|| नितीन अरुण कुलकर्णी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपली संकल्पना फक्त आपल्याच कल्पनेवर आधारित असते की ती जगातील कुठल्या ना कुठल्या संकल्पना-समूहांची ‘वंशज’ असते? दुसऱ्याच्या संकल्पनेचं आपण कौतुक करतो, आपण त्याची नक्कल करायची नाही हेही ठरवतो; पण जगाशी आपल्या मेंदूचं नातं कसं काय जुळतं?

आपण लिहायला बसलो आहोत, आपल्याला काय लिहायचं आहे हे साधारणपणे माहीत आहे; पण नेमकं कसं लिहावं ते सुचत नाहीये. आपण शून्यात नजर लावून बघितली, डोळे बंद करून पाहिलं, कपाळावरील डोकं धरून पाहिलं, पण डोक्यावर ताण आल्याखेरीज दुसरं काही झालं नाही.

असं झाल्यानंतर किंवा एखाद्याच्या बोलण्याचा अर्थ नाही लागला की आपल्या नित्याच्या बोलण्यातली शेरेबाजी आठवते.. ‘आता तरी डोक्यात प्रकाश पडला का?’ वगैरे. असे अनेक शेरे आपण दुसऱ्यांना व स्वत:लाही मारलेले आहेत. याउलट.. आपण शांत आहोत, कसली चिंता व घाई नाही, आपण मनाने काहीही पकडून ठेवत नाही; कशाचाही अट्टहास नाही, अशा अवस्थेत आपल्याला काही तरी अचानक असं सुचतं ज्यावर आपण आधी विचार केलेला नसतो आणि विशेष म्हणजे आपण पुढची पूर्ण निर्मिती यानंतर निभावून नेलेली असते. कसं घडतं असं? आपल्या डोक्यात खरंच ‘उजेड’ पडतो? कल्पना (आयडिया) कशी येते? संकल्पनेची (कन्सेप्ट) निर्मिती कशी होते?

रोज आपल्या नजरेसमोरून अनेक प्रसंग, वस्तू, माणसं जात असतात. कधी कधी आपण अचानक अचंबित होतो आणि म्हणतो, ‘काय आयडिया आहे! व्वा!!’ आता आपण आयडिया कुठे बघितली? खरं तर आपल्याला दिसलं ते त्या कल्पनेचं मूर्तरूप. त्या रूपातून आपण खोलवर गेलो. त्या निर्मितीच्या प्रक्रियेकडे भूतकाळात अथवा उपयोगाकडे भविष्यात गेलो. त्याचं मर्म बघितलं. हे झालं आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टींच्या अस्तित्वात असलेल्या संकल्पनांविषयी. दुसरा भाग जो जास्त महत्त्वाचा असतो तो सर्जनाशी संबंधित, जिथं नवनिर्मितीची अपेक्षा असते. ही प्रक्रिया पूर्णपणे मानसिक असते.

