प्रश्न फार म्हणजे अतिच गंभीर आहेत. रविवारी दुपारचे जागरण करून अनेकानेक देशप्रेमी नागरिकांनी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना पाहिला तर त्या समस्तांवर राजद्रोहाचा खटला चालवावा काय? म्हणजे बोवा तिकडे सीमेवर तर रोज तोफगोळाफेकीचा सामना चालू आहे. आपले जवान त्यात शहीद होत आहेत आणि आपले सर्व प्रकारचे म्हणजे गोमातेपासून भारतमातेपर्यंतचे सुपुत्र मात्र चवीचवीने ते कसलेसे क्रिकेट पाहात आहेत. आता यास काय बरे म्हणावे? की योगीजींनी अ‍ॅण्टी क्रिकेट स्क्वाड काढल्याशिवाय आपण देशभक्ती शिकणारच नाही? की हे दोन देश तिसऱ्याच देशात एकमेकांविरुद्ध खेळले तर त्यात भक्तीला डंख लागत नाही व तेच जर एकमेकांच्या प्रांगणात एकमेकांविरुद्ध उभे ठाकले तर मात्र सविनय भक्तिभंग घडतो? शिवाय यात एक उपप्रश्न असाही आहे, की आयसीसीनामक संस्थेने सामना भरविला असेल, तर त्याचे वजन देशभक्तीपेक्षा अधिक असते? फारच अवघड प्रश्न आहेत हे. म्हणजे असे वाटते आहे, की कुठे बरे गेला आहे तो आपला सळसळता, उकळता, उफळता, उफाडय़ाचा देशाभिमान? कधी कधी तर डोळ्यांसमोर असेही सवालिया निशान फडकू लागते, की आपण जनगणमन म्हणतो, त्यातून राजद्रोहाचा गुन्हा तर होत नाही ना? इतर कुठे नाही पण कर्नाटक देशी तर तसे होत नसेल ना? म्हणजे बघा आधीच आपल्याकडील काहींतील अनेकांना ते राष्ट्रगीतच अमान्य आहे. का की त्यांच्या मते त्यातले ते अधिनायक कोणी तरी भलतेच आहेत.

ते खरे की खोटे, हा प्रश्न तर सततच सलत असतो. म्हणून तर त्या काहींतील अनेकांना वाटते की वंदे मातरम् यालाच राष्ट्रगीताचा दर्जा द्यावा. परंतु तूर्तास याहून एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झालेला आहे. तो म्हणजे या राष्ट्रगीतामध्ये चक्क पंजाब, गुजरात, मराठा असे प्रांतवाचक उल्लेख आहेत. आता कोणी कानडय़ा कर्नाटकी ते मराठा वगैरे शब्द उच्चारले तर केवढय़ाला पडायचे ते? अस्सल मुंबईकर वाघांना जो भय्यांबद्दलचा प्रेमभाव तो तर तेथे व्यक्त व्हायचा नाही ना? की त्यावरही सेडिशन लागेल? खरे तर प्रश्न याच्याहूनही पुढचा आहे. ‘जय महाराष्ट्र’ असे लिहिलेल्या एसटीचे स्वागत करणारे व ती चालवणारे यांच्यावर त्या कानडीदेशी राजद्रोहाचा गुन्हा दाखल होणे हा राष्ट्रवादाचा नवा आविष्कार तर नाही ना? तसे असेल तर आधीच माहीत करून घेतलेले बरे. म्हणजे उद्या एखाद्या कानडीने चुकून मराठी भ्रतार केला तर लोकांस ‘लव प्रांतवाद’ चळवळ तरी करता येईल. की भारत-पाक क्रिकेटप्रमाणेच हे असेल? म्हणजे मूड आला की देशभक्ती नि मूड आला की क्रिकेट, असे?