नुकताच हरियाणामधील रामपाल नावाच्या भोंदूचा आणि त्याच्या तथाकथित भक्तांचा िधगाणा आपण पाहिला. जरी हे सर्व संतापजनक होते तरी काहीच आश्चर्य वाटले नाही. उलट ही स्थिती महाराष्ट्रातही कधीही उद्भवू शकेल की काय या चिंतेने मन ग्रासले. महाराष्ट्रातसुद्धा नियमानुसार दंड विमानात घेऊ दिला नाही म्हणून भक्तांनी विमानतळावर दंगल  केल्याचे उदाहरण आहे. नाशिकमध्येही डोक्यावर फरशी ठेवून उपचार करणाऱ्या बाबाला बलात्काराच्या गुन्ह्य़ाखाली अटक झाली तेव्हा असाच बाका प्रसंग उभा राहिला होता. आसाराम बापूला अटक झाली तेव्हाही अशीच कठीण परिस्थिती होती.
या सगळ्याचे कारण सर्वानाच माहीत असूनही श्रद्धेच्या नावाखाली सर्वानी डोळ्यावर कातडी ओढून  घेतली आहे. राजकारणी, भ्रष्ट अधिकारी, काळा पसेवाले यांना असल्या भोंदूंची त्यांचा पसा लपवण्यासाठी आणि मुख्य म्हणजे तो कधीही वापरात आणता येण्यासाठी गरज असते. असल्या आश्रमांची कधीही कोणत्याही कारणासाठी तपासणी होऊ शकत नाही. २५-२५ फुटी िभती यांना का उभाराव्याशा वाटतात? आत असे काय उद्योग असतात की जे कोणीही बघू नयेत? भक्तीच जर नुसती करायची आहे तर एवढी ‘सिक्युरिटी’ या मंडळींना का लागते? पण हे प्रश्न ना सरकारला कधी पडत, ना भक्तांना! असल्या लोकांकडून कोणाचे वैयक्तिक किंवा देशाचे कोणते प्रश्न आतापर्यंत सुटले? उलट अशा सनातनी लोकांकडून सतत भडकावणारी भाषणे, िहसेला उद्युक्त करणारी वक्तव्ये आणि कृती झालेल्या आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून याचीच परिणती आहे. पण समाज म्हणून याचे आपल्याला ना सोयर ना सुतक!
कारण ‘माझा बाबा, बापू असा नाहीच मुळी’ हीच आपली भावना असते. जिथे सरकारच्या शपथविधीलाच असले गणंग मोठय़ा मानाने मिरवले जात होते तिथे आपण सामान्यजन कोणाकडून काय अपेक्षा करणार? आपला विवेक शाबूत ठेवणे एवढेच आपल्या हातात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ब्लॉगर, ट्विटरचा प्रवर्तक इव्हान विलियम्स अवलियाच
ट्विटर या सामाजिक माध्यमाचा सर्वत्र उदोउदो चालू असताना या कंपनीचे आíथक अपयश अधोरेखित करणारा गिरीश कुबेर यांचा ‘सय इथली संपत नाही..’  हा लेख (अन्यथा, १५ नोव्हेंबर)समर्पक वाटला. मात्र लेखातले दोन उल्लेख त्रुटीपूर्ण आहेत, ते सुधारावेसे वाटतात.  ट्विटरचे संस्थापक ही अनेक कॉलेजवयीन पोरे होती अशा अर्थाचे विधान लेखात आहे. हे फक्त अंशत: खरे आहे. २००६ मध्ये ट्विटरचा उदय झाला त्या वेळी संस्थापकांपकी एक असलेला इव्हान विलियम्स हा ३४ वर्षांचा आयटी जगाचे टक्केटोणपे खाल्लेला संशोधक आणि एक यशस्वी प्रवर्तक होता. ‘ब्लॉग’ ही संकल्पना लोकप्रिय करणारी ‘ब्लॉगर’ नावाची कंपनी विलियम्सने स्थापली होती. ब्लॉगरला पुढे गूगलने विकत घेतले; मात्र एका वर्षांतच विलियम्सने गूगल सोडून पुढे ज्या अनेक कंपन्या स्थापल्या, त्यातल्या एका कंपनीचे उत्पादन म्हणजे ट्विटर. (म्हणूनच मुळात ट्विटरची सुरुवातीची ओळख एक मायक्रो-ब्लॉग संकेतस्थळ अशीच होती.) इंटरनेटच्या इतिहासात एका दशकातच दोन अतिशय लोकप्रिय कंपन्या स्थापणारा विलियम्स हा एक अवलिया उद्योजक आहे.
तसेच डॉस ही संगणक कार्यप्रणाली िवडोजचा वापर वाढल्यावर मागे पडली, असे म्हटले आहे, हे खरे नाही. िवडोज आणि डॉस या दोन्ही कार्यप्रणाल्या मायक्रोसॉफ्टच्या आहेत. िवडोज कार्यप्रणाली डॉसपासून उत्क्रांत झाली आहे. िवडोजची सुरुवातीची अनेक आवर्तने ही तांत्रिकदृष्टय़ा डॉसवर आधारित होती. देशातल्या एका प्रांतात खूप वष्रे जनाधार असलेला एखादा राजकीय पक्ष हळूहळू देशभर पसरताना अनेक विचारधारांचा स्वीकार करत नवीन अवतार धारण करतो तसे डॉस आणि िवडोजचे झाले आहे. (उत्क्रांतीच्या पायरीवर आधी उपयोगी असलेला, पण आता फारसे काम नसलेला अवयव टिकून राहतो तशी अजूनही डॉस िवडोजमध्ये आपले क्षीण अस्तित्व राखून आहे!) सॉफ्टवेअर उत्पादनांचा बालमृत्युदर खूप असतो. बदलत्या तंत्रज्ञानाच्या झंझावातात अनेक जुने, मातब्बर सॉफ्टवेअर वृक्ष उन्मळून पडतात. अशा वातावरणात ट्विटरला सावध हाका देणाऱ्या, एरवी अप्रतिम असलेल्या लेखात त्रुटी राहू नयेत म्हणून हा पत्रप्रपंच.
– भूषण निगळे, जर्मनी

