या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंत्री, दारूबंदी खाते यांस,

थरथरत्या हातांनी नमस्कार,

प्रत्येक गोष्टीच्या वेळा ठरलेल्या असतात. सर्वसाधारणपणे ‘औषधा’ची  वेळ चुकवतो का कोणी? आमची वेळ टळली की हात थरथरतो, मन सैरभर होतं. तरीही घरात बसण्याचे आवाहन कमालीचे गंभीर असल्याने हे निवेदन करण्याची वेळ ओढवली आहे,अन्यथा एवढा संयम तसा कधी बाळगत नाही. कासावीस झाल्याने अगदी त्या दुकानावरून एकदा मोटारसायकल घेऊन चक्कर मारून आलो, पण पोलीस पुढे जाऊ देईनात. सारी दुकाने बंद, दुपारच्या उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. थंड वारुणी म्हणजे बिअर घशाखाली गेली तर लगेच करोना धरतो? पण नाहक त्रास करून घेता तुम्ही सारे जण. टाळेबंदीमध्ये देशी-विदेशी दारूची वाहतूक करताना पकडले म्हणून गुन्हा दाखल करून सोडून द्यायला हवे. हात धुण्यासाठी आपण सॅनिटायझर वापरतो. त्यात नक्की काय असते? अल्कोहोल, ग्लिसरीन आणि शुद्ध पाणी (एखाददुसरा घटक विसरला असेल लिहिता-लिहिता) पण मथितार्थ समजून घ्या. नशा आली पाहिजे समाजाला. मग ती टीव्हीवरच्या जुन्या सीरियलची असेल किंवा एकत्र येऊन साजरे करण्याच्या  कोणत्याही इव्हेंटची असेल; मग मृत्यू तांडव घालत असताना दिवाळी का असेना..  झिंग हवीच!  तेव्हा महाराष्ट्रापुढचा प्रश्न जसा करोना विषाणू आहे तसाच पुढचा रोग हा हाताला थरथर सुटणारा असू शकेल. तेव्हा कोणतीही ‘औषधा’ची गाडी पकडू नका. नाहक बदनाम केलं आहे आमच्या जमातीला. तळीराम, दारुडा, पिदाडा असं काय वाट्टेल ते म्हणतात. रोज पिणारे वेगळे. अधूनमधून जाणारे वेगळे. थोडी घेऊन मजा बघणारे वेगळे. पण गेले ते दिवस. बातम्या पाहून मन कमालीचं भयग्रस्त झालं आहे. मनात प्रश्न येतो- का पकडताहेत एवढय़ा ‘देशी-विदेशी’ गाडय़ा? केरळ सरकारने जशी परवानगी दिली तशी तुम्हीही द्या. तेथे अगदी सोशल डिस्टन्सिंग नक्की पाळू. भाजीबाजारासारखी कोणी गर्दी करणार नाही. सुरापान, अपेयपान, ‘बसणे’ हे शब्द नाहीसे होतील, या भीतीपोटी म्हणतोय. माणसाला नशा लागते, ती अशी रोखू नका. रामायण, महाभारताने वेड लावले जाते, अशी धारणा असू द्या सरकारची. पण भराभर गाडय़ा पकडून मद्य निर्मिती-विक्री रोखणे म्हणजे अर्थकारणाला तडा. अहो जे सॅनिटायझर करोनाचा प्रसार रोखते त्याचा मूळस्रोत असणारे  द्रव्य पकडू नये, ही विनंती करण्यासाठी हे पत्र!

सकाळपासून, ‘रिपोर्ट पॉझिटिव्ह आला’, हे शब्द वृत्तवाहिन्यांवर ऐकून जीव शिणला आहे. अनेकांना वेगळं ठेवलं जात आहे. अशा काळात दारू पकडू नका. किमान फळकुटामागून किंवा मागच्या दाराने मिळणारी सोय म्हणून त्याकडे पाहण्याची विनंती करण्यासाठी हे निवेदन करतो आहे- टाळेबंदी जरूर करा. आपल्याला करोनाला हरवायचे आहे. पण थरथरत्या हातांची शपथ आहे. साहेब काही तरी करा. आम्हाला नशेत जगायची सवय आहे. धर्माभिमानाची नशा असते की नाही माहीत नाही, पण अशा अनेक प्रकारच्या नशा आहेत. मग आमच्याच नशेला बंदी का? असो. निवेदनामध्ये  चकणा अधिक असे नको व्हायला त्यामुळे थांबतो.

आपला,तळीराम

मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on alcohol ban in lock down abn
First published on: 07-04-2020 at 00:00 IST