प्रवासाला निघायचे म्हटल्यावरच हौशी पर्यटकांची मने मुक्कामावर पोहोचलेली असतात. त्यातच, २७ सप्टेंबरच्या जागतिक पर्यटन दिनाच्या मुहूर्तावरचा प्रवास म्हणजे, आपल्या प्रवासालाही जागतिक महत्त्व वगैरे आल्यासारखे वाटू लागते. प्रत्येक प्रवास हा नव्या अनुभवांची शिदोरी जमविणारा असतो. प्रवासातूनच भारताचा शोध वास्को-द- गामाला लागला आणि कोलंबसाला अमेरिका सापडली. अगदी भाजी आणण्यासाठी घराबाहेर पडणे व वाहतूक कोंडीचा सामना करीत घरी परतणे हेदेखील एक प्रवासदिव्यच असते. सकाळी घराकडून ऑफिसकडे आणि संध्याकाळी परतीचा लोकलप्रवास करताना येणाऱ्या अनुभवातूनच मुंबईकराला या महानगरात जगण्याचे शहाणपण मिळते. म्हणून कोणताही प्रवास लहान किंवा कमी लेखू नये. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आपण वारेमाप सामान सोबत घेतो, खाण्यापिण्याचे डबेही भरून घेतो, वाटेवर जे जे काही खायला मिळते, ते सारे खायचा संकल्प सोडतो, आणि मुक्कामाचा पल्ला येईपर्यंत झोप काढायची असे ठरवतच गाडीत चढतो. पण प्रवास सुरू करण्याआधी इतरांच्या अनुभवाचे बोलही ऐकून ठेवावेत. ते बरे असते. म्हणून, आता जर तुम्ही प्रवासाचे बेत आखत असाल, तर काही उपयुक्त सल्ले कायमचे लक्षात ठेवा. समजा, तुम्ही प्रवासासाठी तिकीट आरक्षित केले असेल, तरी, गाडीत चढल्यानंतर तुमची जागा टीसीने पैसे घेऊन अन्य एखाद्या प्रवाशाला दान केलेली असू शकते, हे लक्षात ठेवा. काही काळ भांडून नंतर कदाचित दोन बाकडय़ांच्या मध्ये पथारी पसरण्याची वेळ येऊ  शकते, याची जाणीव ठेवून एखादे जुनेपुराणे अंथरूणही सोबत घ्यायला विसरू नका. समजा, तुमचा प्रवास दोन टप्प्यांत होणार असेल, तर मधल्या काळात रेल्वेच्या विश्रामगृहात उतरण्याचे संकट तुमच्यावर येऊ  शकते. अशा वेळी, नैसर्गिकरीत्या पार पाडावे लागणारे काही देहधर्म तुमच्या प्रवासाची मजा घालवू शकतात. स्वच्छतागृहामधील घाण, दरुगधीची तुम्हाला सवय नसेल, तर तेथे जाणे तुम्हाला त्रासदायक वाटू शकते. ते टाळण्यासाठी जेवणाचे डबे उघडूच नका, पाणीदेखील पिऊ  नका आणि शरीराची फार हालचाल करून पचनसंस्थांना कार्यरत राहण्यास उद्युक्त करू नका. त्या शक्यतो निद्रिस्तावस्थेत राहतील याची काळजी घ्या. प्रवासात झोप काढणे शक्यतो टाळा, पण ते जमत नसेल, तर आसपास उंदीर, झुरळांसारखे रेल्वेचे पाळीव प्राणी घुटमळू शकतात, हे लक्षात घेऊन अशा प्राण्यांना सहन करण्याची सवय अगोदरपासूनच लावून घ्या. शिवाय, या प्राण्यांना आवडणाऱ्या मौल्यवान वस्तू प्रवासात सोबत घेऊन नका. शक्यतो, सामान सोबत घेणेच टाळा, म्हणजे तुमच्यावर पश्चात्तापाची वेळच येणार नाही. ही सारी पथ्ये पाळलीत, तर तुमचा प्रवास सुखाचा होईल. तुमचा प्रवास सुरू होण्याआधी रेल्वे प्रशासनही, ‘तुमचा प्रवास सुखाचा होवो’ अशी तंबी देत असते. त्याचा अर्थ नीट समजून घेऊन वरील सूचनांचे पालन केलेत, तर तुमचा प्रवास सुखाचा झाल्याखेरीज राहणार नाही, याची आम्हालाही खात्री आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian railway travel
First published on: 28-09-2016 at 03:46 IST