माउली सांगतात, ‘‘म्हणोनि जाणतेनि गुरू भजिजे। तेणें कृतकार्य होइजे। जैसें मूळसिंचनें सहजे। शाखापल्लव संतोषती।।’’ (ज्ञानेश्वरी, अ. १/ ओवी २५). मनुष्य जन्म मिळणं ही मोठी प्राप्ती. त्या जन्माचं ध्येय ठरवता येणं, ही आणखी मोठी प्राप्ती. त्या ध्येयानुरूप जीवन जगता येणं, ही त्यापेक्षा मोठी गोष्ट. तसं पाहता प्रत्येकाचं जीवनध्येय सदासुखी होणं, हेच असतं. भौतिकाच्या सवयीमुळे आणि प्रभावामुळे आपण भौतिकालाच सुखाचा आधार मानून, तोच आधार मिळवणं, वाढवणं आणि टिकवणं, हेच आपलं ध्येय मानतो. भौतिक हे काळाच्याच पकडीत असल्याने भरतीमागे ओहोटी आणि ओहोटीमागे भरती, या क्रमानेच भौतिक स्थितीतही भरती-ओहोटी होतच असते. त्यामुळे भौतिकावर सर्वस्वी अवलंबून असणारी माझ्या मनाची स्थिरता सदोदित हिंदकळत असते. अशा वेळी साधू-संतांच्या जीवनाकडे पाहिलं तर उमगतं की त्यांच्या जीवनातही हा खेळ सुरू असतानाही त्यांचं मन स्थिरच राहिलं. मग भौतिकाच्या प्रभावापलीकडे जाण्यातच खरं सुख आहे का, हा प्रश्नही मनात उत्पन्न होतो. त्याचं उत्तर शोधण्याची तळमळ लागते. संत-सत्पुरुष सांगतात की, भगवंताचा आधार हाच परमसुखाचा खरा आधार आहे. त्या भगवंताचा साक्षात प्रत्यय म्हणजे सदोदित त्याच्याशीच ऐक्य साधलेला सद्गुरू. एकदा ही जाण आली की मग त्या सद्गुरूच्याच भजनात दंग व्हायला माउली सांगतात. सद्गुरूचं भजन म्हणजे काय हो? एकनाथी भागवतात म्हटलं आहे की, हा सारा भौतिक संसार ईश्वराचा आहे, या भावनेनं कर्तव्यापुरतं त्या संसारात राहून मन त्याच्याच चिंतनात राहणं, हेच खरं भजन आहे! असं भजन साधलं तरच जीव कृतार्थ होईल. ही विराट सृष्टी म्हणजे जणू विराट वृक्षच आहे. प्रत्येकाचं जीवनही त्या विराट वृक्षासारखंच आहे. वृक्षाच्या फांद्या जशा अनेक दिशांना पसरल्या असतात, तसा जीवनाचा प्रवाह अनेक दिशांनी वाहत आहे. वृक्षाला फळं, फुलं लागतात तसेच आनंदाचे, सुखाचे क्षण या जीवनात उमलतात. फळं, फुलं कोमेजावीत, पानं गळावीत, तसं याच सुखाच्या क्षणांच्या सरण्याचं दु:खंही याच जीवनात भोगावं लागतं. हा विराट वृक्ष दिसतो, पण तो ज्यायोगे साकारला ती त्याची मुळं मात्र दिसत नाहीत. ती जमिनीत घट्ट असतात. ही सृष्टी ज्यानं उत्पन्न केली तो मूळ परमात्माही असाच अदृश्य आहे. त्या मुळाला मी पाणी घातलं पाहिजे. पाणी म्हणजे आंतरिक भाव. पाणी जसं जिवाला जगवतं, तोषवतं, पोषवतं, त्याप्रमाणे हा आंतरिक भावच आंतरिक स्थितीचं पोषण करतो. जिवाला ‘स्व’स्थ करतो. जीव मात्र प्रत्येक पानाला पाणी देण्यासाठी धडपडावं, त्याप्रमाणे प्रत्येक नात्यागोत्यात हा आंतरिक भाव ओतून ती नाती आपल्या मनाजोगती राखण्याचा प्रयत्न करीत असतो. प्रत्येक परिस्थिती आपल्या मनासारखी व्हावी आणि राहावी यासाठी आंतरिक भावानिशी धडपडत राहतो. त्यापेक्षा मुळालाच पाणी घातलं तर? तेव्हा हृदयात भरती-ओहोटीयुक्त प्रपंचाला घट्ट धरण्याऐवजी सदा एकरसात निमग्न सद्गुरूलाच धारण केलं तर विवेकाच्या लाभानं जीवनवृक्षही कृतार्थपणे बहरेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swarup chintan actual worship
First published on: 21-02-2014 at 01:01 IST