scorecardresearch

साम्ययोग : गुणविकासाचा आग्रह

विनोबा गांधीजींच्या आणि स्वत:च्या भूमिकेतून साम्यवाद नाकारतात. तथापि ते साम्यवादाची टर उडवत नाहीत.

vinoba
संग्रहित छायाचित्र

विनोबा गांधीजींच्या आणि स्वत:च्या भूमिकेतून साम्यवाद नाकारतात. तथापि ते साम्यवादाची टर उडवत नाहीत. त्यांच्यामते समग्र धारणेसाठी दोन प्रवृत्ती कार्य करताना दिसतात. गुणविकासनिष्ठ आणि समाजरचनानिष्ठ. दोन्ही निष्ठा अनादि आहेत. यातील पहिली निष्ठा सज्जनांची आहे. हे जग गुणांनीच चाललेले आहे. माणसाचे जीवनही तसेच आहे. गुणांचा विकास होतो तशी समाजरचनाही बदलते. त्यामुळे सज्जनांनी आपले सारे लक्ष गुणविकासावर केंद्रित केले पाहिजे.  त्यामुळे जगाचा व्याप ओढवून घ्यायचा नाही हे तत्त्व ओघानेच येते.

अिहसा, सत्य, संयम, संतोष, सहकार इ. यम-नियमांची निष्ठा दृढ करणे इतकेच केले म्हणजे बाकीचे आपोआप होते. मुलाला दूध पाजावे हे आईला आणि दु:ख झाले की रडावे हे बाळाला शिकवावे लागत नाही. अशी ही निष्ठा आहे. ती संतांच्या हृदयात सहजच स्फुरत असते.

गीतेतील दैवी संपत्तीच्या गुणांवर माउलींनी जे जिव्हाळय़ाने भाष्य केले आहे, ते या निष्ठेचे मूर्तिमंत रूप आहे. ही निष्ठा बहिर्मुख नसल्याने तिला सहजपणे समाजविमुख ठरवता येते. तथापि विनोबा या निष्ठेचे महत्त्व ओळखून होते. आत्मज्ञानाची ओढ असणाऱ्या व्यक्तीचे नुसते अस्तित्वही समाजासाठी फार उपकारक असते असे ते म्हणत. त्यासाठी ते रामकृष्ण परमहंसांचे उदाहरण देत असत. ‘रामकृष्ण चांगल्या अर्थाने जड होते,’ हे त्यांचे म्हणणे गुणविकासाच्या निष्ठेचे उदाहरण होते.

विनोबांनी भारतभर स्थापन केलेल्या सहा आश्रमांचे हेच कार्य आहे, असे म्हणता येते. या आश्रमांमधून ब्रह्मविद्येची साधना व्हावी. ती स्त्रियांनी करावी. ही साधना जसजशी विकसित होईल तसतसा तिचा प्रसार होईल, असे ते म्हणत.

गीतेतील स्थितप्रज्ञाची लक्षणे चित्तात ठसली की बाहेर आपोआपच प्रकट होतील या त्यांच्या म्हणण्याचा हाच अर्थ आहे. ते व्यक्तीपेक्षा विचाराला महत्त्व देत. विचारांची ताकद गुणविकासाशिवाय दिसत नाही. सर्वोदयात संघर्षांत्मक कार्याएवढेच रचनात्मक कार्याला महत्त्व आहे. साधारणपणे एखादे काम उभारणे म्हणजे रचनात्मक कार्य आणि लोकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणे म्हणजे संघर्षांत्मक कार्य, अशी समजूत दिसते. तथापि हे दोन्ही प्रकारचे कार्य गुणविकासाखेरीज साधत नाही.

इथे गांधीजींच्या एकादश व्रतांचे महत्त्व ध्यानात येते. त्या व्रतांवर गांधीजींचा सत्याग्रह आणि त्यांचे सार्वजनिक जीवन उभे होते. कोणत्याही स्थितीत सत्याची कास सोडायची नाही यासाठी लागणारे धैर्य त्यांना गुणविकासाच्या साधनेतून प्राप्त झाले होते.

या गुणविकासाची साधना विनोबांनी वेगळय़ा उंचीवर नेली. गूढ व्यक्तित्व आणि गुणविकासाची साधना यामुळे विनोबा आध्यात्मिक क्षेत्रातील अधिकारी पुरुष झाले होते.

तथापि यावर त्यांनी समाधान मानले नाही. सार्वजनिक प्रश्नांना त्यांनी हात घातलाच. ‘वर्तमानातील समाजरचना मी एक मिनीटभरही सहन करणार नाही,’ इतक्या थेटपणे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. समाजरचनेचे महत्त्व आणि त्या दृष्टीने सुरू असणाऱ्या प्रयत्नांचे त्यांनी साक्षेपी विवेचन केल्याचे दिसते. नव समाजरचनेचा हा महत्त्वाचा विचार आहे.

मराठीतील सर्व साम्ययोग ( Samyayog ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Samyayog insistence quality development gandhiji vinoba role ysh

ताज्या बातम्या