scorecardresearch

क्लान्सी का वाचायचा?

टॉम क्लान्सी यांचा चोख अभ्यास त्यांच्या कादंबऱ्यांना उंची मिळवून देतो. नौदलातले, राजनैतिक सेवांतले अधिकारी त्यांची पुस्तकं वाचायचे.

टॉम क्लान्सी यांचा चोख अभ्यास त्यांच्या कादंबऱ्यांना उंची मिळवून देतो. नौदलातले, राजनैतिक सेवांतले अधिकारी त्यांची पुस्तकं वाचायचे. आनंदासाठी आणि अभ्यासासाठीदेखील. म्हणजे खऱ्या अभ्यासकांना त्यांच्याच अभ्यासविषयातल्या अभ्यासासाठी एखाद्या कलाकृतीचा आधार घ्यावा लागावा हे किती कौतुकास्पद. उगाच प्रतिभा, कलात्मक स्वातंत्र्य वगैरे काहीही बुवाबाजी नाही. जे काही लिहायचे ते चोख आणि गोळीबंद. क्लान्सी यांच्या कादंबऱ्यांतील इतिहासही बरोबर असतो आणि कादंबरीही उत्तम असते. नाव झालंय म्हणून ठोकून देऊया.. असं नाही.
प्रतिभेच्या स्वप्निल उड्डाणांना वास्तवाचा किती आधार असायला हवा? मुळात तो असायला हवा की अजिबात नको? म्हणजे उदाहरणार्थ आपल्याकडे समजा एखाद्यानं एखाद्या थोर क्रिकेटपटूवर, त्याच्या फलंदाजीला केंद्रस्थानी ठेवून कादंबरी लिहिलीच आणि त्या फलंदाजाच्या कौशल्याचं वर्णन करताना लिहिलं की : त्यानं मारलेला स्क्वेअर ड्राइव्ह स्क्वेअर लेग अंपायरच्या बाजूने सूं सूं करत निघून गेला..
तर अशा कादंबरीकाराचं इतकं भव्य अज्ञान हे कलात्मक स्वातंत्र्य म्हणून सोडावं का?
आपल्याकडील भयाण परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर हा प्रश्न फार गंभीर आहे.
तो पडायचं कारण म्हणजे १ ऑक्टोबरला मरण पावलेले.. ज्याच्या कादंबऱ्यांची भलतीच भुरळ पडली होती.. लेखक टॉम क्लान्सी. ज्या वयात सर्वसाधारणपणे आंतरराष्ट्रीय राजकारण, सोविएत रशिया आणि अमेरिका यांच्यातला संघर्ष आणि तणाव, पश्चिम आशियाच्या वाळवंटातलं तेलकारण.. असे विषय आवडायला लागतात त्या काळात टॉम यांच्या कादंबऱ्या हाती आल्या. त्या अतिशय आवडायच्या. म्हणजे आवडतात अजून. टॉम आणि फ्रेडरिक फोर्सिथ हे विद्यमान काळातले, प्रचलित विषयांवर लिहिणारे नादावून टाकणारे लेखक. या दोघांपैकी क्लान्सी आधी भेटले. फोर्सिथ त्या मानानं उशिरा. असो. टॉम यांच्या कादंबरीचं कथानक बांधून ठेवणारं असतं.. वगैरे म्हणणं ठीकच. तो तर किमान निकष. पण आपण थक्क होतो ते त्यांच्या कादंबऱ्यातल्या तपशिलानं. त्या तपशिलातल्या अभ्यासानं. म्हणजे कादंबरीच्या कथेचा कंद एकदा मनात रुजला की त्याच्याभोवती टॉम असं काही अभ्यासाचं आळं तयार करतात की कादंबरीचं बीज वाढतंच वाढतं. आणि महत्त्वाचा गुण या माणसाचा हा की त्याची लिहिण्यापूर्वी अभ्यास करण्याची सवय शेवटपर्यंत सुटली नाही. कथा उत्तम आहे म्हणून अभ्यासाची गरज नाही असं तिकडच्या अनेक लेखकांना वाटत नाही. टॉम त्यातलेच एक. त्यामुळे अशांनी ऐतिहासिक कादंबरी समजा लिहिली तर तीत इतिहासही बरोबर असतो आणि कादंबरीही उत्तम असते. नाव झालंय म्हणून ठोकून देऊया.. असं नाही.
