साईबाबांनी गीतेतील आमच्या अंतरंगात ३४व्या श्लोकाचं जे अद्भुत विवरण केलं ते आपण जाणून घेऊच, कारण स्वामी स्वरूपानंद संपादित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील ५० ते ९६ या ओव्यांचा उलगडाही साईबाबांच्या या बोधाच्या आधारे अगदी सहज होणार आहे! ‘साईसच्चरित्रा’तील ३९ आणि ५० हे दोन अध्याय या एका श्लोकासाठीच समर्पित आहेत! ‘उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं’ या चरणात ज्ञान शब्दामागे ‘अ’ हा अवग्रह साईबाबांनी दाखवून दिला. मग हा चरण ‘उपदेक्ष्यन्ति ते अज्ञानं’ असा होतो! बाबा सांगतात, ‘‘हें मी काय वदें विपरीत। अर्थाचा काय करितों अनर्थ। असत्य काय पूर्वील भाष्यार्थ। ऐसेंही निर्थ ना मानीं।।’’ (अरे, मी हा काय विपरीत अर्थ लावतो आहे, अर्थाचा अनर्थ करतो आहे, मग शंकराचार्यापासून सर्वाचे भाष्य काय खोटं होतं का, असे निर्थक विचार मनात आणू नकोस.) काय विलक्षण आहे पाहा! या श्लोकानंतर संस्कृततज्ज्ञ असलेल्या नानांनी बाबांच्या पायाशी संपूर्ण गीता आणि तिचं व्याकरण समजावून घेतलं होतं! बाबा म्हणाले, ‘‘ज्ञानी हा ज्ञानाचा उपदेश करतो, असं जे सांगतोस, त्याऐवजी ते अज्ञान कोणतं, हा उपदेश करतात, असा अर्थ घेतलास तर यथार्थ आकलन होईल. कारण, ज्ञान नव्हे बोलाचा विषय। कैसें होईल तें उपदेश्य। .. ‘अज्ञान’ वाणीचा विषय होत। ज्ञान हें शब्दातीत स्वयें।। (ज्ञान हा बोलण्याचा विषय नाही, मग त्याचा उपदेश कसा करता येईल? ज्ञान सांगता येत नाही, पण अज्ञान काय, ते सांगता येतं. त्यामुळे अज्ञान हा वाणीचा विषय आहे! ज्ञान तर मुळातच शब्दातीत आहे!) अरे, राखेखाली वन्ही दबला असतोच. राख दूर करताच धडाडून ज्वाला वर येतात. अगदी त्याचप्रमाणे ज्ञानाला अज्ञानानं दडपलं आहे! अज्ञानानें आवृत ज्ञान। केलें या गीतीं भगवंतें कथन। एतदर्थ होतां अज्ञाननिरसन। स्वभावें ज्ञान प्रकाशे।। (अज्ञानानं ज्ञानाला आवृत्त केलं आहे, ज्ञानावर अज्ञानाचं आवरण आहे. त्यामुळे अज्ञानाचं निरसन झालं की ज्ञान प्रकाशमान आहेच). ज्ञान हें तों स्वत:सिद्ध। शैवालावृत तोयसें शुद्ध। तें शैवाल जो सारील प्रबुद्ध। तो जल विशुद्ध लाधेल।। (शेवाळानं शुद्ध पाणी झाकलं आहे. शेवाळ दूर केलं की ते शुद्ध जल मिळेलच. तसं ज्ञान हे स्वतंत्रपणे मिळवायचं किंवा सिद्ध करायचं नाही, ते स्वयंसिद्धच आहे). जैसे चंद्र-सूर्याचें ग्रहण। ते तों सर्वदा प्रकाशमान। राहू केतु आड येऊन। आमुचे नयन अवरोधिती।। चंद्र-सूर्या नाहीं बाध। हा तों आमचे दृष्टीस अवरोध। तैसें ज्ञान असे निर्बाध। स्वयंसिद्ध स्वस्थानीं।। (चंद्र, सूर्य हे सदाप्रकाशमान आहेत. ग्रहणाने त्यांचा प्रकाश लोपल्याचे आम्हाला वाटते. प्रत्यक्षात ते त्यांच्या जागी तसेच प्रकाशमान असतात! अगदी त्याचप्रमाणे ज्ञान स्वयंसिद्ध आहे, स्वस्थानी आहे आणि निर्बाध अर्थात बाधारहित आहे. जिवाला अज्ञानाची बाधा झाली असल्याने त्याला ज्ञान हे शोधण्याचा विषय वाटते!).’’ मग श्लोकाचा जो पूर्वाध की, सद्गुरूंची सेवा करून, त्यांना प्रणिपात करून, प्रश्न करावा त्याबाबत बाबा हसून म्हणाले, ‘‘नाना नुसता नमस्कार करून, नुसती सेवा करून आणि नुसता प्रश्न विचारून ज्ञान ‘मिळतं’ का रे?’’