या अशा बातम्या वाचून खूप अस्वस्थ व्हायला होतं. विशेषत जो उठतो तो बिर्याणीचा संदर्भ देतो, तेव्हा! आपले राजकारणी खरोखरच तिकडं दिल्ली परिसरात बिर्याणी वाटत असतील का, या विचारानं मन खंतावतं. हा इतक्या सहजी उपलब्ध होणारा पदार्थ आहे यावर विश्वास बसत नाही. बिर्याणीच्या कहाण्या वाचल्या, ऐकल्या की आमच्याकडील बिर्याणीचे अयशस्वी प्रयोग आठवतात. हॉटेलात जाऊन बिर्याणी खाऊ म्हटलं, तेव्हा मित्रमंडळींनी किमतीकडे बोट दाखवलं नि इतका महागडा पदार्थ मागवायचा असल्यास अतिरिक्त ‘भार’ उचलण्याची तयारी दाखवावी, असंही एकाकडून उद्दामपणे सुचवण्यात आलं. बिर्याणीची महती तोवर न कळालेला अभागी समूह होता तो. तेथील खानसाम्यानं प्रेम ओतून केलेली ती बिर्याणी. ढीगभर खाल्ली तरी ढीगभर उरली.  ‘क्या करेंगे, बस हो गया. ले जाव इसे’ असं आमच्यातल्या एकानं सांगताच आतून खानसामाच बाहेर आला. ‘ये प्यार है. इसे फेकते नहीं. घर पे खिलाइये सबको’ असं सुनावून गेला. ते पार्सल ‘भार’ उचलण्याविषयी हृद्य सूचना करणाऱ्यानंच पटकन पहिल्यांदा उचललं! अजूनही त्या आठवणीनं मन कालवतं. बिर्याणीचा रम्य गंध आणि चव स्मरून एकदा ती बनवण्याविषयी घरात आडूनआडूनच विषय काढला, त्या वेळी मिळालेला प्रतिसाद अतिशय नकारात्मक आणि हताशकारी म्हणावा असाच. हैदराबादेत म्हणे पॅराडाइज नामक दुकानात अस्सल बिर्याणी मिळते. विमान आणि रेल्वे प्रवाशांनाही पार्सल बांधून दिलं जातं. आता निव्वळ जायचं तरी खर्च आलाच. ही सगळी दुखद पाश्र्वभूमी असल्यामुळे दिल्लीत जाऊन जो तो बिर्याणी खिलवण्याविषयी घोषणाबाजी करतो, तेव्हा आतडं तीळतीळ तुटतं. शाहीन बागेत बिर्याणी वाटली जातेयसे म्हणतात. खरं असेल तर दशकातून एकदाच येणारी पर्वणी ती! मागे नव्वदच्या दशकात काश्मिरात हजरत बल आणि त्यानंतरच्या आपल्याकडे आर्थर रोड जेलविषयीदेखील असंच छापून आलं होतं. बिर्याणीविषयी पुन्हा त्या वेळीही चलबिचल झाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरं तर बिर्याणी बनवायला प्रचंड वेळखाऊ, महागडी आणि राजेशाही बाजामुळे पचायलाही जड. ते सर्वसामान्यांचं पोषण नव्हेच. म्हणूनच आम्हाला इतकी आवडते या विचारानं आम्हीच आमच्यावर प्रचंड खूश होत असतो. असो. तरीही हे लोक वारंवार बिर्याणीचा जप का करत असतात? बिर्याणीच हवी अशी मागणी शाहीन बागेतून झाल्याचं आमच्या तरी वाचनात आलेलं नाही. केजरीवाल आणि त्यांचे समर्थक ज्या वचनपूर्तीचा उल्लेख करतात त्यात पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य सगळं सगळं आहे पण बिर्याणी नाही. मागे एकदा एका हॉटेलात बिर्याणी मागवली, तेव्हा काही रंगीत भातशितं वरवरच पखरलेला, एकमजली प्रकार समोर आला. ‘ये क्या?’ असं विचारल्यावर  ‘चावल, पिलाव, बिर्यानी, खिचरी. कुछ भी समझो’ असं बेमुर्वत उत्तर मिळालं. तेव्हा शाहीन बागेत किंवा अरिवद केजरीवालांना पाठवायची बिर्याणी बहुधा ‘कुछ भी समझो’ प्रकारातली असावी. कारण बिर्याणी-बिर्याणी बोलणाऱ्यांपैकी कुणी अस्सल बिर्याणी खाल्ली असण्याची शक्यता कमीच. अस्सल बिर्याणी क्वचितच खाल्ली जाते. ती शाहीन बाग किंवा केजरीवालांकडेच नाही तर देशभर आस्वादली जाते. आणि तिच्यात प्रेम भरलेलं असतं. तिची खिल्ली उडवणाऱ्यांना तिची चवही कळालेली नसते.. आणि प्रेमही! तेव्हा शाहीन बागवाल्यांनी काही बिर्याणीसाठी ठिय्या दिलेला नाही. जे हवंय ते देऊन टाका अन् मिटवून टाका म्हणावं!

मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article ultha chasma akp
First published on: 04-02-2020 at 00:08 IST