अलीकडेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा जादूटोणा विरोधी विधेयकाला विरोध असल्याचे सांगून सत्तेवर आल्यास जादूटोणा कायदाच रद्द करणार असल्याचे जाहीर केले. दोन-तीन महिन्यांपूर्वी अंनिससह झालेल्या बठकीनंतर यांनीच पूर्ण पाठींबा जाहीर केला होते. ही अचानक घेतलेली कोलांटीउडी भुवया उंचावणारी आहे. हे विधेयक हिंदू धर्माविरुद्ध असल्याच त्यांनी सांगितले. पण विधेयकातील १२ पकी कोणत्या कलमास  नक्की आक्षेप आहे वा कोणती गोष्ट धर्माविरोधात आहे हे त्यांनी का जाहीर नाही केले?
अक्षय आदाटे

श्रद्धाळूंचा  अंशत:   विजय!
विधानसभेत जादूटोणाविरोधी कायदा अखेर पारित झाला. या कायद्याचे सुरुवातीपासून वादग्रस्त असेच स्वरूप राहिले. या विधेयकाचे समर्थक सातत्याने हा कायदा हिंदू धर्माच्या विरोधात नाही आणि याला विरोध करणारे प्रतिगामी असल्याचा प्रचार करीत असताना, महाराष्ट्रातील धर्माभिमानी जनता, काही राजकीय नेते, वारकरी संप्रदाय आणि इतर हिंदू संघटनांनी नेटाने यास विरोध चालूच ठेवला. सनदशीर मार्गाने केलेल्या या विरोधाचा ठळक परिणाम म्हणजे सुरुवातीला यातील १४ कलमे वगळली गेली आणि आता ‘धार्मिक गोष्टींना संरक्षण देणारे व्यावृत्ती कलम १३ चा समावेश’. म्हणजे डोळस श्रद्धा ठेवणाऱ्या श्रद्धाळू जनतेचा अंशत: का होईना, हा विजयच म्हणावा लागेल.
आता यातून हे स्पष्ट होते की, या विधेयकात मोठय़ा प्रमाणात त्रुटी होत्याच. हे विधेयक ‘धर्मविरोधी नाही’ असा कांगावा करणाऱ्यांचे पितळ आता पुन्हा एकदा उघडे पडले आहे.                              
राहुल लोखंडे, कोपरखैरणे

जादूटोणाविरोधी कायदा अधिक व्यापक हवा
जादूटोणाविरोधी कायदा संमत झाला. सर्व दैनिकांत (१४ डिसेंबर) बातमी झळकली. बहुसंख्य जनतेने कायद्याचे स्वागत केले. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या दृष्टीने हे चित्र आशादायक आहे. पण अंधश्रद्धांचे सध्याचे तांडव पाहता कायदा अगदी तोकडा आहे. समजा, कोणी समस्याग्रस्त माणूस कुंडली घेऊन ज्योतिषाकडे गेला आणि ज्योतिषाने सांगितले, ‘सध्या साडेसाती आहे. शनिशांती यज्ञ केला तर समस्या दूर होतील. सात हजार रुपये खर्च येईल,’ तर?
आता विज्ञान सांगते की शनी हा निर्जीव गोळा आहे. पृथ्वीपासून १३० कोटी किलोमीटर दूर आहे. माणसाच्या जीवनावर शनीचा कसलाही परिणाम होऊच शकत नाही. शनीची साडेसाती ही शंभर टक्के थाप आहे. इथे यज्ञ करून शनीची (नसलेली) बाधा टळते, हे सांगणे हास्यास्पद आहे. ते खरे मानणे खुळेपणाचे आहे. पण या ज्योतिषाला आजच्या जादूटोणाविरोधी कायद्याखाली अटक होऊ शकत नाही. म्हणून कायदा अधिक व्यापक आणि सक्षम हवा. त्यात नजर सुरक्षाकवचे, रुद्राक्षे, श्रीयंत्रे, भाग्यरत्ने, प्राणशक्ती, वास्तू(दिशाभूल) शास्त्र अशा अनेक फसवणूक प्रकारांचा समावेश हवा. तसेच तो देशव्यापी हवा. आज ना उद्या हे होईलच. पण श्रद्धाळूंनी स्वबुद्धी वापरली, फसवणुकीला बळी पडले नाही तर कायद्याची आवश्यकताच उरणार नाही.
प्रा. य. ना. वालावलकर

प्रतिमा आणि प्रतिष्ठा डागाळते, ती देशाची
भारताच्या उपमहावाणिज्य दूत देवयानी खोब्रागडे यांच्यावर व्हिसा अर्जात चुकीची माहिती देणे व  मोलकरणीस अत्यल्प रकमेत राबवणे या दोन प्रकरणी न्यूयॉर्क दक्षिण जिल्हय़ाचे अधिवक्ता प्रीत भरारा यांनी आरोप ठेवल्याचे वाचले (लोकसत्ता, १४ डिसेंबर ).
जन्माने भारतीय असलेले  प्रीत भरारा यांनी अधिवक्ता म्हणून मोठा नावलौकिक मिळवला असून ‘टाइम’ नियतकालिकाने ‘जगातील १००  प्रभावशाली  व्यक्तीं’मध्ये त्यांची गणना करून ‘धिस मॅन इज बिस्टग वॉल स्ट्रीट’ या शीर्षकाखाली मुखपृष्ठावर झळकवले आहे. राजरत्नम, रजत गुप्ता अशा बडय़ा लोकांवरील मोठाले आरोप त्यांनी सिद्ध केले, त्यामुळे या नवीन प्रकरणी त्यांनी जे केले ते नियमांनुसार असणार हे तरी कमीत कमी मान्य व्हावे व  शंकेचे कारण असू नये. पुढे जो निकाल लागेल तो लागेल. परंतु आपल्याकडे लाल दिव्याची गाडी वा राजनतिक पाश्र्वभूमी असेल तर भारताप्रमाणे विदेशांतही आपल्याला कुठलाच कायदा/नियम लागू होत नाही या थाटात वावरणाऱ्या व्यक्तींना हे चांगलेच झोंबणार हे उघड आहे.
या प्रकरणी ठेवलेल्या आरोपांसाठी अमेरिकेत वास्तव्य करणाऱ्या कोणत्याही भारतीयास वा नागरिकास जे लागू असेल  तेच भोगण्याची तयारी आता असली पाहिजे.  त्यामुळे या प्रकरणी झालेल्या अटकेस अयोग्य म्हणणे, वंशभेदाचा आरोप करणे, पोलीस यंत्रणेने माफी मागावी अशी मागणी, देशाला धक्का बसला आहे वगरे म्हणणे, यांत अर्थ नाही. उलट जबाबदारीच्या राजनतिक पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीकडून  परदेशातसुद्धा आदर्श आचरण झाले नाही तर अशाने देशाची प्रतिमा आणि प्रतिष्ठा डागाळते हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे.  
मुकुंद नवरे, गोरेगाव- पूर्व

