आंतरराष्ट्रीय फुटबॉलच्या नकाशावर भारताचे स्थान लिंबूटिंबूचे आहे. प्रचंड लोकसंख्या असूनही जागतिक क्रमवारीत भारत अव्वल शंभर संघांतही नाही. निराश करणाऱ्या या भौतिक गोष्टींचा विपरीत परिणाम होऊ न देता सुनील छेत्रीने फुटबॉलपटू होण्याचे स्वप्न जोपासले. गुणवत्तेला मेहनतीची जोड मिळाली तर काय किमया होते याचा प्रत्यय छेत्रीने दिला. फिफा विश्वचषक पात्रता फेरीतील ग्वामा संघाविरुद्धच्या लढतीत भारतातर्फे ५० गोल करण्याचा पराक्रम त्याने केला. आंतरराष्ट्रीय गोल्सचे अर्धशतक पूर्ण करणारा तो पहिला भारतीय ठरला. ८७ आंतरराष्ट्रीय सामन्यांत त्याने हे ५० गोल केले.
तेलंगणातील सिकंदराबाद येथे जन्मलेल्या छेत्री मूळचा नेपाळचा. त्याचे वडील नेपाळ सैन्यदल फुटबॉल संघात खेळायचे, तर आई व बहीण या दोघीही नेपाळच्या महिला राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करत. सुनीलही स्थानिक स्पर्धामध्ये सातत्याने सहभाग घेत राहिला. मोहन बगान क्लबकडून त्याने आपल्या फुटबॉल कारकीर्दीला सुरुवात केली. २००२ ते २००५ या सालात क्लबकडून खेळताना त्याने ८ सामन्यांत १८ गोलचा पाऊस पाडला. याच कामगिरीच्या बळावर त्याने भारताच्या २० वर्षांखालील संघात स्थान मिळवले आणि पहिल्याच लढतीत गोल करून पाकिस्तानवर १-० असा विजय साजरा केला. योगायोग म्हणजे वरिष्ठ संघातील त्याचे पदार्पण हे पाकिस्तानविरुद्धच झाले आणि त्यातही त्याने गोल केला.
२००७ मध्ये त्याने पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळली. ‘नेहरू चषक’ १९९७ नंतर दशकभराने भारताकडे आला, तो त्याच्यामुळे. मग २०१० फिफा विश्वचषक पात्रता स्पर्धा, सॅफ अजिंक्यपद स्पर्धा, एएफसी चॅलेंज चषक आणि आशिया चषक अशा स्पर्धामध्ये त्याने आपले नाणे खणखणीत वाजवले. त्यामुळेच त्याची भारताचा नवा ‘पोस्टर बॉय’ अशी ओळख निर्माण झाली. २०१२मध्ये एएफसी चॅलेंज चषक पात्रता फेरीसाठी त्याच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ पडली. ती भूमिकाही उत्तम निभावून त्याने स्वत: दोन गोल करताना भारताला मलेशियावर ३-२ असा विजय मिळवून दिला. डिसेंबर २०११मध्ये सुनीलने सॅफ अजिंक्यपद स्पध्रेच्या एका हंगामात सर्वाधिक ७ गोल करण्याचा विक्रम केला. २०१३-१४ या वर्षांत आय लीगमध्ये पदार्पण करणाऱ्या बंगळुरू एफसीने सुनीलला क्लबमध्ये घेतले. सुनीलच्या परिसस्पर्शाने बंगळुरू एफसीने पदार्पणातच आय लीगचे जेतेपद पटकावून इतिहास घडविला. भारतीय फुटबॉलचा नवा नायक ही बिरुदावली त्याने पटकावली आहे.