सर्वच गोष्टींत दलाल का लागतात?
आज आत गेलेला भोंदूबाबा रामपाल आणि आधी आत गेलेला आसाराम.. आधी टीव्हीवर योगासने दाखवणारा, पण आता मात्र स्वत:ला जगातली सर्व अक्कल आहे असे समजणारा बालिश ‘झेड सिक्युरिटीसम्पन्न’ रामदेव, गल्लोगल्ली सुळसुळाट झालेले बुवा, बापू आणि महाराज चमत्कार करून आणि गाणी गाऊन असाध्य रोग बरे करण्याचा दावा करणारे आणि जागोजागी मेळावे घेणारे काही भोंदू ब्रदर्स/ सिस्टर्स इव्ह्य़ांजेलिस्ट/ हीलर्स, ऊठसूट फतवे काढणारे आणि धर्माच्या नावाखाली लोकांना बुद्धू ठेवणारे काही अतिरेकी विचारांचे मुल्ला आणि मौलवी.. आणि या सर्वापाठी वेडे झालेले सुशिक्षित लोक.. हे सर्व पाहिले की आपल्या समाजाच्या बुद्धीची खरंच कीव येते!
आपल्याला सर्व गोष्टींमध्ये असले दलाल का लागतात? देवाने आपले वकीलपत्र या सर्व बाबा/ बुवा/ मुल्ला/ ब्रदर यांना कधी दिले? देवावरचा विश्वास आणि श्रद्धा ही वैयक्तिक गोष्ट असावी हे माझे मत आहे.
 धर्माच्या नावाने पसे कमवून आपली साम्राज्ये उभारणाऱ्या या नालायक दलाल कम्पनीला कशाला भाव द्यायचा?
– चिन्मय गवाणकर, वसई

महाराजांनी मराठवाडय़ात पाऊस पाडून दाखवावा
भारतीय स्वातंत्र्यलढय़ाचा सामाजिक पाया ज्यांनी बांधला त्या राजा राममोहन राय, महात्मा फुले यांसारख्या महान समाजसुधारकांनी २०० वर्षांपूर्वी जो एकेश्वरवादाचा व ‘देवाच्या पूजेसाठी एजंटची गरज नाही’ हा विचार दिला, तो आजच्या विज्ञान-तंत्रज्ञान युगातही विसरला जातो आहे.
आसाराम व रामपाल तर फक्त प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. महाराष्ट्रातही अशा भोंदूंचा सुळसुळाट आहे. कोणी फुलपात्रामध्ये अमृत म्हणून पाणी पाजतोय, तर कोणी धर्म धोक्यात आहे म्हणत आदरणीय महाराज बनत वेडय़ात काढतायेत.
या सगळ्यांचा इतिहास तपासल्यास बहुतेक जण हे पूर्वाश्रमीच्या चुकांमुळे नोकरीतून काढून टाकलेले, अथवा जेलची हवाही खाऊन आलेले आहेत.
या सर्व महाराज (?) लोकांना एक प्रश्न विचारावासा वाटतो की, जर तुम्हाला दैवी साक्षात्कार झाले आहेत; तुम्ही सोने, चांदी हातात जादूने निर्माण करू शकता तर एक छोटेसे काम करा आमच्यासाठी, इकडे मराठवाडय़ात गेली अनेक वर्षे भीषण दुष्काळ आहे हो! कृपा करून देवाला विनंती करून पाऊस पडू शकेल काय? खूप मदत होईल इतल्या गरीब बिचाऱ्या शेतकऱ्याला.
– अक्षय नलावडे, परांडा (उस्मानाबाद)

मराठीतील सर्व लोकमानस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: So called gurus baba and maharaj
First published on: 22-11-2014 at 01:39 IST