वर्षअखेर आणि नववर्षांरंभ हा एकंदरच साहित्यजगतासाठी नव्या उभारीचा काळ असतो. नोबेल, बुकर, ज्ञानपीठ, साहित्य अकादमी अशा विविध पुरस्कारांपासून ते वर्षांतील चांगल्या, उत्तम आणि सर्वोत्तम म्हणवल्या जाणाऱ्या पुस्तकांच्या याद्या जाहीर होतात. त्यामुळे साहित्यजगत काहीसं झळाळून उठतं. नुकतीच ‘पब्लिशर्स वीकली’ या न्यूयॉर्कहून प्रकाशित होणाऱ्या प्रतिष्ठित साप्ताहिकाने २०१३ मधील दहा उत्तम पुस्तकांची यादी जाहीर केली आहे. पंचवीस हजारांहून अधिक खप असलेल्या या साप्ताहिकाला जागतिक ग्रंथजगतात महत्त्वाचे स्थान आहे. कारण ते अतिशय गंभीरपणे पुस्तकांची निवड करते. त्यासाठी गुणवत्ता हा एकच निकष लावला जातो.
तर या साप्ताहिकाने निवडलेली बेस्ट बुक्स अशी –
१) सी ऑफ हुक्स : लिंडसे हिल
१९५०-६० या दशकात घडणारी ही कादंबरी हिल या व्यवसायाने बँकर आणि वृत्तीने कवी असलेल्या लेखकाची पहिली कादंबरी. कादंबरीच्या रूढ चौकटीत न मावणारी ही कादंबरी एकाच वेळी सुखान्त आणि दु:खान्त या दोन्हींचा उत्कट अनुभव देते.
२) गोइंग क्लीअर-सायन्टोलॉजी, हॉलिवूड अँड द प्रिझन ऑफ बिलीफ : लॉरेन्स राइट
‘न्यूयॉर्कर’चे लेखक आणि पुलित्झर पारितोषिक विजेते राइट यांनी या पुस्तकात विसाव्या शतकातील धार्मिक चळवळींवरील विश्वास आणि वर्तन यांची कठोर चिकित्सा केली आहे. या पुस्तकाची पहिली आवृत्ती दीड लाख प्रतींची छापण्यात आली आहे.
३) डर्टी वॉर्स- द वर्ल्ड इज अ बॅटलफील्ड : जेरेमी स्कॅहिल
सर्व जग ही युद्धभूमीच आहे असं मानून वागणाऱ्या अमेरिकेची आणि एकंदर जगातील प्रत्येक देशाच्या सुरक्षेविषयीच्या प्रश्नाची खोलात जाऊन स्कॅहिल यांनी केलेली शोधपत्रकारिता युद्ध आणि दहशतवाद यांचा जाहीर पंचनामा करते.
४) मेन वुई रीप्ड-अ मेमॉयर : जेस्मिन वार्ड
कादंबरीकार वार्ड यांचं हे आत्मचरित्र त्यांच्या शोकात्म आयुष्याची प्रांजळकथा सांगतानाच त्यांच्या जवळच्या पाच व्यक्तींच्या मृत्यूची चटका लावणारी कहाणी सांगत प्रतिकूल परिस्थितीशी लढणाऱ्या वार्ड यांची दास्तान उलगडवत जातं.
५) द पीपल इन द ट्रीज : हान्या यानागिहारा
पॅसिफिक आयलंडवर अमरत्व देणाऱ्या वनस्पतीचा शोध घेणाऱ्या शास्त्रज्ञाविषयीची ही कादंबरी नैतिकता, सौंदर्य आणि कथनात्मकता या तिन्ही पातळ्यांवर जमून आली आहे.
६) लॉस्ट गर्ल्स- अ‍ॅन अनसॉल्व्ह्ड अमेरिकन मिस्ट्री : रॉबर्ट कोल्कर
२०१० साली अमेरिकेत अचानक गायब झालेल्या पाच महिलांची आणि त्यांच्या न लागलेल्या शोधाची ही थरारक सत्यकथा आहे.
७) मिस हॅनी इन हार्लम-द व्हाइट वुमन ऑफ द ब्लॅक रेनेसान्स : कार्ला काप्लान
न्यूयॉर्कमधील कार्यकर्ता, लेखक, संपादक असलेल्या सहा गौरवर्णीय महिलांनी १९२०-३० या दशकांत काळ्या मुलांशी लग्न केल्यानंतर त्या एकदम निग्रो झाल्या. त्यांची चरित्रं सांगत हे पुस्तक तत्कालीन सामाजिक इतिहास उलगडून सांगतं.
८) अ कॉन्स्टेलेशन ऑफ व्हायटल फेनॉमिना : अँथनी मार
१९९४ ते २००४ काळातली चेचेन्यातील एका डॉक्टरवरची ही कादंबरी. युद्धामुळे जनसामान्यांची कशी वाताहत होते, याचे भेदक चित्रण ही कादंबरी करते.
९) द सायलेन्स अँड द रोअर : नीहाद सीरीस
सीरियन लेखकाची ही कादंबरी स्वातंत्र्य, स्वतंत्र व्यक्तिमत्त्व, अखंडत्व आणि प्रेम यांचा मिलाफ आहे. या तत्त्वज्ञानात्मक आणि उपहासात्मक कादंबरीतून काफ्का आणि ऑर्वेल यांचे प्रतिध्वनी ऐकू येतात. एकविसाव्या शतकातली ही ‘१९८४’ आहे, असा तिचा गौरव केला गेला आहे.
१०) द गुड लॉर्ड बर्ड : जेम्स मॅकब्राइड
१९६०च्या दशकात एक गुलाम मुलगा आपण मुलगी असल्याचे भासवत जॉन ब्राऊनच्या म्युझिक बँडसोबत जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी भटकंती करतो, त्याविषयीची ही कादंबरी शेवटपर्यंत उत्कंठा टिकवत राहते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व बुक - वर्म बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The best ten books
First published on: 09-11-2013 at 12:06 IST