हरयाणात ‘तिरंगा रुमाल छू’ नावाचा एक खेळ आहे. महान संत, ‘डेरा सच्चा सौदा’चे लोकोत्तर प्रज्ञावंत पुरुष गुरुमित राम रहीम यांनी या खेळाची रचना केली आहे. कबड्डी, खोखो आणि कुस्ती या तीन खेळांचा संगम म्हणजे ‘तिरंगा रुमाल छू’. हा खेळ मुख्यत्वे खेळला जातो ‘डेरा’च्या आश्रमात. हरयाणाचे प्रतिभावान आरोग्यमंत्री अनिल विज हे या खेळावर मनापासून फिदा झाले आणि त्यांनी ‘डेरा’साठी ५० लाख रुपयांची सरकारी देणगी जाहीर केली. या पैशांतून आगामी ऑलिम्पिकसाठी तगडे खेळाडू ‘डेरा’तून तयार होतील, ही विज यांची त्यामागील दूरदृष्टी. ही गोष्ट गेल्या ऑगस्ट महिन्यातली. विज यांची आठवण आत्ता होण्याचे कारण म्हणजे खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या कॅलेंडरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छबी झळकल्याने झालेला वाद. त्यावर विज इतकेच म्हणाले की, ‘मोदी हा ब्रॅण्ड गांधी ब्रॅण्डपेक्षा उत्तम आहे’. त्यांनी साधा अंदाज वर्तविला की, ‘पुढे गांधीजी नोटांवरूनही बाद होतील’. आता विज यात काय वावगे बोलले? मोदी ब्रॅण्डचा महिमा आहेच तसा. गांधीजी फक्त आपल्या देशाला माहिती, फार तर पाकिस्तानला, फार तर दक्षिण आफ्रिकेला, फार तर अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना. पण मोदींच्या नावाचा डंका मंगोलियापासून उझबेकिस्तानपर्यंत आणि कझाकिस्तानपासून तजिकिस्तानपर्यंत वाजतो आहे. देशोदेशीचे लोक त्यांचे भाषण ऐकण्यासाठी, त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी उत्सुक असतात. आपल्या देशातील वाद्यांना मोदी यांचा हात लागावा आणि त्यातून अद्भुत सूर निनादावेत, अशी देशोदेशीच्या राष्ट्रप्रमुखांची इच्छा असते. मोदींसोबत चहा पिणे हा सर्वोच्च मान असल्याचे राष्ट्रप्रमुख मानतात. अशा या मोदी ब्रॅण्डमुळेच आपल्या देशातील खादी उद्योगाला बरकत आली आहे. नोटांवरच्या गांधीजींच्या छबीचेही तेच. कित्येक वर्षे गांधीजी त्या नोटांना चिकटून बसले आहेत. आपल्या रुपयाचे सातत्याने अवमूल्यन त्यामुळे होत आहे. दुसरे म्हणजे किती काळाबाजार चालतो नोटांच्या माध्यमातून. त्यातून गांधीजींच्याच नावाला बट्टा लागतो. शिवाय गांधीजी एकदम फकिरी वृत्तीचा माणूस. असल्या माणसाला नोटांसोबत जखडून ठेवायचे? त्यामुळे विज खरे तेच बोलले. पण, हे दोन मौलिक मुद्दे मांडल्यानंतर काही तासांतच, ‘ते माझे वैयक्तिक म्हणणे होते.. कुणाचा अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता’, असे राजकारणी विधान करून विज यांनी माघार घेतली. खरे तर विज यांनी आपल्या विधानांवर ठाम राहायला हवे होते. सत्य बोलण्यास भीती कुणाची? शब्दांचे मोल ५० लाखांपेक्षा किती तरी अधिक आहे. ‘तिरंगा रुमाल छू’साठी दिलेले ५० लाख रुपये, टीकेनंतरही विज यांनी मागे घेतले नव्हते; आता तर त्यापेक्षाही मौल्यवान शब्द विज यांनी मागे घ्यायला नको होते. विज यांनी देशवासीयांचा एका रीतीने अपेक्षाभंगच केला आहे. या अपेक्षाभंगाच्या धक्क्यातून सावरण्यास देशवासीयांना बराच काळ लागेल, यात शंका नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gurmeet ram rahim
First published on: 16-01-2017 at 00:20 IST