संस्कृत ही आर्याची भाषा.. मात्र, ‘व्याकरणाने नियमबद्ध असणारी ही भाषा नंतरच तयार झाली असली पाहिजेहे काही तज्ज्ञांचे मत तर्काला पटणारे आहे. तसेच आधी अनेक, नंतरच त्यातून एकया आर्याच्या एकूण धोरणाशीही ते सुसंगत ठरणारे आहे! पण संस्कृत राष्ट्रभाषा होण्यास डॉ. आंबेडकरांनीही पाठिंबा का दिला असावा?

समान भाषा हा लोकांना जोडणारा एक महत्त्वाचा घटक असतो. राज्यघटनेच्या अनुसूचीमध्ये १५ भाषांचा उल्लेख असला, तरी भारतात प्रत्यक्षात ६००पेक्षा अधिक भाषा बोलल्या जातात. भारत हे एक राष्ट्र असूनही आपण अद्यापि एक राष्ट्रभाषा घोषित करू शकलो नाही. िहदी ही राज्यकारभाराची भाषा असेल असे घटनेत म्हटले असले, तरी यासाठी पूर्वीप्रमाणेच इंग्रजीचा वापर चालू राहील, अशीही तरतूद करून िहदीला प्रलंबित ठेवले आहे. सर्व प्रदेशांना समजणारी वा मान्य होणारी एकही भाषा नसल्यामुळे इंग्रजीला सर्वमान्यता मिळाली. परंतु स्वातंत्र्यपूर्व काळी संस्थानांत तर इंग्रजीला महत्त्व नव्हतेच, पण ब्रिटिश प्रांतांतही राजकीय नेते, समाजसुधारक, सरकारी अधिकारी, प्राध्यापक, साहित्यिक, विद्वान, विचारवंत, वकील, पत्रकार अशा निवडक वर्गापुरतेच ते मर्यादित होते. तरीही, प्रत्येक प्रदेशात असे इंग्रजीज्ञाते असल्यामुळे त्या सर्व प्रदेशांना इंग्रजी मान्य होऊ शकली. एक भाषा मिळाल्यामुळे अखिल भारतीय राष्ट्रकारणाला चालना मिळाली. इंग्रजीमुळेच मराठीभाषक लो. टिळकांना अखिल भारतीय नेतृत्व मिळू शकले. सर्व भारतीयांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या काँग्रेस पक्षाचे ठराव इंग्रजीत होत असत. इंग्रजी येत नसणाऱ्या देशभरच्या जनतेला ते कसे कळत असत? अर्थात इंग्रजी जाणणारे ते जनतेला त्यांच्या बोलीभाषेत सांगत असत. एक प्रकारे ब्रिटिश काळापासून आतापर्यंत इंग्रजी भाषेने सर्व भारतीयांत विचारांचे आदान-प्रदान घडवून आणले आहे व राष्ट्रैक्य घडवून आणण्यास मदत केली आहे.

आधुनिक काळात असे ऐक्याचे जे कार्य इंग्रजीने केले, तसेच कार्य पूर्वीच्या काळात संस्कृतने केले होते. आज संस्कृत मृतवत झाली असली, तरी तिने भारतीय संस्कृतीला व भावनिक ऐक्याला जिवंत ठेवले आहे.

संस्कृत ही आर्याची भाषा. आर्य संस्कृतीच्या प्रसाराचे ते एक प्रमुख साधन होते. ते भारतात येण्याआधी आलेल्या तसेच मूलनिवासी विविध लोकसमूहांच्या स्वत:च्या बोलीभाषा होत्याच. त्यांना द्रविड भाषाकुल म्हटले जाते. त्यांची १९६१ मध्ये नोंदवलेली संख्या १६१ होती. संस्कृत न येणाऱ्या या सर्व लोकसमूहांशी आर्यानी सांस्कृतिक आदान-प्रदान कसे केले असेल? तर आर्य प्रचारकांनी त्या लोकसमूहांतील निवडक व्यक्तींना संस्कृत शिकविले असणार व त्या व्यक्तींनी बोलीभाषेत आपल्या लोकांना संस्कृत ग्रंथांतील ज्ञान सांगून संस्कृतीचा प्रचार केला असणार. म्हणजे सर्व लोकांना नव्हे तर लोकसमूहांतील काही ज्ञानी व्यक्तींनाच संस्कृत येत असणार. विविध लोकसमूहांतील हे ज्ञानी लोक त्या भाषेत परस्परांशी बोलणार, सांस्कृतिक आदान-प्रदान करणार. अशा प्रकारे ते लोकसमूह परस्परांशी ज्ञानभाषेने जोडले गेले. लोकांची व्यवहारातील भाषा बोलीभाषाच राहिली व संस्कृत ही त्या लोकसमूहांना जोडणारी ज्ञानभाषा म्हणून अखिल भारतीय भाषा बनली. (इ.स. १००० पर्यंतच्या) पुराणकाळात देशातील प्रत्येक प्रदेशातील पंडितवर्गाची भाषा संस्कृत होती हे इतिहासात नमूद आहे. सर्व बोलीभाषा परस्परांच्या भगिनी व संस्कृत ही सर्वाची जननी अशी भावनिकताही निर्माण करण्यात आली. सर्वानी तिला आपली मानावी म्हणून ती देववाणी असल्याचेही सांगण्यात आले.

