प्रभू सांगतात, ‘‘तो मी वैकुंठीं नसें। वेळु एक भानुबिंबीं न दिसें। वरी योगियांचींहि मानसें। उमरडोनि जाय।।’’ मग मी कुठे असतो? स्वामी स्वरूपानंद संपादित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील ६७ ते ७० या चार ओव्यांत ती ‘जागा’ सांगितली आहे. ‘‘परी तयांपाशी पांडवा। मी हारपला गिंवसावा। जेथ नामघोषु बरवा। करिती माझा।। ६७।।’’ (ज्ञा. अ. ९, ओवी २०८). पंचमहाभूतं, पंच ज्ञानेंद्रियं आणि पंच कर्मेद्रियं अशा ‘प्रपंचा’त अडकलेल्या हे जिवा (पांडवा) मी सद्गुरूंपाशीच सापडेन (परी तयांपाशी), मी तिथेच सापडेन! (मी हारपला िगवसावा). आपण एखाद्याला शोधायला बाहेर पडतो तेव्हा त्याच्या नावानं जोरात हाका मारतो ना? मग तू खरं कोणाला शोधायला पाहिजेस, याची जाणीव तुला करून देण्यासाठी आणि तो कुठे आहे, हे तुला कळावं यासाठी तिथे माझं नाम जोरात उच्चारलं जात आहे (जेथ नामघोषु बरवा। करिती माझा।।). पावसेत स्वामी असोत, शिर्डीत बाबा असोत, गोंदवल्यात महाराज असोत.. ते प्रत्यक्ष देहात तिथे वावरत असताना काय आनंद भरून असे! त्यांच्याजवळ भौतिकाचा विसर पडे आणि मन केवळ भगवंताचं नाम, भगवंताच्या लीला, भगवंताची चर्चा यानंच भरून जात असे.. सद्गुरू जिथे असतात तिथे भगवद्भावानं असाच आनंद भरून असतो. त्या स्थानाचं हे अंगभूत माहात्म्य प्रभू सांगतात- ‘‘कृष्ण विष्णु हरि गोविंद। या नामाचे निखळ प्रबंध। माजीं आत्मचर्चा विशद। उदंड गाती।। नित्यपाठ ओवी क्र. ६८।।’’(ज्ञा. अ. ९, ओवी २१०). हा सद्गुरू भगवद्रूपानं कसा ओतप्रोत व्याप्त असतो हे ‘नित्यपाठा’तील ६९ व ७०वी ओवी सांगते. ‘‘जयांचिये वाचे माझे आलाप। दृष्टी भोगी माझें चि रूप। तयांचें मन संकल्प। माझाचि वाहे।। ६९।।’’ (अ. ९, ओवी ४४५). भौतिकासाठी, अशाश्वताच्या प्राप्तीसाठी जीव सद्गुरूंपुढे कितीही विलाप करो, ते शाश्वत बोधाचा आलाप सोडत नाहीत! चराचरात ते केवळ एका परमतत्त्वालाच पाहतात आणि माझ्यातलं परमतत्त्व जागं करण्याची प्रक्रिया अविरत सुरू ठेवतात. जिवाच्या मनात अशाश्वताच्या ओढीचे कितीही पापसंकल्प येवोत, ते त्याला शाश्वताची भक्ती रुजविणाऱ्या सत्यसंकल्पांकडेच वळवत राहतात. ‘नित्यपाठा’तली पुढच्या ओवीत प्रभूंचं हितगुज आहे. ते म्हणतात, ‘‘माझिया कीर्तीविण। जयांचे रिते नाहीं श्रवण। जयां सर्वागीं भूषण। माझी सेवा।। ७०।।’’ (अ. ९, ओ. ४४६). या ओवीच्या अर्थाला खरंच मर्यादा नाही! भगवंत अत्यंत कृतज्ञतेनं सद्गुरूंच्या दिव्य सेवेचा संकेत या ओवीत करीत आहेत आणि पुढल्या ओवीत या कृतज्ञतेचा परमोच्च बिंदू आहे! सद्गुरू सर्वागांनी माझी सेवा करीत असतात. ही सेवा काय आहे हो?  एखाद्याचे श्रम कमी करणं, त्याचं काम सोपं करणं, याला सेवा म्हणतात ना? मग सद्गुरू अखंड आणि सर्वागांनी भगवंताची कोणती सेवा करतात? ‘गुरूगीते’त महादेवांनी वर्णिलेलं सद्गुरूमाहात्म्य खोलात पाहिलं तर या ‘सेवे’चं किंचित आकलन होईल. ही सेवा म्हणजे भवसागरात अडकलेल्या जिवांना बंधनातून सोडवणं!