आमचे मन वेदनेने, दुखाने, शोकाने भरून गेले आहे. काळजात संताप संताप दाटून आला आहे. येणारच ना? अखेर एका अख्ख्याच्या अख्ख्या कंपनीची हत्या केली आहे या लिबरलांनी आणि त्यांच्या भोंदू माध्यमांनी. होय, हत्याच! आज केंब्रिज अ‍ॅनालिटिकासारखी एक उदयोन्मुख कंपनी दिवाळखोरीत काढण्यात येत आहे ती याच षड्यंत्रकारी माध्यमांमुळे. त्यांच्याच बकवास बातम्यांमुळे आज ब्रिटनमधील एका प्रगतशील कंपनीतील कामगारांना रस्त्यावर यावे लागणार आहे. त्यांचे संगणकसुद्धा जमा करण्यास कंपनीच्या व्यवस्थापनाने सांगितले आहे. बिनासंगणकाचे हे कर्मचारी जाणार तरी कुठे?  कुठून गोळा करणार ते डेटा?  कुठून माहिती पुरवणार राजकीय पक्षांना  व कंपन्यांना? संगणक काढून घेणे म्हणजे हातच तोडल्यासारखे झाले. हा गुन्हा नाही का? परंतु आज आम्ही फेसबुकवर जाऊन लिहिले, की मुख्य प्रवाहातील या वृत्तवारांगनांनी केंब्रिज अ‍ॅनालिटिकासारख्या एका निष्पाप कंपनीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा केला आहे, तर लगेच आम्हास ट्रम्पभक्त म्हणून हिणवले जाईल. परंतु आज आम्ही येथे वर तोंड करून खुशाल जाहीर करतो, की डोनाल्डत्व हेच राष्ट्रीयत्व असे मानण्याला भक्ती म्हणत असतील, तर आहोतच आम्ही ट्रम्पभक्त! नसू आम्ही अमेरिकेत. आमच्या मनातील हरितकार्डाची हाव नसेल अद्याप पुरी झाली, पण म्हणून काय झाले? आजही आम्ही डोनाल्डजींच्या तसबिरीला केक भरवू शकतो. जो मनुष्य जगाच्या कल्याणासाठी दिवसरात्र प्रचंड प्रचंड झटतो आहे; वेळ नाही काळ नाही, कधीही रात्रीअपरात्री ट्वीटवरून विचारमंथन करतो आहे, ते जगाचे प्रधानसेवक डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयात खारीचा मोठा मोठा वाटा उचलणारी ही कंपनी आज बंद होत असताना आम्ही ते उघडय़ा डोळ्यांनी कसे पाहात बसू? अखेर काय चूक होती या कंपनीची? फेसबुकवर आपण जी माहिती स्वतहून जाहीर करतो, तीच माहिती त्यांनी मिळवली ना? ती माहिती मिळवून आपल्या व्यक्तिमत्त्वाचे विश्लेषण केले त्यांनी. त्यावरून प्रत्येक व्यक्तीला कोणत्या प्रकारच्या प्रचारी जाहिराती पाठवायच्या हे ठरविले त्यांनी. हे काय पाप झाले? खरे तर ती अमेरिकेतील जनता आहे. अत्यंत सुखी, समाधानी, बुद्धिमानी. तिला कोण कसे फसवू शकेल? पण या व्यक्तिस्वातंत्र्य आणि खासगीपणा वगैरे भंपक गोष्टी करणाऱ्या अतिशहाण्या पत्रकारांनी त्यावरून बोंबाबोंब केली. बदनामी केली त्या कंपनीची. आज तिच्यावर कवाडे बंद करण्याची वेळ आली. याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. पण जाता जाता एक सांगतो, तुम कितनी कंपनी मारोगे? हर संगणक से कंपनी निकलेगी! आज केंब्रिज अ‍ॅनालिटिका मारली तुम्ही, परंतु त्या कंपनीच्या डेटातून, त्याच कंपनीच्या पत्त्यावर, त्याच कंपनीच्या संचालकांनी आधीच अगदी तश्शीच एक कंपनी – इमरडेटा लिमिटेड – काढून ठेवलेली आहे. अखेर ही तथाकथित स्वातंत्र्यवादी माध्यमे, शरीर मारू शकतील, परंतु आत्मा कसा मारतील ती? केंब्रिज अ‍ॅनालिटिकाचा आत्मा अमर आहे. त्याला – नैनं छिन्दन्ति वृत्ताणि, नैनं दहति माध्यम – तुमच्या बातम्या छेद देऊ शकणार नाहीत, की माध्यमे जाळू शकणार नाहीत.. तो या ना त्या स्वरूपात आपणांस बकरा बनवणारच आहे!