गेल्या भागात जी उदाहरणं दिली ती या ‘खुणे’ची साधीच उदाहरणं होती, पण अशा साध्या खुणांनीच तर सद्गुरू अंतरंगातले विचार ओळखतात, ही जाणीव होते. मग सद्गुरूंचा बोध अवधानपूर्वक ऐकू लागलो तर त्या बोधात आपल्याला काय लागू आहे, हेदेखील उमगू लागतं. एक गुरुबंधू भावनिक गुंत्यात अडकले होते. ते नातं पलीकडून उपेक्षित होतं, पण हेच ते टिकवण्याची धडपड करीत होते. त्या धडपडीमुळे दोन्ही बाजूंनी शाब्दिक खटके उडून अधिकच अवमान आणि दुरावा वाटय़ाला येत होता. एकदा सद्गुरू त्यांच्या शेजारच्या गावात आले होते. त्यामुळे हेदेखील त्यांच्यासह एक-दोन दिवसांसाठी मुक्कामाला राहिले होते. मनात मात्र त्या नात्याचेच विचार येत आणि अंत:करणात खळबळ असे. एकदा एका कामाचं निमित्त निघालं आणि हे बाहेर पडले. पाच-दहा मिनिटांत परतायला सद्गुरूंनी सांगितलं होतं. यांना बाहेर पडल्यावर राहवलं नाही आणि त्यांनी त्या व्यक्तीला दूरध्वनी केला. त्या बोलण्यातही खटका उडाला आणि मनस्ताप मात्र वाढला. मनातली खळबळ दडपण्याचा वरकरणी प्रयत्न करीत हे परतले तेव्हा गुरुजी दर्शनाला आलेल्यांशी बोलत होते. सांगत होते, ‘‘माझ्याजवळ एका प्रेमाशिवाय काय आहे? बाहेरच्या जगात तुम्हाला प्रेम मिळणार नाही. मिळायचं तर इथंच भरभरून मिळेल, पण तुम्ही मला सोडून बाहेरच्या जगात प्रेमासाठी वणवण भटकता आणि मी तुमची वाट पाहात बसतो!’’ हे शब्द ऐकताच त्या साधकाचं अंत:करण हेलावलं आणि डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. ज्या दुनियेला मी माझी मानून माझीच आणि माझ्या मनाजोगतीच राखण्यासाठी माझी सर्व शक्ती पणाला लावून धडपडतो ती कधीच कुणाचीही नसते! जो-तो आपापला आहे. आपल्यासाठीच जगत आहे. माणसं प्रेम करत नाहीत वा त्याग करीत नाहीत किंवा दुसऱ्यावर प्रेम करायला वा दुसऱ्यासाठी त्याग करायला माणसाला आवडत नाही, असा याचा अर्थ नव्हे. पण माणूस दुसऱ्यावर प्रेम करतो तेव्हा प्रत्यक्षात तो स्वत:वरच प्रेम करत असतो! तो दुसऱ्यासाठी त्याग करतो तेव्हा त्याला भावनिक भरपाईही हवी असते! जी व्यक्ती त्याला ‘आपली’ वाटते तिच्यावरच तो प्रेम करतो, तिच्यासाठीच त्याग करतो. जी आपल्या स्वार्थपूर्तीसाठी, वासनापूर्तीसाठी, इच्छापूर्तीसाठी, अपेक्षापूर्तीसाठी अनुकूल असते वा उपयुक्त असते तीच व्यक्ती आपल्याला ‘आपली’ वाटते ना? जी आपल्या इच्छेच्या, स्वार्थाच्या, वासनेच्या, अपेक्षांच्या आड येते त्या व्यक्तीबद्दल आपल्याला आपुलकी वाटते? तेव्हा या जगातल्या प्रेमाचा पायाच असा ‘मी’केंद्रित आहे आणि  हा ‘मी’ अशाश्वताच्या खोडय़ात आजन्म अडकल्याने हा ‘मी’केंद्रित पायाही ठिसूळ आहे. त्या ठिसूळ पायावर उभ्या राहात असलेल्या प्रेमातील संवेदना, त्याग, दया, अनुकंपा, करुणा या स्वार्थरहित अर्थात शुद्ध असतील का? तेव्हा या जगात आणि जगण्यात आपण नेमके कुठे अडकलो आहोत आणि हे अडकणं किती भ्रामक व घातक आहे, याची खूण सद्गुरूच देतात आणि ती ज्याची त्यालाच समजते!