पिंपळवंडी हे ‘पर्यटन तालुका’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुन्नर तालुक्यातील एक गाव, मुंबईच्या शिवाजी पार्क परिसरापासून सुमारे १६० किलोमीटरवर वसले आहे. याच गावातील एक तरुण आमदार होतो, विधानसभेत जातो, विधानसभेची अधिवेशनेच हल्ली तीन-चार दिवसांत गुंडाळली जात असल्याने गावी परततो आणि शिवाजी पार्कपासूनचे अंतर वाढू लागल्याची जाणीव त्याला होऊ लागते.. त्यातच, शिवाजी पार्कपेक्षा वांद्रय़ाचे कलानगर अंमळ नजीकच आहे, हेही त्याला उमगू लागते!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वरील कथानकाशी कोणत्याही जिवंत व्यक्तीचा संबंध असल्यास तो निव्वळ योगायोग मानावा, असे म्हणण्याची सोय आता उरलेली नाही.

जुन्नरचे आमदार, तालुक्यातील गावोगावी ‘आपला माणूस’ अशी ओळख असणारे शरददादा सोनावणे यांनी खरोखरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून शिवसेनेत प्रवेश केला आहे आणि तरीही त्यांचे आमदारपद कायम राहणार आहे. मनसे या पक्षातील १०० टक्के आमदारांनी आता शिवसेनेत प्रवेश केला आहे. टक्केवारीची कितीही सवय असली तरी १०० टक्के हा आकडा शिवसेनेसाठीदेखील नवलाईचाच आहे.

शरद सोनावणे हे मूळचे शिवसेनेचेच, त्यामुळे ही घरवापसीदेखील आहे. सर्वासाठी ‘आपला माणूस’ अशीच प्रतिमा राखणारे शरद सोनावणे यांना मनसे काय आणि शिवसेना काय, सरकारवर टीका दोन्ही पक्षांतून करता येतेच आणि कामेही दोन्ही पक्षांत राहून करवून घेता येतात. सरकारी कामांत व्यत्यय आणण्यासारखे छोटेमोठे गुन्हे दाखल होण्याची शक्यता मनसेत अधिक आणि शिवसेनेत कमी, एवढाच काय तो फरक.. बाकी, आमदार सोनावणे यांच्यासाठी दोन्ही पक्ष सारखेच.

फरक पडू शकतो, तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला. या पक्षाचे आमदार एके काळी दहाहून अधिक होते ते आधी एक आणि आता शून्यावर आले, नाशिक हातचे गेले, साऱ्याच इंजिनांचे विद्युतीकरण झाले, अशा वेळी या पक्षाकडे काय उरले आहे, असा प्रश्न बाकी कुणाला नाही पडला, तरी राजकीय विश्लेषकांना वगैरे नक्कीच पडेल..

हा प्रश्न विश्लेषकांनाच का पडावा आणि सामान्य मराठीजनांना का पडू नये, याची कारणे आहेत.

मनसेचे संस्थापक- सर्वेसर्वा राज ठाकरे यांचे भाषण सुरू झाल्यावर जे कोणी हे भाषण ऐकत राहतात, ते सामान्य मराठीजन. बाकी सारे एक तर विश्लेषक किंवा निव्वळ ढोंगी (हे दोन निरनिराळय़ा अर्थाचे शब्द आहेत). राज यांच्या अमोघ वक्तृत्वाची, भाषणांतल्या नाटय़मय विरामांची मोहिनी अशी की दिल्लीपासून गल्लीपर्यंत साऱ्यांकडून ऐकलेली वाक्ये राज ठाकरे यांच्याकडून ऐकल्यावर मात्र मनामनांत ठसतात. काही वाक्ये झोंबणारी असतील, तीही अन्य कुणी आधी उच्चारली असतील, तरी अन्य कुणाही नेत्यापेक्षा राज यांच्या मुखातून बाहेर पडताक्षणी त्याच शब्दांची धार कैक पटींनी वाढते, चरचर कापत जाते. तेव्हा मनसेकडे काय उरले, पक्ष कसा हवा होता, याची चर्चा नको.

अगदी एकच व्यक्ती असेल, तरीही पक्ष चालू शकतो, असा आपल्या देशाचा इतिहास आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी तर असे एक नव्हे, दोन पक्ष स्थापले, हाही इतिहास आहे.

इथे राज तर, महाराष्ट्राचे स्वामीच!

मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on mns mla sharad sonavane joins shivsena
First published on: 12-03-2019 at 00:40 IST