प्रथम नेम पाहिजे पण फार नेम करू नये, या वाक्याचे विवरण गेले काही दिवस आपण पाहिले. यातला ‘फार’ नेम म्हणजे नेमका काय, तेही जाणण्याचा आपण प्रयत्न केला. आता या वाक्याचं विवरण संपवताना आणि ज्या मूळ बोधवचनातून ते आलं आहे त्या बोधवचनातील उरलेल्या दोन टप्प्यांचा विचार करण्यापूर्वी आपण या ‘फार’ची आणखी एक सूक्ष्म छटा पाहणार आहोत. पहिल्या पायरीवरील साधकात राजस आणि तामस अहंकार असतोच आणि त्यामुळे उपासनेच्या अवडंबरात तो अडकतो. पण उपासना जसजशी वाढत जाते तसतशी किंवा साधक मुळातच सात्त्विक प्रवृत्तीचा असेल तर सात्त्विक अहंकाराचा सापळाही त्याला कसा अडकवतो, हे श्रीमहाराजांच्या लीलाचरित्रातील एका प्रसंगात खुबीने श्रीमहाराजांनी दाखवून दिले आहे. हा प्रसंग ‘हृद्य आठवणी’मध्ये आहे. तो असा- एक प्राचार्य कुंभारस्वामींचे शिष्य होते. उपासनेचा नियम ते कटाक्षाने पाळीत. पहाटे लवकर उठून, स्नान वगैरे सर्व आटोपून बरोबर सूर्योदयाच्या वेळी ते आपल्या गुरूंची आरती करीत. वर्षांनुवर्षे हा नियम चालला. एकदा त्यांना ताप आला. तापमान १०४ अंश होते. घरची मंडळी त्यांना स्नान न करता आरती करण्यास आग्रहाने सांगू लागली. त्यांनी मुळीच ऐकले नाही. मात्र नंतर लगेच पांघरूण घेऊन ते अंथरुणात पडून राहिले. त्यांना झोप लागली, खूप घाम सुटला आणि त्यांचा ताप साफ निघाला. यानंतर ते श्रीमहाराजांना भेटले. प्राणापलीकडे नेम सांभाळण्याच्या त्यांच्या निश्चयाचे कौतुक करून श्रीमहाराज म्हणाले, ‘‘देहाचे नियम देहाच्या स्थितीवर अवलंबून असतात. उपासना मुख्यत: मनाची बाब असते. देहाला आणि मनाला वळण व शिस्त लावणे हा नेमाचा हेतू असतो. तुम्ही आजवर देहाची बंधने पाळली. आता बंधनांत अडकून न पडता त्याच्या पलीकडे जाणे जरूर आहे. प्राणापलीकडे सांभाळलेला नियम सोडणे जिवावर येते, पण याचे मूळ आत वसणाऱ्या सूक्ष्म अहंकारात असते. ‘मी आजपर्यंत हे केले’ हा सूक्ष्म अहंकार असतो, म्हणून ‘आता मला हे करता येत नाही’ याचे वाईट वाटते. वास्तविक आजपर्यंत जे झाले ते सद्गुरूंनीच करवून घेतले म्हणून घडू शकले. अर्थात खरे कर्तेपण सद्गुरूंचेच आहे. आपण ते आपल्याकडे घेतो हे चुकते. आळसाने केले नाही असे होऊ नये ही खबरदारी आपण घ्यावी, पण शरीर थकल्यामुळे एखादी गोष्ट होत नसेल तर जबरदस्तीने ती करण्याचा हट्टही धरू नये. पूर्ण शरणागती असावी. आपले निराळे अस्तित्वच नाहीसे करावे. ‘झाले किंवा न झाले, दोन्ही त्यांचीच इच्छा’ असे म्हटल्याने अनुसंधानही टिकते.’’ इतके सांगून शेवटी महाराज म्हणाले, ‘‘हे सारे तुम्हाला तुमच्या गुरूंच्याच नावाने मी सांगतो आहे, हे विसरू नये.’’ तेव्हा सात्त्विक अहंकार किती सूक्ष्मपणे अडकवतो, हे लक्षात यावे. अर्थात कोणताही नियम पाळताना ‘आपण प्रामाणिक मात्र असावे’ हा महाराजांनीच सांगितलेला अंकुश सतत बाळगावा आणि आपली आपण तपासणी करीत तो नियम पाळावा. महत्त्व नियमाला नाही हेतूला आहे, हे मात्र कधीच विसरू नये.
संग्रहित लेख, दिनांक 7th Feb 2013 रोजी प्रकाशित
२८. सूक्ष्म सापळा
प्रथम नेम पाहिजे पण फार नेम करू नये, या वाक्याचे विवरण गेले काही दिवस आपण पाहिले. यातला ‘फार’ नेम म्हणजे नेमका काय, तेही जाणण्याचा आपण प्रयत्न केला. आता या वाक्याचं विवरण संपवताना आणि ज्या मूळ बोधवचनातून ते आलं आहे त्या बोधवचनातील उरलेल्या दोन टप्प्यांचा विचार करण्यापूर्वी आपण या ‘फार’ची आणखी एक सूक्ष्म छटा पाहणार आहोत.
First published on: 07-02-2013 at 12:29 IST
मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Small trap