स्नो बोर्डिंग या साहसी खेळातून दोघांत प्रेमाचे धागे जुळले आणि एका अनोख्या प्रेमकथेचा प्रारंभ झाला..  या प्रेमकहाणीला केवळ भौगोलिक सीमांच्या त्यागाचा मुलामा नसतो, तर सारी बंधने तोडून परस्परांच्या साथीने केलेल्या एका यशस्वी वाटचालीची ती कहाणी ठरते. एका सुंदर सहजीवनाची कहाणी..
सुविचारांचे अर्थ काळाच्या ओघातही टिकून राहतात, तसाच ‘साहसे श्री प्रतिवसति..’ हा संस्कृत सुविचार. यातील ‘श्री’ म्हणजे केवळ लक्ष्मी-संपत्ती नव्हे, श्री म्हणजे मानवी प्रतिष्ठा, असा अर्थ मनाची मशागत झालेला, बौद्धिकदृष्टय़ा संपन्न ठरलेला कोणताही समाज आज याच सुविचारातून काढू शकतो. या समाजात साहसी खेळांना अगदी कॉपरेरेट पातळ्यांवरही महत्त्व दिले जाते, ते कंपनीत असलेल्या मनुष्यबळाच्या विकासासाठी. अशा साहसी वृत्तीतूनही मने जोडली जातात, कधी तर त्या मनांना प्रेमाचा बहर येतो आणि या प्रेमातून बहरलेल्या सहजीवनातून, यशाची अनेक शिखरे हातात हात घालून पादाक्रांत केली जातात. हे निखळ सहजीवन आणि असा निखळपणा, हीदेखील एक संपन्नताच. कारण, प्रेमाला तर कोणत्याही सीमाच नसतात. सहजीवनाच्या असीम भावनांनी जेव्हा सारी मने प्रेमभावाने भारून जातात, तेव्हा आपण कागदावर आखलेल्या भौगोलिक सीमांची बंधने तर आपोआपच गळून पडतात आणि ज्यांनी स्व-भाव विसरून परस्परांचे प्रेम जिंकले, ते सर्वश्रेष्ठ संपन्नतेचे धनी होतात.. या प्रेमसंपन्नतेपुढे सारे तुच्छ तुच्छ होऊन जाते आणि संपन्नतेची व्याख्या आपोआपच बदलून जाते. श्रीमंतीच्या साऱ्या संकल्पना फक्त प्रेमाभोवतीच एकवटतात, प्रेमापुरत्याच मर्यादित होतात आणि प्रेमाच्या श्रीमंतीसमोर, पशाच्या श्रीमंतीचा सारा तोरा सहजपणे, आपोआपच गळून पडतो.
अशा एका निखळ सहजीवनातून फुललेल्या प्रेमश्रीमंतीची एक आगळी कहाणी अलीकडेच एका साहसाच्या अंगणात फुलली आणि बहरून जगासमोर आली.. या कहाणीतून दोघा प्रेमवीरांच्या संपन्न सहजीवनाचा सुगंध सर्वदूर दरवळत गेला आणि प्रेमाला सीमा नसतात, हेही पुन्हा अधोरेखित झाले.. स्नो बोìडग या साहसी खेळातून या प्रेमाचे धागे जुळले आणि एका अनोख्या प्रेमकथेचा प्रारंभ झाला. त्या दिवशी अलेना सावíझना आणि तिचा नवरा व्हिक वाइल्ड या दोघांनीही या साहसी खेळाच्या स्पध्रेत रशियाला कांस्य आणि सुवर्णपदक मिळवून दिले, तेव्हा अवघ्या रशियाने त्यांच्यावर प्रेमवर्षांव केला.. स्पध्रेची अंतिम रेषा ओलांडून अलेनाने कांस्यपदक प्राप्त केल्यानंतर ती आपल्याच विजयाचा आनंद साजरा करीत होती. या आनंदात मश्गूल असतानाच काही मिनिटांतच व्हिकच्या सुवर्णविजयाची वार्ता तिला समजली आणि अलेनाच्या आनंदाला पारावार उरला नाही. तिच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर सुरू झाला.. या सहजीवनाची सुरुवात मोठी मोहक आहे.. मूळचा अमेरिकन असलेला व्हिक एका अनपेक्षित क्षणी अलेनाच्या समोर येतो, त्या साहसी खेळात दोघांची परस्परांसमोर गाठ पडते, क्षणकाळाची नजरानजर होते, पुढच्याच क्षणी दोघेही आपापल्या वेगाने बर्फावरून घसरत पुढे निघून जातात.. आणि मागे उरते, मनात रुजलेली एक नाजूक भावना.. एका क्षणाच्या त्या अनोख्या किमयेनं दोघांच्याही जगण्याला जणू नवा अर्थ प्राप्त होतो. दोन वर्षांपूर्वी व्हिक वाइल्डने रशियन नागरिकत्व स्वीकारले; पण त्याआधीच आपल्या मायदेशाचा त्याग करून त्याने रशिया गाठला होता. अलेनाशी तो विवाहबद्ध झाला. दोघेही एकाच खेळात रमणारे, या खेळाच्या विश्वातील अनेकांशी परस्परांच्या साथीने स्पर्धा करत राहणारे आणि दोघांचे यशदेखील हातात हात घालून मिळविलेले. सोची येथील हिवाळी ऑलिम्पिकमधील पदके स्वीकारताना दोघांच्याही डोळ्यांत, निखळ आनंद दिसत होता. कारण, त्या खेळातील स्पध्रेचा शिरकाव त्यांच्या सहजीवनात झाला नाही. म्हणूनच स्वत:चा विजय साजरा करताना आनंदात बुडालेली अलेना व्हिकच्या विजयाच्या वात्रेने अधिकच मोहोरली. भावुक झाली..