कल्पना व संकल्पना यांचा संबंध ठिणगी व आग यांच्या संबंधासारखा असतो. आता ठिणगी कशी उडते? याची अंतर्बाह्य़ सामग्री कशी बनते? आगीसाठीचं इंधन कुठून, कसं जमवलं जातं? या प्रश्नांच्या उत्तरांचा वेध कल्पना- संकल्पना यांच्या संदर्भात कठीण असतो; त्यामुळे अभावानेच घेतलेला आढळतो. साधारणपणे जे सकृद्दर्शनी दिसतं व जाणवतं ते म्हणजे आग व ठिणगीसारखं असतं. समजा, एक अशी कल्पना घेतली, की चित्र हे रंगांनी तयार करण्यापेक्षा रंगीत कापडच रंगपटलावर चिकटवून तयार करावं. आता ही झाली एक कल्पना. जेव्हा ही कल्पना दृढ होते, कृतीत उतरते तेव्हा इतर विचारबिंदू अस्तित्वात येतात आणि त्यांच्याशीही नातं तयार होतं. उदाहरणार्थ, रंग हा एक अनुभव असतो आणि (त्या चित्रात) रंग हा तलम पापुद्रय़ासारखा असतो. यातून, ‘जीवन हे अनेक पदरी असते!’ अशा प्रकारचं रूपक व याची अर्थच्छटा हा आणखी एक महत्त्वाचा विचारबिंदू ठरतो. याबरोबरीनेच कॅनव्हास हे एक कापड व त्यावरचं आच्छादनही कापड, हाही एक बिंदू.. ही संकल्पना जास्त तंत्रप्रधान असल्यामुळे तंत्राच्या अवतीभवती इतर विचारबिंदू जमतात व त्यांचा एक बंध बनतो, हा पुंज किती देदीप्यमान आहे यावर तिची योग्यता अवलंबून असते. जर ही संकल्पना जास्त प्रकाशमान असेल- तर याचा अर्थ, तिच्यात जास्त ऊर्जा असेल व त्यामुळेच या ऊर्जेचं परावर्तन होण्याची शक्यता जास्त असेल. इथं ‘परावर्तन’ म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला झालेली प्रेरणा अथवा जगात असलेलं सह-अस्तित्व. असं दिसतं की, एकाच वेळी अथवा वेगवेगळ्या काळांत एकसारख्या संकल्पना सह-अस्तित्वात असू शकतात. कारण आपल्या सगळ्यांना बांधणाऱ्या या विश्वाचे ऊर्जास्रोत एकमेकांत गुंफलेले असतात. मानवाने केलेली निर्मिती ही समाज व त्याची प्रेरणास्थानं आणि मानवी जीवनाला आकार देणारे घटक (संस्कृती, आर्थिकता, तंत्रज्ञान) इत्यादींकडून एकंदरीत जीवनासाठी प्रभाव-सामग्री घेत असतात. आपलं बऱ्याच वेळा असं होतं की, बराच विचार वगैरे करून आपण एक कल्पना कार्यरत करतो, थोडं मूर्तरूप धारण झालं की ‘गुगल’ करतो आणि निराशा पदरी पडते, कारण कुणी तरी अगोदरच अशी गोष्ट बनवलेली असते. याचा अर्थ आपली संकल्पन-प्रक्रिया (कन्सेप्च्युअलायझेशन) चुकीची होती असं अजिबात नाही; परंतु आता ती दृष्टिपथात आल्याने आपल्यावर सांस्कृतिक चोरीचा आळ येऊ  शकतो या भावनेनेच आपण खजील होतो. परंतु या शोधाचा व्यावहारिक फायदा असा होतो की, आपण जाणूनबुजून कल्पनेत बदल घडवून आणतो. म्हणजे काय करतो? तर ऊर्जापुंजाचे काही बिंदू जास्त प्रभावी करतो आणि हा बंध वेगळा प्रस्थापित करतो. खरं तर इथं काय झालं? विचारबिंदूच्या एका जातकुळीतल्या शृंखलेची एक कडी वाढली. आपली नवनिर्मिती सिद्ध झाली; पण ‘वैश्विक मना’च्या चैतन्याद्वारे.

आपण सूक्ष्म होऊन आपला मेंदू जसा बघितला तसेच स्थूल होऊन ही एकसंध पृथ्वीही, अंतराळात जाऊन बघितली. या दोन्ही क्रिया परस्परविरोधी भासतात; परंतु समग्र विचारांचं द्योतक असतात. विज्ञान व मानवी सजगता (सायन्स अ‍ॅण्ड कॉन्शसनेस) हा त्याचा प्रमुख पाया होय. आजच्या प्रबळ अशा इंटरनेटच्या युगात मानवी जाणिवांचे हे बंध अधिकाधिक बोधनेत (कॉग्निशन) येत आहेत. ही अवाढव्य पृथ्वी/सृष्टी मानवी प्रज्ञेचं द्योतक व ही वैश्विक प्रज्ञा मानवाच्या बुद्धी/मेंदूचं द्योतक बनत आहे. ‘वैश्विक मना’ची संकल्पना आजइतकी याआधी वैदिक काळाव्यतिरिक्त कधीच प्रबळपणे पुढे आली नसेल.