वेदांपासून पुराणांपर्यंतच्या सर्व वैदिक धर्मग्रंथांची भाषा संस्कृत होती. वैदिक धर्माविरुद्ध बंड करून उदयास आलेल्या बौद्ध व जैन धर्मानी धर्मग्रंथांसाठी व धर्मप्रसारासाठी अनुक्रमे पाली व अर्धमागधी लोकभाषेचा स्वीकार केला. परंतु नंतर पहिल्या शतकापासून बौद्ध धर्मातील महायान पंथाने यासाठी संस्कृतचा स्वीकार केला. संस्कृतमध्ये अनेक बौद्ध ग्रंथ लिहिले गेले. अश्वघोषाने बुद्धचरित्र हे महाकाव्य संस्कृतमध्येच लिहिले. त्रिपिटकांचे संस्कृतमध्ये भाषांतर करण्यात आले. जैनांनीही धर्मग्रंथांसाठी संस्कृतचा उपयोग सुरू केला. सर्व भारतभर धर्मप्रसार व्हावयाचा तर संस्कृत भाषेचा आश्रय घेणे आवश्यक झाले होते.

भारतीय संस्कृती अभ्यासण्यासाठी युरोपीय पंडितांनी संस्कृत साहित्याचा अभ्यास केला. जर्मन पंडितांनी अनेक संस्कृत ग्रंथांची जर्मनमध्ये भाषांतरे केली. पाणिनींच्या व्याकरणाचेही इंग्रजी, जर्मन व फ्रेंचमध्ये भाषांतर करण्यात झाले. ब्रिटिश राज्यात वॉरन हेिस्टग्जच्या काळापासून संस्कृत ग्रंथांची इंग्रजीत भाषांतरे करण्यास सुरुवात झाली. पहिला (१७७५) भाषांतरित ग्रंथ म्हणजे भगवद्गीता होय. ब्रिटिश शासनाने १९व्या शतकाच्या शेवटच्या काळात भारतीय ग्रंथांची सूची तयार केली होती. त्यानुसार सुमारे दहा हजार संस्कृत ग्रंथांची हस्तलिखिते आढळून आली. ‘आज संस्कृत मृतभाषा असली तरी भारतातील आजच्या सर्व आर्य व द्रविड भाषांचा जन्म व प्राण संस्कृत हाच आहे,’ हे मॅक्समुल्लर (मृ. १९००) यांचे मत कोणालाही अंतर्मुख करणारे आहे.

संस्कृत साहित्य म्हणजे केवळ धार्मिक व कर्मकांडात्मक साहित्य नव्हे. त्यात मानवी जीवनाच्या सर्व विषयांवरील ग्रंथांचा समावेश आहे. आजच्या आधुनिक दृष्टीने ते निरुपयोगी व कालबाहय़ झाले असेल, पण सांस्कृतिक वारसा व ऐक्याचा एक घटक म्हणून त्याचा विचार करावा लागतो. पं. नेहरू म्हणाले होते, ‘‘भारताची सर्वात मोठी दौलत कोणती, सर्वात मोलाचा वारसा कोणता,’ असे जर कोणी मला प्रश्न विचारले तर मी ठामपणे उत्तर देईन की, ते आहे संस्कृत भाषा व वाङ्मय.’’

संस्कृत ही अन्य बोलीभाषांचा संस्कार होऊन तयार झालेली भाषा आहे. पाणिनीने इ.स.पू. पाचव्या शतकात संस्कृतचे नियमबद्ध व्याकरण तयार केले. तत्पूर्वीचे व नंतरचे वैदिक साहित्य यांतील संस्कृतमध्ये फरक पडलेला आहे. आश्रमात बसून नव्हे, तर उत्तर भारताचा बहुतेक भाग फिरून, विविध लोकसमूहांना भेटी देऊन, त्यांच्या बोलीभाषा समजून घेऊन त्यांनी भाषाविषयक सामग्री गोळा केली होती व त्यांचाही समावेश होईल असे ते व्याकरण तयार केले होते. काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आधीच्या प्राकृत भाषांवरून नंतर संस्कृत तयार झाली. व्याकरणाने नियमबद्ध असणारी ही भाषा नंतरच तयार झाली असली पाहिजे. हेच मत तर्काला पटणारे आहे. तसेच ‘आधी अनेक, नंतरच त्यातून एक’ या आर्याच्या एकूण धोरणाशीही ते सुसंगत ठरणारे आहे.

