साम्यवादाचे परीक्षण करण्याची गरज नाही, असे विनोबांनी कितीही म्हटले असले तरी त्यांनी साम्यवादाची भूमिका समजावून घेतली होती. संतांचा गुणविकासाचा आणि साम्यवाद्यांचा समाजरचनेचा असे उभय मार्ग त्यांनी एकत्रित विचारात घेतले असे दिसते.

साम्यवादाचे तत्त्वज्ञान सांगताना त्यांनी जी मांडणी केली आहे ती अशी, गुणविकास होतो, पण कसा? तो ज्या चित्तात होतो ते चित्त कसे बनते? हे आणि असे प्रश्न, निष्ठेचे दुसरे टोक दाखवतात. ज्याला तुम्ही विकास म्हणता तो चित्तात होत असला तरी तो चित्ताने केलेला नसतो तर परिस्थितीने केलेला असतो. चित्ताची निर्मिती होते तीच परिस्थितीमुळे.

भौतिकं चित्तम्।

हे वचन सांगत विनोबा या अनुषंगाने एक मजेशीर उदाहरण देतात. लहान मुलाला दाढी-मिशावाल्या बुवाचे भय वाटते कारण त्याच्या आईला दाढी-मिशा नसतात याहून दुसरे कारण नाही. दु:ख झाले की रडणे सहज होते यापेक्षा सुई टोचली की दु:ख सहज होते हे जास्त खरे आहे. त्यामुळे चित्त म्हणून काही स्वतंत्र पदार्थ नाही. ज्याला आपण चित्त म्हणतो ते या सृष्टीचेच प्रतिबिंब आहे.

छायेच्या नियमनाने वस्तूचे नव्हे तर वस्तूच्या नियमनाने छायेचे नियमन होते. रात्री शांत झोप झाली की चित्त प्रसन्न होते. सत्त्वगुण प्रकट होतो. दुपारी भूक लागली की रजोगुण जागा होतो आणि जेवण झाले की झोप येते म्हणजे तमोगुण दिसतो. थोडक्यात योग्य परिस्थिती असली की तिला साजेसा गुण प्रकट होतो. सबब गुणांचा महिमा गाण्याऐवजी परिस्थिती बदला आणि ती लवकर आणि कोणत्याही मार्गाने पालटा. मनोवृत्तीची जाळी विणू नका. माणसाचे मन जे आहे ते आहे. ते काहीही केले तरी पशूचे मन होणार नाही आणि ते देवासारखेही बनणार नाही. ते आपल्या मर्यादेत राहते आणि राहणार. परिस्थिती सुधारली की ते थोडेफार सुधारते आणि ती बिघडली की बिघडते. त्याची चिंता करू नका. समाजरचना पालटण्यासाठी थोडीफार हिंसा करावी लागली तर सद्गुण मेला म्हणून ओरडू नका. वाईट रचना मेली एवढेच समजा. त्यासाठी करावी लागली ती हिंसा सामान्य हिंसा नव्हती. ती वरच्या पातळीवरील हिंसा होती. तोही एक सद्गुणच होता आणि याची नीट उमज पडली तरच गुणविकास नीट होईल. विनोबांनी साम्यवादाची म्हणून जी भूमिका मांडली ती या तत्त्वज्ञानाचा गाभा सांगणारी आहे.

इथे प्रा. दिलीप बोस यांच्या भगवद्गीतेवरील ‘मार्क्‍सवाद आणि भगवद्गीता’ या निबंधाचे स्मरण होते. या पुस्तकाला कॉ. एस. जी. सरदेसाई यांची विवेचक प्रस्तावना आहे. कॉ. सरदेसाई यांनी गीतेच्या तत्त्वज्ञानावर घणाघाती टीका करताना मार्क्‍सवादाचा ‘डिंडिम’ रचल्याचे दिसते.

वस्तु सत्यं ब्रह्म मिथ्या।

जीवो वस्तुषु नापर:।।

एका कॉम्रेडला आपले तत्त्वज्ञान मांडण्यासाठी आद्य शंकराचार्याचा आधार घ्यावा लागतो तर गीतेच्या एका आधुनिक भाष्यकाराला साम्यवादाचे सार सांगावे लागते; या दोहोंमध्ये नवीन समाजरचनेची बीजे आहेत.

अतुल सुलाखे