडे, मधुकरराव चौधरी यांसारखी मातबर मंडळी होती. त्याचप्रमाणे विखे-पाटील, मोहिते पाटील सारखी तालेवार घराणीही होती. सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आश्वासक युवा नेत्याच्या टप्प्यावर होते, पण या साऱ्यांसाठी एकच ‘साहेब’ होते – यशवंतराव चव्हाण!
या संदर्भात मला ज्ञात असलेली माहिती येथे देत आहे. वाईचे क्रांतिवीर दे. भ. किसन वीर (आबासाहेब) यांच्या चरित्रग्रंथाची तयारी सुरू होती. त्या वेळी आबासाहेबांच्या चळवळीतील त्यांचे निकटचे सहकारी जमले होते. कासेगावकर वैद्य, घोरपडे,  देशपांडे इ. त्यात होते. आठवणी सांगताना घोरपडे गुरुजी यांनी सांगितल्याप्रमाणे चळवळीतील प्रमुख व्यक्तींची नावे शासनाला कळू नयेत. यासाठी काही टोपण नावे ठेवण्यात आली. यात यशवंतराव चव्हाण यांना ‘साहेब’, श्री. किसन वीर यांना ‘आबासाहेब’, ‘घोरपडे गुरुजी यांचा ‘रावसाहेब’, तर कासेगावकर वैद्य यांना ‘धन्वंतरी’ अशी नावे ठेवण्यात आली. चळवळीच्या काळात त्याचा उपयोग होई. समकालीन नेते मा. यशवंतरावजींना ‘साहेब’ नाही तर ‘यशवंतराव’ असेच संबोधत. त्यानंतरच्या काळात हा शब्द ‘वरिष्ठ नेत्यां’साठी वापरला जाऊ लागला, असे दिसते.
– डॉ. वसंत स. जोशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरस एमपीएससीच्या सव्‍‌र्हरमध्ये आणि कार्यप्रणालीतही!
कोणतीही पूर्वसूचना न देता अभ्यासक्रमापासून परीक्षेच्या तारखेपर्यंत अनाकलनीय असे बदल करून विद्यार्थ्यांना गोंधळात टाकणे हा एमपीएससीचा आता स्थायीभावच बनत चालला आहे. एक वर्षांपूर्वी अचानक उठून मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमात केलेला बदल असो, सहा महिन्यांपूर्वी पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमातील बदल असो, दोन महिन्यांपूर्वी पूर्वपरीक्षेच्या नियोजित तारखेतील बदल असो.. या सगळ्या बदलांशी विद्यार्थी जुळवून घेतो ना घेतो तोच आता सव्‍‌र्हरच्या समस्येमुळे पुन्हा एकदा परीक्षेच्या तारखेत बदल होण्याची शक्यता दिसत आहे. किती हे बदल? आणि किती हा मनस्ताप? आयोग बदल करतेय की आयोगाचा फॉर्म भरल्याचा बदला घेतेय? नुकताच यूपीएससीने एक गोंधळ घातला होता आणि त्या पाश्र्वभूमीवर एमपीएससीच्या सव्‍‌र्हरचा गोंधळ, म्हणजे गोंधळात गोंधळ घालण्यात एमपीएससी काही कमी नाही हेच आयोगाने दाखवून दिले आहे, आणि याहून िनदनीय बाब म्हणजे या गोंधळासंदर्भात जारी करण्यात आलेल्या निवेदनाची भाषा पाहिली तर आयोग आवाहन करत आहे की धमकी देत आहे तेच कळत नाही. ‘४८ तासांच्या आत माहिती अद्ययावत केली नाही तर परीक्षा प्रवेशपत्र (हॉल तिकीट) मिळणार नाही’ याला सूचना समजायचे की धमकी? इथे ग्रामीण भागात माहिती पोहोचायची बोंबाबोंब आहे आणि इतक्या कमी वेळात माहिती अद्ययावत कशी करायची?
 म्हणे यांच्या सव्‍‌र्हरमध्ये व्हायरस घुसला आणि सगळी माहिती उडून गेली, व्हायरस सव्‍‌र्हरमध्ये नव्हे तर यांच्या कार्यप्रणालीमध्ये घुसलेला आहे, तो आधी बाहेर काढा. स्पर्धा परीक्षा आयोग ही संस्था घटनादत्त आहे पण लाखो विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळण्याचा आयोगाचा अधिकार घटनादत्त नाही, पण मागील काही वर्षांपासून त्यांचे वर्तन तसेच चालू आहे. परीक्षेत एका चुकीच्या उत्तरासाठी विद्यार्थ्यांचे १/३ गुण कापले जातात मग अशा अक्षम्य आणि असंख्य चुकांसाठी आयोगाचे किती गुण कापायचे? स्पर्धा परीक्षा म्हणजे स्वत:ला वारंवार सिद्ध करण्याची स्पर्धा असते आणि ती विद्यार्थ्यांबरोबर आयोगाला ही लागू असते कदाचित एमपीएससीला याच गोष्टीचा विसर पडला असेल म्हणून हा गोंधळाचा दिवस पाहायला मिळतोय.
‘ऐन परीक्षेच्या तोंडावर आयोग तोंडघशी पडते’ जमल्यास आयोगाने या साध्या वर्तमानकाळाचे रूपांतर पूर्ण भूतकाळात करून दाखवावे, लवकरात लवकर.. हीच एक धडधाकट सव्‍‌र्हरचरणी प्रार्थना!
-उमेश स्वामी, माटुंगा, मुंबई.

मराठीतील सर्व लोकमानस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saheb is the nickname of yashwantrao in movement
First published on: 04-04-2013 at 12:17 IST