द्रविड भाषाकुलातील आजही महत्त्वाच्या असणाऱ्या भाषा म्हणजे तमिळ, तेलगू, कन्नड व मल्याळम. संस्कृत भाषेतील अनेक शब्द या भाषांतून घेतलेले आहेत. अभ्यासकांनी दाखवून दिले आहे, की तमिळमध्ये ३०, कन्नडमध्ये ५०, तेलगूमध्ये ६०, तर मल्याळममध्ये ८० टक्के शब्द संस्कृत भाषेतील आहेत. आर्य व द्रविड यांच्यात भाषिक व सांस्कृतिक आदान-प्रदान कसे होत आले याचे हे निदर्शक होय. अशा प्रक्रियेतूनच आर्य व द्रविड हा भेद इतिहासजमा होऊन त्यातून एक भारतीय संस्कृती निर्माण झाली. असे म्हटले जाते, की जो संस्कृत शिकला नाही त्याला तमिळ भाषेचे स्वरूप स्पष्ट कळणार नाही. तसेच केरळमधील मल्याळम भाषेतील संस्कृतच्या प्रचंड प्रमाणामुळे तेथे असे म्हणण्याचा प्रघात पडला, की तेथील रस्त्यावरचा साधा माणूसही संस्कृतात बोलतो.

संस्कृत ही पंडित व विद्वान वर्गापुरती का होईना पण सांस्कृतिक आदान-प्रदानाची अखिल भारतीय भाषा बनली होती. म्हणूनच शंकराचार्य, रामानुजाचार्य, मंडनमिश्र असे दक्षिणेतील म्हणजे द्रविडी देशातील पंडित अखिल भारतीय बनू शकले. भारताच्या विविध भागांतील महाकवी व नाटककार कालिदास, भवभूती, आयुर्वेदाचार्य चरक व वाग्भट, गणिती व ज्योतिर्वदि आर्यभट्ट व भास्कराचार्य प्रभृती कित्येक संस्कृत पंडित या संस्कृत भाषेमुळे अखिल भारतीय बनून सर्व भारतीयांच्या अभिमानाचा विषय बनले. भारताचे सांस्कृतिक ऐक्य घडविण्यात संस्कृतचे हे योगदान आहे. भारतातील सर्व प्रदेशांना एकत्र जोडणारा तो एक भक्कम धागा आहे. जगात संस्कृत ही भारतीय राष्ट्राची ओळख बनली आहे. तिची व्यावहारिक उपयुक्तता संपली असे मानले, तरी तिचे ऐतिहासिक कार्य व भावनिक उपयुक्तता कायम राहणारी आहे.

राज्यघटनेने राज्यकारभाराची (भावी) भाषा म्हणून स्वीकारलेली िहदी ही संस्कृतनिष्ठच आहे. राज्यघटनेतील एक मार्गदर्शक तत्त्व सांगते की, ‘हिंदी भाषेच्या शब्दसंग्रहाकरिता मुख्यत: संस्कृत व गौणत: अन्य (भारतीय) भाषांचा अवलंब करून तिला समृद्ध करणे केंद्र शासनाचे कर्तव्य राहील.’ संस्कृतच्या संवर्धन व विकासासाठी १९५६ मध्ये नेहरूंच्या सरकारने संस्कृत आयोग नियुक्त केला होता. सर्व प्रदेशांच्या भाषांनी समृद्ध केलेली संस्कृत ही राष्ट्रभाषा म्हणून उद्घोषित करावी, अशी सूचना या आयोगाने केली होती. घटना तयार होताना घटना समितीतील काही सदस्यांनी संस्कृत ही राष्ट्रभाषा करावी, असा प्रस्ताव आणला होता व डॉ. आंबेडकरांनी त्यास पािठबा दिला होता. ज्यांना शिक्षण घेताना दलित असल्यामुळे संस्कृत शिकायची बंदी होती (पण नंतर स्वकष्टाने संस्कृत शिकले) त्यांनी संस्कृत भाषा राष्ट्रभाषा होण्यास पािठबा का दिला असावा?

लेखक इतिहासाचे अभ्यासक आहेत.