साठ वर्षांत ‘त्यांना’ जे साधले नाही, ते ‘यांनी’ दिलेल्या आश्वासनाप्रमाणे साठ दिवसांत होणार आणि ‘अच्छे दिन’ येणार अशी सुखस्वप्ने पाहात लोकसभेच्या निवडणुकीत देशभरातील मतदारांनी नरेंद्र मोदी या नावाला पसंतीची पावती दिली. लोकसभेतील ‘निष्कंटक’ बहुमतामुळे आता नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारताच्या उभारणीतील अडथळे दूर करता येतील आणि ‘सुशासना’ची पहाटही लगेचच उजाडेल, असा विश्वासही लहानथोर भाजप कार्यकर्त्यांच्या मनात रुजू लागला. सत्तांतरानंतरच्या साठ दिवसांतच ती जाणीव इतकी झपाटय़ाने वाढत गेली की, यातूनच हवेत तरंगण्याची सुखद अनुभूती कधी सुरू झाली हेही अनेकांना समजलेच नाही. हा विजय भाजपचा नव्हे, तर मोदी नावाच्या एका माणसाने उठविलेल्या वादळाचा आहे, असे विरोधक ओरडून सांगत होते, तेव्हा पक्षाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र, भाजपचे पाय जमिनीवर ठेवण्याचे प्रामाणिक प्रयत्न कर्तव्यभावनेने सुरूच ठेवले होते. हा कोणाही व्यक्तीचा विजय नाही, जनतेला बदल हवा होता असे संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांनीही ठणकावून सांगितले. पण हवेतून जमिनीवर उतरण्याची मानसिकता पक्षात मात्र तयार झालीच नव्हती. अखेर ते काम विधानसभा पोटनिवडणुकीच्या ताज्या निकालांनी निभावले. मोदी नावाचे गारूड देशावर अजूनही दाटलेले आहे, तेच आगामी निवडणुकीतसुद्धा तारून नेणार आहे, या समजुतीला हलकासा धक्का देऊन या निकालांनी भाजपच्या तंबूत सावधगिरीचा एक इशाराही दिला आहे. बिहारमध्ये सहा, तर कर्नाटक व पंजाबात एकेका विधानसभा जागेवर भाजपला हार पत्करावी लागली. त्यामुळे, लोकसभेच्या निकालांनी दिलेला बहुमताचा कौल हा बळ वाढल्याचाच पुरावा असल्याचे मानून स्वबळाच्या कल्पनाविश्वात रमलेल्यांची आगामी विधानसभा निवडणुकीची कालपर्यंतची गणिते आता बदलावी लागणार आहेत.  भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी आजवर महाराष्ट्रातील शिवसेनेसोबतच्या युतीला वैचारिक बैठकीचा मुलामा देत ती जिवापाड जपण्यासाठी अपार कष्ट घेतले, प्रसंगी अपमानही झेलले. पण लोकसभेच्या निवडणुकीतील डोळे दिपविणाऱ्या यशामुळे या कारणाचा विसर पडलेल्या नेत्यांनी पुन्हा स्वबळाची भाषा सुरू केली. शिवसेनेपासून फारकत घेण्यासाठी कारणांचा शोधही गुप्तपणे सुरू झाला असतानाच बिहारमधील निकालांनी आता त्यांच्या डोळ्यांत अंजन घातले आहे. बिहारमधील पोटनिवडणुकीच्या निकालाआधीच्या क्षणापर्यंत, लालू-नितीश यांच्या युतीकडे, ‘अस्तित्व टिकविण्याचा केविलवाणा प्रयत्न’ याच नजरेने पाहिले जात होते. मोदीतेजाने दिपलेल्यांना या युतीच्या राजकीय परिणामांचा अंदाजच आला नाही. वर्षांनुवर्षे निवडणुकांची मैदाने गाजवितानाही, विधानसभा निवडणुकांमधील लढाईचे नियम वेगळे असतात, याचाही विसर पडला आणि परिणाम पुढे येताच हवेत तरंगणारे पाय जमिनीवर आले. मोदी नावाची लाट ओसरल्याचे संकेत देणाऱ्या या निकालांनी महाराष्ट्रात स्वबळाची स्वप्ने पाहणाऱ्या भाजपला आता शिवसेनेसोबतच्या युतीची अपरिहार्यता वाटू लागली, तर त्यात आश्चर्य असणार नाही. भाजपला आता युती टिकविण्याशिवाय पर्यायच नाही, याचा अंदाज शिवसेनेलादेखील आला असावा, म्हणूनच, सेना पक्षप्रमुखांनी मोदींसाठी छोटीशी पाठशाळा घेऊन संरक्षणनीतीने चार शब्दही सुनावले. युतीधर्माच्या पालनातील अडथळ्यांचा मुद्दा असतो, तो जागावाटपाचा.. कमी-अधिक तडजोडी करून तोही सोडविला जाईल आणि त्यासाठी कदाचित भाजपलाच समजूतदारपणा दाखवावा लागेल, याबद्दल सेनेत बहुधा निश्चिंतता असेल. कारण, पोटनिवडणुकीनेच तसा धडा शिकविला आहे!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena snubs bjp over bypoll results
First published on: 27-08-2014 at 12:47 IST