टॉमची पहिली कादंबरी हाती आली ती ‘द कार्डिनल ऑफ द क्रेमलिन’ नावाची. वाचायलाही घेतली होती. तर टॉमचा कडवा चाहता असलेला एक मित्र म्हणाला, हा दुसरा भाग आहे. पहिला आधी वाच. मग तसं केलं. ‘द हंट फॉर रेड ऑक्टोबर’ हे पहिल्या भागाचं नाव. रेड ऑक्टोबर या नावाची अख्खीच्या अख्खी अणुभट्टी असलेली रशियन पाणबुडी पळवून उद्ध्वस्त करण्याचा घाट अमेरिकी गुप्तचर यंत्रणा. सीआयए घालते. कारण ही पाणबुडी बुडवली नाही तर अमेरिकी आखातातून कोणत्याही अमेरिकी शहरावर अण्वस्त्र हल्ला करण्याची क्षमता रशियन नौदलाला मिळाली असती. त्यामुळे सीआयए या नौकेच्या कप्तानालाच फितवते. तो कप्तान आपल्या मायदेशावर.. म्हणजे सोविएत युनियनवर.. रागावलेला असतो. कारण योग्य त्या उपचारांच्या अभावी त्याच्या बायकोला मरण आलेलं असतं. तिला उपचार मिळाले नाहीत कारण सोविएत सरकारची धोरणं, असा त्याचा ठाम समज असतो. त्यामुळे त्याला देशत्याग करायचा असतो. या जहाजासकट अमेरिकेला फितूर होण्याच्या प्रयत्नाला तो लागतो. नंतर पुढे जे काही घडतं ते म्हणजे ही कादंबरी.
खरं तर इतक्या कथाबीजावर लेखक पुढे काहीही ठोकत गेला असता तरी त्या वातावरणात ते फिट्ट बसलं असतं. पण क्लान्सी यांनी तसं केलं नाही. त्यांनी पाणबुडी म्हणजे काय याचा प्रचंड म्हणता येईल इतका अभ्यास केला. मग साधी पाणबुडी आणि आण्विक पाणबुडी यांच्यात फरक कसा असतो, त्याचे अत्यंत बारीक तपशील.. असं सगळं ते कथानकात गुंफत गेले. बऱ्याचदा इतका तपशील आला की तांत्रिकता आनंदाला बाधा आणते. पण टॉम क्लान्सी याचं असं अजिबात होत नाही. किंबहुना हा इतका तांत्रिक तपशील आहे हे आपल्याला वाचून झाल्यावर मनातल्या मनात विश्लेषणाला लागतो तेव्हा कळतं इतका सहज तो मूळ कथानकात मिसळून जातो. टॉम क्लान्सी यांचं हे खास मोठेपण.
ते त्यांनाही माहीत असावं. कारण त्यांनी आपलं हे कादंबरीचं हस्तलिखित पाठवलं ते नौदलाच्या प्रकाशन विभागालाच. म्हणजे काय विश्वास असेल त्यांना आपल्या लिखाणाचा. मुळात युद्धनौकेवर लिहायचं आणि ते प्रकाशनासाठी नौदलालाच सांगायचं. नौदलाच्या प्रकाशन विभागाच्या संपादिका होत्या, त्यांना या लेखकाची ताकद लक्षात आली. त्यांनी त्यामुळे ते आपल्या शिफारशींसह प्रकाशनाच्या वाटेला लावलं. टॉमना वाटत होतं आपल्या पुस्तकाच्या किमान पाच हजार प्रती तरी खपतील. पण त्यांचा भ्रमनिरास झाला. तब्बल ४५ हजार प्रती खपल्या. त्या वेळी अमेरिकेचे अध्यक्ष होते रोनाल्ड रेगन. त्यांनी ते वाचलं आणि जी तोंड फाटून स्तुती केली पुस्तकाची की बास.. पुस्तकाच्या प्रतींचा खपाचा आकडा झाला तीन लाख आणि पेपरबॅक आवृत्ती २० लाख. (महासत्तेचा अध्यक्ष कादंबरी वाचतो, हे किती छान. मला प. बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांची भेट आठवली. ते मुंबईत होते. कम्युनिस्ट होते तरी एका पंचतारांकित हॉटेलात उतरले होते. भेट संध्याकाळची. गेलो तर ज्योतीबाबू सुस्नात होऊन, स्वच्छ धोतर-झब्ब्यात खुर्चीत वाचत बसलेले. उजव्या हाताशी सुवर्णरंगी द्रवाचा ग्लास आणि डाव्या हातात पुस्तक. वाटलं दास कपिताल वगैरे असणार. पण धक्का बसला. ते होतं फ्रेडरिक फोर्सिथ याचं ‘द फिस्ट ऑफ गॉड’. हार्डबाउंड. असो.)
हे टॉम क्लान्सी यांचं पहिलं पुस्तक. हे वाचून कोणाला वाटेल क्लान्सी यांचा नौदल वगैरेंशी काही संबंध असेल. तर काही नाही. क्लान्सी विमाविक्रेते होते. पण नंतर अमेरिकेतले बेस्ट सेलर लेखक बनले ते. याच पुस्तकातली जॅक रायन ही अमेरिकी गुप्तहेराची व्यक्तिरेखा खूपच लोकप्रिय झाली. याच पुस्तकावर पुढे सिनेमाही आला. हॅरिसन फोर्ड, बेन अफ्लेक वगैरेंनी त्यात काम केलं होतं.
याच कादंबरीचा दुसरा भाग म्हणजे ‘द कार्डिनल ऑफ द क्रेमलिन’. सीआयएसाठी सोविएत रशियातून हेरगिरी करणारा एक उच्चपदस्थ हेर असतो. त्याचं टोपण नाव कार्डिनल. कथानायक जॅक रायन काही कामानिमित्तानं सोविएत रशियात जातो तेव्हा त्याला हा कार्डिनल कोण याचा पत्ता लागतो. रशियाच्या संरक्षणमंत्र्यांचा खासगी सचिवच तो. अमेरिकेसाठी हेरगिरी करत असतो. तिथून पुढे कादंबरी सोविएत रशियाची अफगाणिस्तानातली घुसखोरी, ती रोखण्यासाठी अमेरिकेनं मुजाहिदीनांना पोसणं वगैरेत शिरते आणि अफगाणिस्तानातली बित्तंबातमी देत अमेरिकेत येते.
इथेही तेच. चोख अभ्यास. टॉम क्लान्सी यांचा अभ्यास इतका दांडगा होता की नौदलातले, राजनैतिक सेवांतले अधिकारी त्यांची पुस्तकं वाचायचे. आनंदासाठी आणि अभ्यासासाठीदेखील.
म्हणजे खऱ्या अभ्यासकांना त्यांच्याच अभ्यासविषयातल्या अभ्यासासाठी एखाद्या कलाकृतीचा आधार घ्यावा लागावा हे किती कौतुकास्पद. उगाच प्रतिभा, कलात्मक स्वातंत्र्य वगैरे काहीही बुवाबाजी नाही. एरवी ऐतिहासिक कादंबरी लिहिणारे त्यांच्या कलाकृतीत इतिहासकारांनी दोष दाखवला की म्हणतात ती कादंबरी आहे आणि कादंबरी म्हणून कोणी मूल्यमापन करायला गेलं की म्हणतात तो इतिहास आहे. ही विश्वास पाटीलकी किंवा आनंद यादवी खपून जाते आपल्याकडे. पेपरवाल्यांना हाताशी धरल्याने नावबिवदेखील होतं.
पण उंची वाढत नाही. ते कळतही नाही.
टॉम क्लान्सी वाचला की ती उणीव दूर होते.
द कार्डिनल ऑफ द क्रेमलिन : टॉम क्लान्सी,
प्रकाशक : जी पी पुतनम,
पाने : ५४३, किंमत : ३९९ रुपये.
द हंट फॉर रेड ऑक्टोबर : टॉम क्लान्सी,
प्रकाशक : नेव्हल इन्स्टिटय़ूट प्रेस,
पाने : ४३९, किंमत : ६९९ रुपये.

मराठीतील सर्व बुक-अप! ( Bookup ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tom clancy apt practice make his novel impactful

ताज्या बातम्या