आत्मसाक्षात्कार अथवा ईश्वरप्राप्तीसाठीच मनुष्यजन्म मिळाला आहे. त्या ध्येयपूर्तीसाठी थेट प्रयत्न करणं, हाच सरळ मार्ग आहे. अर्थात हे कितीजणांना पटेल? काहीजण तर मनुष्यजन्म नव्हे तर म्हातारपणच केवळ ईश्वर भक्तीसाठी आहे, असंच मानतात. एक राजपुत्र होता. लहान वयातच तो अत्यंत हट्टी, तापट आणि उद्धट होता. त्याच्या गुरुजींनी राजाला त्याबद्दल अनेकदा सांगून पाहिलं. राजा म्हणे, तो मोठा झाल्यावर चांगलं वागू लागेल. एकदा राजा गुरुजींच्या भेटीला त्यांच्या कुटीत गेला. गुरुजींनी एका नव्या रोपटय़ाची पानं तोडून दिली आणि म्हणाले, ‘‘ही किती चविष्ट आहेत पाहा.’’ राजानं पानं चघळताच ती अतिशय कडू लागली. रागावून ती तशीच थुकून तो म्हणाला, ‘‘फार कडू आहेत ही.’’ गुरुजी म्हणाले, ‘‘पण या रोपटय़ाचा वृक्ष होईल तेव्हा ही पानं गोड होतील.’’ राजा उद्गारला, ‘‘आत्ताच ही एवढी कडू आहेत तर वृक्षाची पानं कुठून गोड होणार?’’ गुरुजी हसून म्हणाले, ‘‘आत्ताच उद्धट असलेले राजकुमार जसे मोठेपणी चांगले होतील, असा तुमचा विश्वास आहे, तसाच या रोपाचा वृक्ष झाल्यावर त्याची पानं गोड होतील, असा माझा विश्वास आहे!’’ तेव्हा, मनाच्या सर्व ओढी निमाल्या की जिथे ईश्वराची ओढ निर्माण होऊ शकते, तो अभ्यास जन्मभर केला नाही तर म्हातारपणी साधेल, हे शक्य आहे का? कुणी गैरसमज करून घेऊ नका. भक्तीच्या मार्गावर कोणत्याही वयात पाऊल टाकलं तरी लाभ होतोच. साक्षात प्रभूंनी गीतेत तशी ग्वाही दिली आहे. पण याचा अर्थ ही गोष्ट म्हातारपणापुरतीच राखीव मानून तोवरचं आयुष्य दुराग्रही, हट्टाग्रही, अहंकारी, अनाचारी पद्धतीनं जगावं, असा नव्हे. बरं, परमेश्वरावर विश्वास नाही आणि परमेश्वर प्राप्ती हे जीवनाचं ध्येय वाटत नाही ना? तरी काही हरकत नाही. माणूस म्हणून तरी चांगलं जगू! माणुसकीसाठी तरी स्वत:ला घडवू! एक गोष्ट नक्की की, चांगला भक्त हा आधी चांगला माणूस असलाच पाहिजे. त्यामुळे ईश्वराशी एकरूप झालेला एखादा भक्त निर्माण होणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच किंबहुना माणसानं खरा माणूस होणं त्याहून अधिक महत्त्वाचं आहे. तेही नाही आणि हेही नाही, अशी आपली गत आहे. ईश्वरप्राप्तीसाठी माणसाला मनुष्यजन्म मिळूनही तो सरळ मुक्कामाला जाण्याचा प्रयत्न का करीत नाही, असा प्रश्न प्रभूंनाही पडला आहे! प्रभू म्हणतात, ‘‘.. अर्जुना मी नसें। ऐसा कवण ठाव असे। परी प्राणियांचें दैव कैसें। जें न देखती मातें।। हे आंत बाहेर मियां कोंदलें। जग निखिल माझेंचि वोतिलें। कीं कैसें कर्म तया आड आलें। जे मीचि नाहीं म्हणती।।’’ (ज्ञानेश्वरी अध्याय ९ ओव्या ३०० आणि ३०२). हे अर्जुना, या जगात मी सर्वत्र भरून आहे, तरी असं कोणतं दैव आड येतं की माणूस मला पाहू शकत नाही? या जगात कणाकणांत मी असताना असं कोणतं कर्म माणसाच्या आड आलं की मी अस्तित्वात नाहीच, असं तो ठामपणे सांगतो? ज्याच्या प्राप्तीसाठी मनुष्यजन्म मिळाला त्या मार्गानं थेट चालण्याऐवजी माणसाची दिशा का चुकली? त्याच्या मनावर अशी कोणती भूल पडली की तो रस्ताच चुकला?