समाजजीवनातील उमटणारे तरंग अनेक लेखकांच्या लेखनात एक दस्तऐवज म्हणून नोंदवले जातात. ज्येष्ठ नागा लेखिका तेमसुला आओ यांचे लेखनही त्याच प्रकारचे आहे. डोंगराळ भाग आणि आदिवासींचे समाजजीवन ही तेमसुला यांच्या लेखनाची पाश्र्वभूमी आहे. लेखकाने केवळ लिहून थांबू नये, तर त्याचे समाजाशी जिवंत असे नाते प्रस्थापित झाले पाहिजे असे मानणारी ही लेखिका आहे. राजकीय अस्थिरता, धुमसता िहसाचार याचे प्रतििबब तेमसुला यांच्या लेखनात दिसून येते.  अशा या लेखिकेला या वर्षीचा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
तेमसुला आओ यांचा जन्म १९४५ साली जोरहाट (आसाम) येथे झाला. गुवाहाटी विद्यापीठातून त्यांनी इंग्रजी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मुख्यत: कविता आणि कथा या वाङ्मय प्रकारांत त्यांनी आपल्या लेखनाचा ठसा उमटवला आहे. कोलकाता येथे १९८८ साली त्यांचा ‘साँग्स दॅट टेल’ हा पहिला कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. त्यानंतर ‘साँग्स दॅट ट्राय टू से’, ‘साँग्स ऑफ मेनी मूड्स’, ‘साँग्स फ्रॉम हिअर अ‍ॅन्ड देअर’, ‘साँग्स फ्रॉम अदर लाइफ’ या कवितासंग्रहांतून कवयित्री म्हणून असलेले त्यांचे सामथ्र्य प्रकट होते. कथा, कविता या ललित वाङ्मय प्रकारांबरोबरच समीक्षेतही त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. ‘ऑन बीइंग अ नागा’ हा त्यांचा मानववंशशास्त्रीय संदर्भग्रंथ प्रसिद्ध आहे. दोन कथासंग्रहांच्या माध्यमातून त्यांनी नागालँडच्या समाजजीवनातील घटनाप्रसंगांना जिवंत केले आहे.  केंद्र शासनाने त्यांना २००७ साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले, तर २००९ साली साहित्यातल्या योगदानासाठी त्यांना राज्यपालांचे सुवर्णपदक मिळाले आहे. २०१३ या वर्षी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारही मिळाला आहे. एकाच वेळी साहित्याच्या माध्यमातून समाजजीवनाचे प्रत्ययकारी चित्रण करायचे आणि त्याच वेळी आदिवासींमध्ये कामही करायचे. या अर्थाने तेमसुला या कृतिशील लेखिका आहेत. नागालँडचे लोकजीवन त्यांच्यामुळे केवळ देशातच नव्हे, तर विदेशातही साहित्याच्या माध्यमातून पोहोचले आहे. कथा, कविता या वाङ्मय प्रकारांबरोबरच एक कादंबरी, आठवणींचा संग्रह आणि अनुभवांच्या लेखांचे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. कुसुमाग्रज पुरस्काराने यापूर्वी सुरजीत पातर, सितांशू यशचंद्र, जयंत कैकिनी, चंद्रकांत देवताले, डॉ. के. सच्चिदानंदन या लेखकांना गौरविण्यात आले असले तरीही तेमसुला यांच्या निमित्ताने प्रथमच एका लेखिकेचा सन्मान झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Temsula ao a poet short story writer and ethnographer
First published on: 16-03-2015 at 12:17 IST