‘आप’आपले

‘आप’ने असे सर्वधर्मसमभावाचं पॅकेज जाहीर केल्यावर त्यांच्या गोव्यामधल्या कार्यालयात गर्दीच उसळली.

समुद्रकिनारी सुशेगात जगणाऱ्या गोव्यातल्या लोकांबद्दल अरविंद केजरीवालांचा भलताच गैरसमज झालेला दिसतो आहे. तिथले सगळेच लोक अतिशय धार्मिक आणि फुकटची यात्रा करायला उत्सुक आहेत असेच त्यांना बहुतेक वाटते आहे. दिल्ली विधानसभा दोनदा जिंकणाऱ्या केजरीवालांनी त्यामुळेच गोव्याच्या लोकांना बघा काय आश्वासन दिलेय… म्हणे आम्हाला गोव्याची सत्ता मिळाली, आम्ही सरकार बनवले तर आम्ही तुमच्यासाठी फुकट धार्मिक यात्रा घडवून आणू. त्यासाठीच्या सर्वधर्मसमभावाचेपण त्यांनी पॅकेजच केलेय. हिंदूंसाठी अयोध्या, ख्रिश्चनांसाठी वेलंकनी, मुस्लिमांसाठी अजमेर आणि साईभक्तांसाठी शिर्डी. मग एखाद्या शीख बांधवाचे काय? आणि देव – धर्म न मानणाऱ्या मतदारांचे काय? ‘आप’ त्यांना तर आपले म्हणायलाच तयार नाही असे दिसतेय. त्याशिवाय म्हसोबा, वेतोबा अशा यात्रा करणारे लोकपण असतात, त्यांनी काय करायचे? आणि एखाद्या हिंदू माणसाला अजमेर शरीफला जायचे असेल तर त्याला ‘आप’वाले नेणार की नाही?

    पण ‘आप’ने असे सर्वधर्मसमभावाचं पॅकेज जाहीर केल्यावर त्यांच्या गोव्यामधल्या कार्यालयात गर्दीच उसळली. ‘माताने बुलाया है’ असे गाणे म्हणत काही लोक आत आले. ‘संख्येने कमी असलो तरी आम्ही वैष्णवदेवीचे भक्त आहोत. तुमच्या यादीत हे ठिकाणच नाही. आमच्याविषयी काय ठरवले ते सांगा. अल्पसंख्यांना तुम्ही विसरताच कसे?’ हे ऐकून काय बोलावे हे पदाधिकाऱ्यांना कळेचना. एकजण हळूच म्हणाला, ‘अहो पण अयोध्या…’ त्याला मध्येच थांबवत ते म्हणाले, ‘तिथे आम्ही स्वखर्चाने जाऊ. तुमच्या योजनेचे काय ते बोला’ हे ऐकून आता काय करावे या विवंचनेत सारे पडले. तोवर दुसऱ्या कक्षात प्रचाराची आखणी करणारे कार्यकर्तेसुद्धा काम सोडून तिथे जमले. कशीबशी समजूत काढून त्यांना परत पाठवले. थोडी उसंत मिळत नाही तोच दोनशे लोकांचा जमाव कार्यालयात शिरला. ‘आम्ही नेमाने अष्टविनायक दर्शन करणारे. तुम्ही शिर्डीचे नाव घेतले पण या दर्शनाचे काय? यावर ताबडतोब खुलासा व्हायलाच हवा. अन्यथा गावखेड्यात तुमचे फिरणे मुश्कील होईल. मते तर नंतरची गोष्ट आहे.’ हे ऐकताच काही पदाधिकाऱ्यांच्या मनात संशय यायला लागला. हे नक्कीच विरोधकाचे कारस्थान पण तोंडावर कसे बोलणार? शेवटी शिर्डीसोबतच हे दर्शनही घडवू असे सांगून त्यांना परत पाठवले. दहा मिनिटे होत नाही तोच आणखी एक समूह आता आला. ‘‘तुम्ही अजमेरचेच नाव कसे घेतले? हाजीअली, हजरत निजामुद्दीन, गोलगुंबजला मानणारे शेकडो लोक इथे गुण्यागोविंदाने राहतात. त्यांच्याविषयी काय ठरवले?’ प्रश्न ऐकून काहींना घाम फुटला. अखेर अजमेरला जाताना या स्थळांनासुद्धा भेट देण्याची व्यवस्था करू असे आश्वासन दिल्यावर ते गेले. तेवढ्यात महिलांचा एक गट आला. ‘तुमच्या योजनेत एकही देवी नाही. आम्ही तुळजाभवानी, अंबाबाईवर श्रद्धा ठेवणाऱ्या. आमचे काय?’ एक कार्यकर्ता त्वरेने म्हणाला, ‘काही काळजी करू नका. कोल्हापूर जवळच आहे. तुमची व्यवस्था करू.’ त्यावर महिला उसळल्याच. ‘अहो, मोफतची यात्रा इतक्या जवळची? आम्हाला तुळजापूरलाच जायचेय.’ ‘हो’ असे वदवूनच त्या तिथून बाहेर पडल्या. हे काय नवीनच झेंगट मागे लागले असे म्हणत एकाने कार्यालयाचे शटरच खाली खेचले. मोफत तीर्थयात्रेमुळे राज्याची तिजोरी रिती होणार असे तिथे असलेल्या काहींना वाटू लागले तर नव्या दमाचा पक्ष म्हणून उत्साहाने प्रचारात सामील झालेल्या काहींना आपण टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात तर काम करत नाही ना, असा भास होऊ लागला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Beach sushega arvind kejriwal religious and free travel akp

Next Story
निरोपाला ‘कर’कर!
ताज्या बातम्या