– अतुल सुलाखे  jayjagat24 @gmail.com

‘पाचव्या अध्यायाला मी गीतेच्या प्रवेशाची किल्ली मानतो. आणि या अध्यायाची किल्ली आहे गीतेच्या चौथ्या अध्यायाच्या अठराव्या श्लोकात –

कर्मी अकर्म ज़ो पाहे

अकर्मी कर्म ज़ो तसें

तो बुद्धिमंत लोकांत

तो योगी कृत-कृत्य तो ।। ’      – विनोबा.

गीतेमध्ये ‘साम्य’ शब्द दोन वेळा आढळतो. यापैकी सहाव्या अध्यायातील ‘साम्य’ शब्दासाठी विनोबांनी ‘साम्ययोग’ शब्दाची निवड केली आहे. तथापि विनोबांनी त्यांना अभिप्रेत असणाऱ्या समत्वाची चर्चा पाचव्या अध्यायातच सुरू केली आहे. गीताईच्या दृष्टीने हा अध्याय अत्यंत महत्त्वाचा आहे. संन्यास आणि कर्म या दोहोंमध्ये फरक नाही आणि गीतेचा उद्देश वादविवाद नसून समन्वय आहे याची स्पष्टता आल्यावर विनोबांनी या अध्यायापासून गीताईलेखनास आरंभ केला.

तथापि याच अध्यायात समत्वाची दोन्ही वर्णने आली आहेत आणि त्यावर चिंतन करताना विनोबांनी आपली समत्वाची कल्पना विस्ताराने मांडली आहे. याचा अर्थ गीताई आणि साम्ययोग या दोहोंच्या दृष्टीने पाचवा अध्याय महत्त्वाचा आहे. हा श्लोक असा –

प्रिय-लाभें नको हर्ष नको उद्वेग अप्रियें

बुद्धि निश्चळ निर्मोह ब्रह्मीं ज्ञानी स्थिरावला ।

– गीताई ५-२०

कोणत्याही स्थितीत चित्ताचे समत्व अढळ असावे याचे इथे वर्णन आहे. अशा ठाम आणि मोहरहित बुद्धीचा माणूस ब्रह्मस्थ असतो.

विनोबांच्या मते, निर्मोहचा अर्थ मोह नसलेली व्यक्ती. भूतमात्रांमध्ये भेद दिसणे हाच एक मोह आहे. या मोहाचा निरास सर्वाभूती हरी दिसण्यामुळेच होतो. ‘मोहाचा क्षय म्हणजे मोक्ष,’ अशी त्यांची मोक्षाची व्याख्या आहे. त्यांच्या दृष्टीने मोह ही वेगळीच गोष्ट आहे. संपूर्ण अभेदता म्हणजे निर्मोह. प्रिय आणि अप्रिय या भावना देह आहे तोवर राहणार. देहात राहून त्या भावना संपल्या असतील तर ती विदेही स्थिती म्हणायची. अशी अवस्था असेल तर मुक्ती प्राप्त होते. सर्वाभूती हरी आणि प्रियाप्रिय भावनेचा लोप झाला की ‘याचि देही याचि डोळां पाही मुक्तीचा सोहळा’ असे तुकोबांनी म्हटले आहेच.

प्रत्येक व्यक्तीने अशी अवस्था प्राप्त करावी अशी गीतेचीही अपेक्षा आहे. अशा अवस्थेला पोहोचलेल्या सज्जनांना गीतेमध्ये ‘जीवनमुक्त’ असे म्हटले आहे. ‘बुद्धि निश्चळ निर्मोह  ब्रह्मीं ज्ञानी स्थिरावला।’  हे स्थितप्रज्ञाचे लक्षण आहे. स्थितप्रज्ञ आणि जीवनमुक्त यांचा इथे मेळ घातला आहे. इथे प्रिय आणि अप्रिय अशा गोष्टी आहेत तर स्थितप्रज्ञ लक्षणांमध्ये शुभ आणि अशुभ आहे. दोन्हीकडे चित्ताची आणि मनाची स्थिरता अपेक्षित आहे.

या श्लोकातील ज्ञानी म्हणजे आत्मज्ञानी म्हणजेच ब्रह्मज्ञानी. ज्ञान शब्द गीतेत केवळ आत्मज्ञानी याच अर्थाने दिसतो. गीता आत्मज्ञान आणि ब्रह्मज्ञान एकच मानते. प्रत्येक व्यक्तीने साधक असावे. सगळीकडे समत्वाचे म्हणजे परमेश्वराचे दर्शन घ्यावे. त्यासाठी स्थिरबुद्धी राखत ब्रह्माशी एकरूप असावे. साधनेच्या टप्प्यावर समत्व, मोहनाश आणि सर्वाभूती भगवद्भाव हा विनोबांच्या गीतार्थाचा विशेष आहे. विनोबाप्रणीत समत्वाची व्यावहारिक पातळीवरील समतेशी कशी जोडणी होते तेही पाहायचे आहे.