श्रीसद्गुरू हे आधीच हृदयात स्थानापन्न असताना त्यांना तिथं वेगळं स्थानापन्न करायचं ते काय, अशी शंका साधकाला येते. आत्मा हा परमात्म्याचाच अंश आहे, आपलं मूळ स्वरूप आत्मस्वरूपच आहे, आपल्यातच ते आत्मतत्त्व आहे. त्या आत्म्याचा साक्षात्कार झाला की परमात्म्याचा साक्षात्कार झालाच, असंही आपण ऐकतो. मग मी जर परमात्म्याचा अंश असेन तर माझ्या जगण्यात दु:ख का, विसंगती का, भय का, अनिश्चितता का? मग मी परमात्म्याचा अंश आहे, हे तरी खरं का, अशीही शंका उत्पन्न होऊ शकते. श्रीसद्गुरू हृदयात स्थानापन्न असतातच, मग श्रीगोंदवलेकर महाराज हे, मला तुम्ही तुमच्या हृदयात यायला वाटच ठेवत नाही, असं का म्हणतात? याचा थोडा विचार करू. आपण गेल्याच भागात पाहिलं की शरीरशास्त्राच्या दृष्टीनं हृदयाला कोणतंही भावनिक स्थान नाही. हृदयाचं कार्य भावनिक नाही. अध्यात्मात मात्र हृदय ही जणू भावसाम्राज्याची राजधानी आहे! आपल्या हृदयात सद्गुरू आहेतच, हे खरं पण आपल्याला त्यांची जाणीव आहे का? ते तिथे असूनही ती जाणीव नाही आणि म्हणून आपण दुनियादारीमागे फरपटत जातो. आपण किती सहज म्हणतो की परमेश्वर व सद्गुरू हे सर्वज्ञ आहेत, सर्वत्र आहेत. श्रीगोंदवलेकर महाराज यावर म्हणाले की, मी तुम्हाला क्षणोक्षणी पाहातो, असं तुम्हाला खरंच वाटत असेल तर तुमच्याकडून पाप घडणारच नाही. आपल्याकडून चुका घडत नाहीत का? अहंकारानं आपण दुसऱ्याशी वागू नये तसं वागत नाही का? स्वार्थापायी दुसऱ्याला अकारण दुखावत नाही का? तेव्हा माझ्या हृदयात सद्गुरू आहेतच, हा भाव असेल तर माझं जगणं संकुचित राहूच शकणार नाही. ते संकुचित असेल तर माझं अंत:करण सद्गुरूभावानं नव्हे तर अहंभावानंच व्यापलं आहे, यात शंका नाही. तेव्हा सद्गुरूंना हृदयात स्थानापन्न करणं म्हणजे त्यांच्या तेथील स्थानाची जाणीव सतेज ठेवणं. जगणं त्यांच्या अनुसंधानात व्यतीत होणं. तर आता श्रीसद्गुरू हृदयात स्थानापन्न होणं (मज हृदयी सद्गुरू) या पहिल्या टप्प्याचा परत विचार करू. अभ्यासानं हा टप्पा साधण्याचा प्रयत्न करावाच लागतो. अभ्यास जसा आणि जितक्या तळमळीनं, सातत्यानं होईल तसतसे सद्गुरू माझ्या अंतरंगात कसे आहेत, हे जाणवू लागेल. आता अभ्यासाची गरज काय? ज्यांना खऱ्या सद्गुरूंच्या सहवासाची संधी लाभली आहे, त्यांनाही हा अनुभव असेल की सद्गुरूंच्या सहवासात असताना मन जणू एका वेगळ्याच, उच्च पातळीवर असतं. तो सहवास थोडा दुरावताच भौतिकाची जाणीव जागी होते आणि लगेच मनावर कब्जा घेऊ लागते. जे कळकळीनं  साधना करीत आहेत, त्यांनाही जाणवेल की, साधनेत मन ज्या उंचीवर असतं ते साधना आटोपताच, एकदम खाली घसरतं. साधनेत एखाद्या अवचित क्षणी मन अत्यंत अंतर्मुख होतं, एका वेगळ्याच प्रसन्नतेनं भरून जातं, शब्दांत सांगता येणार नाही अशा दिव्यत्वाच्या जाणिवेनंही व्यापून जातं. ती स्थिती टिकत मात्र नाही की मनात येईल तेव्हा त्या स्थितीचा अनुभव पुन्हा घेता येईलच, असा दावाही करता येत नाही!