व्हिक आणि अलेनाची ही कहाणी एका निखळ प्रेमाची कहाणी आहेच, पण एकाच क्षेत्रात असूनही, एकमेकांच्या हातात हात घालून, सहजीवनाचा आनंद लुटताना परस्परांशी कोणतीही स्पर्धा न करता पारदर्शीपणाने आपल्या यशाची शिखरे पादाक्रांत करणाऱ्या महत्त्वाकांक्षेचीही कहाणी आहे. व्हिक आणि अलेनाच्या या विजयोत्सवाची वार्ता त्या दिवशी अनेक आंतरराष्ट्रीय माध्यमांनी मोठा ममतेने जगासमोर आणली. त्या बातमीत केवळ त्यांनी मिळविलेल्या पदाचा गौरव नव्हता, तर त्यांच्या अनोख्या प्रेमाचा, निखळ सहजीवनाचा आणि एकाच क्षेत्रात असूनही, परस्परांशी स्पर्धा न करता, हातात हात घालून त्याच क्षेत्रातील अन्यांशी स्पर्धा करीत आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्याच्या एकत्रित प्रयत्नांच्या गौरवानेच या बातम्यादेखील भारलेल्या होत्या.
एकाच क्षेत्रात काम करणाऱ्या आणि उत्तुंग महत्त्वाकांक्षा असलेल्या दाम्पत्यांची या जगात वानवा नाही. संगीत, उद्योग, कला, साहित्य आदी अनेक क्षेत्रांत अशी दाम्पत्ये आहेतच. तेथील आपल्या आपल्या व्यक्तिमत्त्वाची जपणूक आणि आपल्या आपल्या यशाची शिखरे जपण्याच्या ध्यासात, सहजीवनाचे निखळ माधुर्य हरवण्याच्या धोक्याची रेषा न ओलांडता अनेक दाम्पत्यांचे सहजीवन सुरू असते. अशा परिस्थितीत, कधी कधी सहजीवनाचा सूर बघडून जाईल की काय अशा भयशंकाही उभयतांना छळू लागतात. हातात हात घालून सुरू असलेल्या सहजीवनाची शक्ती आपल्या क्षेत्राला द्यावी आणि यशाचे ते शिखर दोघांनीही एकत्रितपणे गाठून त्याचा आनंदही एकत्रच अनुभवावा, या ईर्षेपासून दोघांपैकी एकजण दूर होत असल्याच्या चिंताही एखाद्या क्षणी छळू लागतात. कधी कधी त्या काळजीच्या गत्रेत अधिकाधिक गुरफटणेच सुरू होते आणि सारेच विसंगत होऊ लागते. सहजीवनाच्या गझलचे यमक कुठे बिघडले, तेच समजेनासे होते आणि सूर बिघडू लागतात. जोडीदाराच्या यशातून फुलणाऱ्या आनंदाचे झरे मग सहजीवनात झुळझुळतच नाहीत आणि साहचर्याची श्रीमंती कुठेतरी हरवत चालली आहे, अशी भावना बळावू लागते. एकाच क्षेत्रात एकमेकांच्या हातात हात घालून यशाची शिखरे गाठण्याच्या ध्यासाने पछाडलेल्या व्हिक आणि अलेनाची कहाणी यामुळेच श्रेष्ठ ठरते. ही केवळ एक प्रेमकहाणी राहत नाही. त्याला केवळ भौगोलिक सीमांच्या त्यागाचा मुलामा नसतो, तर सारी बंधने तोडून परस्परांच्या साथीने केलेल्या एका यशस्वी वाटचालीची ती कहाणी ठरते. सहजीवनाचे माधुर्य या कहाणीत ओतप्रोत भरले आहे, हे सहजपणे भासू लागते. ही कहाणी केवळ एका जागतिक क्रीडा स्पध्रेतील दोन स्पर्धकांच्या यशाची कहाणी राहत नाही.
म्हणूनच, या पदकवीर जोडप्याच्या यशाच्या बातमीला असंख्य माध्यमांनी त्यांच्या सहजीवनाच्या कथेची एक सहजसुंदर आणि हळवी अशी किनार जोडली. व्हिक आणि अलेनाच्या यशाची वार्ता केवळ बातमी राहिली नाही, तर ती एक कहाणी झाली. एका सुंदर सहजीवनाची कहाणी.. निखळ साहचर्याची कहाणी.. हातात हात घालून यशाची वाटचाल कशी करावी, याचे मार्गदर्शन करणारी कहाणी. आपल्या आपल्या यशाच्या शिखरांकडे डोळे लावताना, साहचर्याच्या भावनांचा विसर पडू पाहणाऱ्या असंख्य घरांना आज कदाचित अशा प्रेरक कहाण्यांचीच गरज असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Snowboarding a little love goes a long way for russian gold medalists vic wild and alena
First published on: 22-02-2014 at 01:23 IST