मेंदू, त्याची रचना व विचारांची अ‍ॅनाटॉमी बघितली की एक लक्षात येतं, ही पूर्ण रचना जोडणीप्रधान (कनेक्टेड) असते. आपण विचार करतो तेव्हा मेंदूतले अनेक न्यूरॉन्स विद्युतप्रवाहाद्वारे जागृत होतात व त्यातले काही जोडले जातात ज्याला सिनॅप्स म्हणतात. अर्थात स्मृतीचं योगदान यात महत्त्वाचं असतं आणि विचार तयार होतो. प्रत्येक वेळी हे नक्की नसतं की कुठले न्यूरॉन्स जागृत होणार व जुळणार. नवसंकल्पना एक प्रकारे अपघातच मानला पाहिजे. किती प्रकाश-बिंदू जागे झाले आणि ते कसे जोडले गेले, त्यामुळे त्यांच्या जाणिवेचं मूर्तरूप कसं उलगडलं यावर संकल्पन व त्याचा पुढचा प्रवास ठरतो. हे अद्भुत आहे, सुमारे शंभर अब्ज न्यूरॉन्स असतात व एका वेळी त्याच्या दुपटीपेक्षा जास्त सिनॅप्स जागृत होतात. प्रत्येक वेळी एकाच विषयाचा विचार असला तरी वेगवेगळ्या आकारबंधांची शक्यता निर्माण होते. प्रश्न योग्य निवडीचा राहतो. जगातल्या वेगवेगळ्या मेंदूंमध्ये अशीच प्रक्रिया एकाच वेळी घडत असू शकते.

विलयानुर सु. रामचंद्रन हे प्रथितयश जागतिक कीर्तीचे मेंदूतज्ज्ञ आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार आता शास्त्रज्ञांनी मिरर न्यूरॉन्सचा शोध लावला आहे. या न्यूरॉन्सद्वारे प्राणी व मानव इतरांच्या क्रिया व कृतींचं मानसिक आवर्तन करू शकतात, म्हणून उत्क्रांतीमध्ये मानवांतच संस्कृतीचा प्रसार जलद झाला. या मिरर न्यूरॉन्सपैकी एक प्रकारचे न्यूरॉन स्पर्शज्ञानाचे असतात. दुसऱ्या माणसाचा स्पर्श आपल्याला जाणवतो, पण आपल्या शरीराच्या त्याच भागाच्या त्वचेवरून मेंदूकडे संदेश जातो की, हा स्पर्श स्वत:चा नाही. यातून रामचंद्रन असं म्हणतात की, अशा न्यूरॉन्सद्वारे पूर्ण मानवजात बांधलेली आहे. ‘कलेक्टिव्ह कॉन्शसनेस’सारखा हा एक पौर्वात्य तत्त्वज्ञानाचा प्रमुख भाग सिद्ध झाला आहे. भारतीय तत्त्वज्ञानात याचं मूळ आढळतं.

मेंदूला संगणक जोडून त्याच्या क्रिया बघण्याचे प्रयोगही सुरू आहेत. या संकल्पनेचं रूप कलाकृतींमध्येही दिसत आहे. त्यापैकी एक प्रयोग इथं दिला आहे.

nitindrak@gmail.com

लेखक दृश्य कला व क्रयवस्तू विश्लेषक असून ‘नीफ्ट’ येथे अध्यापन करतात.

मराठीतील सर्व संकल्पनांची संस्कृती बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Just what is concept art
First published on: 19-01-2019 at 01:57 IST