शाश्वत अशा सद्गुरूंनी केलेल्या बोधाचं चिंतन, मनन आणि आचरण न करता अशाश्वत अशा भौतिकाचं चिंतन, मनन आणि त्या भौतिकाच्या ओढीच्या ऊर्मीनुरूप आचरण करण्यात आयुष्य सरत असेल तर अंत:करणातला आत्मज्ञानाचा ठेवा प्रकाशित होणार नाहीच. स्वामी स्वरूपानंद संजीवनी गाथेतील ७२व्या अभंगात स्पष्ट सांगतात, ‘‘अंतरीं स्वानंद असे स्वयंसिद्ध। परि मति-मंद भोगी चि ना।। १।।’’ अंत:करणात स्वानंद स्वयंसिद्ध आहेच, पण त्यासाठी आत उतरण्याची जी कला आहे तिच्याबाबत ज्याची मती, गती मंदच आहे आणि अशाश्वत भौतिकामागे धावण्याची ज्याची मती-गती वेगवान आहे, त्याला तो आंतरिक आनंद भोगताच येत नाही. ‘‘समाधी-निधान असतां सन्निध। झालासे मोहांध पाहे चि ना।। २।।’’ चित्तात, मनात, बुद्धीत समता नाही त्यामुळे जगण्यात असमानता आहे. जगण्याची सम साधून देणारा सद्गुरू जवळ येऊनही मोहाने अंध झालेला त्याला पाहूदेखील शकत नाही, मग ओळखणं तर दूरच! ‘‘अखंड भजन चाले रात्रं-दिन। तेथें सावधान राहे चि ना।। ३।।’’ काही न करता, जिवाच्याही नकळत त्याचा श्वासोच्छ्वास सुरू आहे. हा सहज आणि अखंडपणे चालणारा ‘सोऽहं’च आहे! केवळ श्वास घेतला जात आहे, म्हणून आपण जिवंत आहोत आणि या प्राणशक्तीचं हे भजन अखंड चालू आहे, हे भान ज्याला नाही, या सूक्ष्म भजनाबाबत जो सावध नाही, या सूक्ष्म भजनाकडे ज्याचं लक्ष जात नाही त्याला स्थूल जगण्यात तरी सावधानता कशी साधणार? जोवर अवधान येत नाही तोवर अनवधानापायी बोलू नये ते बोललं जातं, करू नये ते केलं जातं, वागू नये तसं वागलं जातं. अनवधानापायीच माणूस ‘दु:खं’ ओढवून घेतो आणि अवधान असेल तर त्याला त्या ‘दु:खा’चं खरं स्वरूप उकलत आणि ते ‘दु:ख’ त्याला उन्मळून टाकत नाही! पण अवधानाची ही कला केवळ सद्गुरूच शिकवू शकतो. ‘‘सद्गुरूवांचून नाहीं आत्म-ज्ञान। जाईना शरण स्वामी म्हणे।। ४।।’’ अंतरंगात स्वयंसिद्ध असलेलं आत्मज्ञान सद्गुरूवाचून जाणवत नाही, असं असलं तरी भौतिकापायी ज्याची मती मंद झाली आहे त्याला गुरूशरणता साधत नाही! सद्गुरूला शरण जाणं म्हणजे त्याच्या मार्गाचा पूर्ण स्वीकार करून त्या मार्गानं चालणं. सद्गुरूंचे चरण अंत:करणात धरून त्यांच्या बोधानुरूप जगणं. जेव्हा हे चरण अंत:करणात ठसतील आणि त्यांच्या बोधानुरूप जगणं सुरू होईल, तेव्हाच माझं आचरण सुधारेल. वणवण, भटकंती थांबेल. मग सद्गुरू जेव्हा सूक्ष्म बोध करू लागतील तेव्हा आपल्या अंत:करणात ते ज्ञान आहेच, याचा अनुभव येऊ लागेल. खोलीत अंधार असेल तर हवी ती वस्तू सापडत नाही. खिडकी उघडताच जेव्हा प्रकाश आत येतो तेव्हा ती वस्तू लगेच दिसते. अंधार होता तेव्हाही ती वस्तू होतीच ना? तरी तिच्याबद्दल खात्री नव्हती. उजेड येताच ती वस्तू स्पष्ट दिसते. तसंच मोहाच्या अंध:कारामुळे अंत:करणात असलेलं ज्ञान दिसेनासं झालं होतं. सद्गुरूबोधाच्या किरणांनी ते आपोआप उजळू लागलं!