खरोखर जगात माझे हित अगर अनहित करणारा जर कोणी असेल तर तो माझा मीच. ‘मी कर्ता’ ही भावना ठेवली की फळ भोगण्याची इच्छा राहते. मनुष्याला वाटत असते की, आपल्याला दु:ख होऊ नये, आजारपण येऊ नये, पण तरीसुद्धा आजारपण आणि दु:ख तो टाळू शकत नाही. म्हणजे ‘मी कर्ता’ ही जी आपली भावना असते ती निखालस खोटी ठरते. मालकी नसताना घराची मालकी गाजविण्याचा आपण प्रयत्न करतो याला काय करावे! तेव्हा प्रापंचिकांत आणि संतांत फरक हाच की, ते कर्तेपण रामाकडे देतात आणि आम्ही ते आपल्याकडे घेतो. ‘राम कर्ता’ म्हणावे की सुख, कल्याण सर्व काही आलेच. गोड खायला देऊ नका, असे डॉक्टरने बजावून सांगितले असताही रोग्याच्या इच्छेप्रमाणे गोड पदार्थ त्याला खायला घातला तर आपण त्याचे अनहितच करतो: तसे विषयाच्या लालचीने विषयाला बळी पडून आपले अनहित आपणच करून घेत असतो. आजारी माणसाला तीन गोष्टी कराव्या लागतात. एक, कुपथ्य टाळणे, दुसरी, पथ्य सांभाळणे; आणि तिसरी, औषध घेणे, तसेच भवरोग्यालाही तीन गोष्टी कराव्या लागतात. एक, दु:संगती, अनाचार, मिथ्याभाषण, द्वेष, मत्सर वगैरे अवगुणांचा त्याग करणे; दुसरी, सत्संगती, सद्ग्रंथसेवन, सद्विचार, सदाचार आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नामस्मरण करणे, हेच औषधसेवन होय. साधनात थोडी बळजबरी पाहिजेच. नियम थोडा असावा, पण तो प्राणापलीकडे सांभाळावा. नियम जास्त केला तर तो चुकविता कसा येईल याचा मार्ग मन शोधायला लागते. नाम घेणे हेच भगवंताकडे चालणे होय. साधनेत पुढे आलेले आपण मागे जात नाही ना, याकडे लक्ष पाहिजे. पुष्कळ लोक जोडधंदा करतात; म्हणजे, त्यांचा एक मुख्य धंदा असतो आणि त्याला मदत म्हणून दुसरा धंदा करतात. त्यांचे सर्व लक्ष मुख्य धंद्याकडे केंद्रित झालेले असते. म्हणजे, जोडधंद्यामुळे जर मुख्य धंद्यात व्यत्यय येऊ लागला तर तो जोडधंदा जरुरीप्रमाणे बंदही करतात किंवा नफा-नुकसानीचा प्रसंग आला तर जोडधंद्यातल्या नफा-नुकसानीकडे विशेष आस्थेने पाहात नाहीत. प्रत्येक माणसाने परमार्थ हा मुख्य धंदा ठेवून, प्रपंच हा जोडधंदा म्हणून करावा; म्हणजेच प्रपंचात होणाऱ्या लाभ-हानीचा परिणाम भगवंताच्या अनुसंधानावर होऊ देऊ नये. परमार्थाच्या आड प्रपंच न येईल अशा युक्तीने वागावे. भगवंताचा विसर हा कोणत्याही कारणाने झाला तरी तो बरा नाही; मग प्रपंचात सुखसोयी असल्यामुळे तो होवो किंवा प्रपंचात दु:ख झाल्यामुळे होवो. प्रत्येकाला प्रपंचाची अत्यंत जरुरी आहे; पण आपण त्याला वाजवीपेक्षा जास्त महत्त्व देतो आणि त्यामुळे सर्व बिघडते. नुसता प्रपंच तापदायक नाही तर आकुंचित प्रपंच हा तापदायक आहे. जो मनुष्य हौसेने प्रपंच करील, त्याला तो करायला चोवीस तासही पुरणार नाहीत; पण जो जरुरीपुरता प्रपंच करील, त्याला तीन-चार तास पुरतील. प्रपंचामध्ये कर्तव्याला चुकू नये, पण त्यामध्ये आसक्तीने गुंतून राहू नये. आपले व्यवहाराचे कर्तव्य मनापासून केल्यानंतर त्याचे फळ रामाकडे सोपवावे.