या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत स्थिरावताच त्यावर कोरलेल्या छायाचित्राने हळूच डोळे किलकिले केले. तारकांच्या मंद प्रकाशात नभोमंडळाचे ते विलोभनीय दृश्य बघून ते हरखून गेले. रोज नियमितपणे योग व मोरांच्या सहवासात वावरल्यामुळेच आपल्या दृष्टीला तेजोमय वलय प्राप्त झाले व म्हणूनच आपण विपरीत वातावरणातही पाहिजे ते बघू शकतो याची जाणीव छायाचित्राला झाली. त्यावरील डोळे अवकाशात पाहू लागले, तर जिकडे तिकडे उपग्रहच उपग्रह. यातल्या अनेकांचे लुकलुकणेही थांबलेले. नक्कीच हे बंद पडलेले असणार. म्हणजे अंतराळातला कचरा. येथेही स्वच्छता मोहीम हाती घेण्याचे आपल्याला कसे सुचले नाही याचे त्यांना आश्चर्य वाटत राहिले. ट्रम्पकाळात नासा व इस्रोतर्फे संयुक्त मोहीम सहज राबवता आली असती. विश्वगुरूपदाच्या आणखी जवळ जाता आले असते या जाणिवेने ते हळहळले. मग त्यांनी संथ पण लयीत फिरणाऱ्या पृथ्वीवर नजर रोखली. दिव्यांच्या प्रकाशात चकाकणाऱ्या भारताकडे बघून त्यांना ‘आत्मनिर्भर’ या शब्दाची पुन:प्रचीती आली. मग छायाचित्राने देशाच्या दक्षिण व पूर्वेकडील भागाकडे लक्ष केंद्रित केले. जाहीर सभा, यात्रा, रॅली, त्यात तावातावात बोलणारे नेते बघण्यात ते गुंग झाले. दिसणाऱ्या दृश्यातून काही आवाज येत नसला तरी कोण काय बोलत असेल ते नजरेने बरोबर ताडले. बराच काळ ते बघितल्यावर त्या नजरेला अचानक जाणीव झाली : आपण अंतराळात आहोत! आता निवडणूक मोहापासून कटाक्षाने दूर राहायला हवे. मग नजर फिरली इतर देशांकडे. करोनामुळे दौरे करू शकलो नाही. आता संधी मिळाली म्हणत अमेरिकेत पाहातात तर परममित्र ट्रम्प गोल्फ खेळण्यात व्यस्त दिसले. निवृत्तीनंतरच्या विरंगुळ्यासाठी आपणही एखादा खेळ शिकून घ्यायला हवा. त्या ध्यानधारणेच्या मुद्रा किती करायच्या? निवृत्तीनंतरही तेच केले तर लोक विश्वास ठेवणार नाहीत. कोणता खेळ ते पृथ्वीवरच ठरवू असे म्हणत छायाचित्राने विषय झटकला. तेवढय़ात त्याला ‘क्लिक क्लिक’ असा आवाज ऐकू आला. आजूबाजूचे उपग्रह आपली छबी तर टिपत नाहीत, या शंकेने त्याला घेरले. खरे तर या अवकाशाच्या सीमाही प्रत्येक देशाने निश्चित करून घ्यायला हव्या. उगीच लुडबुड कशाला. परत गेल्यावर यासंदर्भातही एखादा कायदा करायला हवा. विचार करता करता नजर पुन्हा देशाकडे वळली. स्वत:च्या नजरेला दिव्य दृष्टीची जोड देत त्याने दिल्लीच्या सीमावर्ती भागाकडे बघितले. अजूनही काही आंदोलनजीवी बेंबीच्या देठापासून ओरडत असल्याचे दिसले. खूपच जिवट दिसतात हे लोक. अरे इकडे वरून बघा. लाखो शेतकरी त्यांचे पीक घेऊन कसे आनंदात बाजारात जात आहेत. विक्री करून आलेले पैसे मोजत आहेत. बाजारात वस्तूंची खरेदी करीत आहेत. दिल्ली सीमेवरचे ते आंदोलकांचे पुंजके वगळता मला तरी देशभर कुठेही असंतोष दिसत नाही. सारे कसे खूश! काय सुरेख हिरवागार देश दिसतो इथून. या सुधारणाविरोधकांना उघडे पाडण्यासाठी ही छायाचित्रे लगेच सर्वदूर प्रसृत करायला हवी. तसेही आपले शरीर तिकडेच आहे. बरे झाले, या उपग्रहासोबत येथवर येता आले. कुणी काहीही म्हणो, फिरण्याने ज्ञानात भरच पडत असते. शेवटी सारे काही देशाच्या प्रगतीसाठीच ना!

मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta ulta chashma article abn 97
First published on: 02-03-2021 at 00:00 IST