१११. ध्येय-प्रकाश

उपासना करावी, अशी तीव्र आणि प्रामाणिक इच्छा साधकाच्या मनात असते. प्रत्यक्ष उपासनेला बसलं की मन त्यात रमत नाही, ही त्याची मोठी अडचण असते.

उपासना करावी, अशी तीव्र आणि प्रामाणिक इच्छा साधकाच्या मनात असते. प्रत्यक्ष उपासनेला बसलं की मन त्यात रमत नाही, ही त्याची मोठी अडचण असते. मग माझ्याकडून उपासना करवून घ्या, म्हणून तो आळवणी सुरू करतो. अशी आळवणी म्हणजे वेळ वाया घालवणं आहे, पळवाट आहे, काही न करता – आपण उपासनेसाठी कसे असहाय आणि अक्षम आहोत, अशी स्वत:ची समजूत करून घेत उपासना टाळण्याचा मनाचा एक खेळ आहे, असंच स्वामींना वाटत असावं. ते मास्तरांना सांगतात, ‘‘कोणाला आळवण्याचे भानगडीत न पडता भजनमार्गाचे आक्रमण करण्यातच आपली सर्व शक्ती खर्च करावी.’’ म्हणजे आपली शक्ती नुसत्या आळवण्यात खर्च करीत बसू नका, तर उपासनेकडेच ती वळवा. मग साधकाच्या मनात काय येतं? साधनेतली प्रगती माझ्या प्रारब्धातच नसेल. मी खूप प्रयत्न केले तरी काय उपयोग? साधनेतील प्रगती ही काय इतकी सोपी गोष्ट आहे का? माझ्यासारख्याच्या प्रयत्नांनी काय होणार आहे? भगवंताची कृपाच खरी. अर्थात कृपेनंच सारं काही होतं, यात शंका नाही. तरी या पातळीवरचा साधक निराशेतून आणि निष्क्रियतेतून कृपेवर सारं काही ढकलू पाहात असतो. म्हणूनच स्वामी स्वरूपानंद बजावतात, ‘‘मनुष्य प्रारब्धाधीन असला तरी सर्वस्वी पराधीन नसतो. प्राणिमात्राला स्वत:च्या प्रयत्नांनीच परमेश्वराचे पद प्राप्त करून घ्यायचे असते. प्रयत्नांती परमेश्वर, हा सिद्धांत सर्वमान्य आहे. या प्रयत्नांचा अवलंब कोणत्या साधनांनी करायचा, हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. त्या प्रयत्नांच्या आड येईल ते प्रारब्ध एवढाच प्रारब्धासंबंधी विचार करावयाचा. प्रयत्नांची परमावधी हेच आमचे कर्तव्य! आम्ही विचार करावयाचा तो प्रयत्नांसंबंधी, प्रारब्धासंबंधी नव्हे! प्रारब्ध सानुकूल असेल तर अप्रतिहत (वेगाने) प्रगती होईल आणि प्रतिरोधी असेल तर प्रगतीची गती मंदावेल इतकेच! प्रगती द्रुत गतीने वा मंद गतीने कशीही होवो. प्रगतीसाठी अविरत प्रयत्न करणे हेच जिवाचे कर्तव्य!’’ प्रारब्धासमोर हतबल होणाऱ्या कुणालाही हा बोध जीवनात उतरवण्यासारखा आहे.  प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. त्या प्रयत्नांमध्ये अडथळा आला तर ते प्रारब्ध समजावं, पण प्रयत्न सोडू नये! अडथळ्यांनी फार तर प्रगती संथपणे होईल, पण प्रगती झाल्याशिवाय राहाणार नाही, हा स्वामींचा अभिनव सिद्धांत आहे! ‘अमृतधारा’ काव्यात स्वामींनी फार सुंदर शब्दांत सांगितलं आहे की, ‘‘ध्येय असावें सुदूर कीं जें कधीं न हातीं यावें। जीवें भावें मात्र तयाच्या प्रकाशांत चालावें।।’’ मोक्षाचं ध्येय गाठण्याचं शिखर फार दूर आहे. तो मोक्ष कधी गवसेल की नाही, हे माहीत नाही. तरीही त्या ध्येयाच्या प्रकाशात सर्वस्वभावानं मी चालत राहिलं पाहिजे! बद्ध, मुमुक्षु, साधक या तिन्ही टप्प्यांवर मोक्षाकडे वाटचाल करण्याची, मोक्षशिखराकडे अग्रेसर होण्याची संधी आहेच. अगदी त्याचप्रमाणे मुमुक्षु आणि साधक या टप्प्यांवरच नव्हे तर सिद्ध या चौथ्या टप्प्यावरही मोहात फसून बंधनात अडकण्याचा आणि तेथून घसरण्याचा धोका आहेच.  

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व संपादकीय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Swaroop chintan aim