अमेरिकेतील व्हिसा कायदा असाही आहे
अमेरिका व इतर देशांत उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना व्हिसाबद्दल व्यवस्थित माहिती असते. म्हणून त्यांच्याबाबतीत कारवाई झाल्याची बातमी फारशी वाचनात येत नाही, याचे मुख्य कारण तेथील (अमेरिका व युरोपमधील ) कार्यतत्पर अधिकारी. पण अमेरिकेतील भारताच्या वाणिज्य दूतावासात जबाबदार अधिकारी असणाऱ्या देवयानी खोब्रागडे यांच्याकडून मोलकरणीचा व्हिसा मिळवताना झालेला घोटाळा मुळीच अपेक्षित नव्हता. त्यांचे वडील उत्तम खोब्रागडे यांनी म्हटल्याप्रमाणे व्हिसासाठी केलेल्या अर्जावर मोलकरीण रिचर्ड हिचीच सही असल्याने तिला अटक करायला हवी होती, असे म्हटले तर तो अर्ज देवयानी यांच्या संगणकावर तयार केला होता याची त्यांना माहिती कदाचित नसेल.
जर मोलकरीण रिचर्डने खोटी माहिती दिल्याचा अपराध खरोखर केला असेल तर  योग्य पूर्वतपासणी न करता तिला कामावर ठेवून घेतल्याचा गुन्हा देवयानी खोब्रागडे यांनी केला असे म्हणावे लागेल. अमेरिकेच्या व्हिसा कायद्यात तशी स्पष्ट तरतूद आहे!
–  रोशन कांबळे , फ्लिशग मेडोज, क्वीन्स (न्यूयॉर्क)

अशा ‘किक’चे कौतुक आवरा..
प्रसिद्ध नाटय़दिग्दर्शक विनय आपटे यांचे अचानक जाणे सर्वच रसिकांना धक्का देऊन गेले. यानिमित्ताने मित्राची गोष्ट (सुधीर गाडगीळ) आणि विनय.. (शोभा बोंद्रे) हे दोन श्रद्धांजलीपर लेख (रविवार विशेष, १५ डिसेंबर) वाचले. दोन्ही लेखांतून विनय आपटे यांचे माणूस म्हणून, एक बिनधास्त व्यक्तिमत्त्व म्हणून आणि एक नाटय़कर्मी म्हणून अनेक पलू समजले, पण गाडगीळ यांच्या लेखातून मात्र अशा प्रसंगी समोर न यावेत, असेही काही समोर आले. विनय आपटे यांच्या टीव्ही कार्यक्रम निर्मिती पद्धतीबद्दल सांगताना ते लिहितात ‘मी टीव्हीच्या रूममध्ये पोहोचेपर्यंत संध्याकाळचा विषयही ठरलेला नसायचा. त्यातल्या कलावंतांची निश्चिती तर दूरच’, पुढे लिहितात, ‘मग हा वैयक्तिक मत्रीच्या जोरावर दोन-तीन मातबरांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राजी करीत असे आणि तुम्ही पाचपर्यंत पोहोचा, बाकी आलात की गाडगीळ बोलेल असे सांगत फोन ठेवून मोटरसायकलला किक मारून बाहेर पडलेला असे.’
टीव्हीसारख्या माध्यमात प्रसारणाच्या किंवा चित्रीकरणाच्या वेळेपर्यंत कार्यक्रमाचा विषय ठरलेला नसणे, कलाकार ठरलेला नसणे ही बाब निर्माता म्हणून अजिबात अभिमानास्पद नाही, हे गाडगीळांनी का लक्षात घेऊ नये? सहसा सरकारी माध्यमांत आधी कार्यक्रम प्रस्ताव मंजुरी आणि मग कलाकाराला आमंत्रण अशी पद्धत असते. मग कार्यक्रम कोणता हे ठरलेलेच नसणे ही पद्धत नियमबाहय़ नव्हे काय? शिवाय फोन करून ते बाहेर जात, मग कार्यक्रम कोण करीत असे?
जनतेच्या पशातून निर्मिती करताना अशी बेफिकिरी दाखवणे यामुळे समोर आले. दूरदर्शन स्पध्रेत मागे का पडले याची बिजेच या प्रसंगात असावीत असे वाटून गेले. मृत्युलेख लिहिताना अशा दुखऱ्या बाजू सांगू नयेत आणि सांगितल्या तरी पराक्रम असल्यासारख्या सांगू नयेत, अशी नम्र अपेक्षा आहे.
– देवयानी पवार,  पुणे</strong>